
Gautam Adani : गौतम अदानी म्हणाले, माझी श्रीमंती ही फक्त पंतप्रधान मोदींमुळे नाही तर...
Gautam Adani Interview : उद्योगपती गौतम अदानी केवळ त्यांच्या एकूण संपत्तीमुळे किंवा गुंतवणुकीमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहत नाहीत तर त्यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही अनेक प्रसंगी जोडले गेले आहे. 2014 पासून, विरोधकांनी अनेक वेळा आरोप केले आहेत की, पंतप्रधान मोदी अदानी यांना व्यापार वाढवण्यास मदत करतात.
प्रत्येक मोठा प्रकल्प अदानी यांना दिला जात आहे. आता या सर्व प्रश्नांवर गौतम अदानी यांनी एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच चर्चा केली. त्यांचे यश हे कोणा एका सरकारमुळे नाही, तर अनेक सरकारांचे यात योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.
गौतम अदानी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी एकाच राज्यातून आलो, त्यामुळे माझ्यावर असे निराधार आरोप करणे सोपे जाते. अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, माझा प्रवास राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरू झाला.
त्यांनी एक्झिम पॉलिसीचा प्रचार केला आणि अनेक गोष्टी पहिल्यांदा OGL लिस्टमध्ये आल्या. यातून माझा निर्यात व्यवसाय सुरू केला. तो नसता तर माझी सुरुवात अशी झाली नसती. दुसरी संधी 1991 मध्ये आली जेव्हा नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणा सुरू केल्या.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
तिसरी संधी 1995 मध्ये आली जेव्हा केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत फक्त मुंबई ते दिल्ली असा NH-8 विकसित करण्यात आला होता. त्यांची दूरदृष्टी आणि धोरणातील बदलामुळे मला माझे पहिले बंदर मुंद्रा येथे बांधण्याची संधी मिळाली.
चौथी संधी 2001 मध्ये आली जेव्हा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये विकासाची दिशा दाखवली. त्यांच्या धोरणांमुळे गुजरातमध्ये अविकसित भागांच्या विकासाबरोबरच आर्थिक बदलही झाला. त्यातून उद्योग आणि रोजगाराचा विकास झाला.
हेही वाचा: Gautam Adani : "याच भारताच्या खऱ्या हिरो" त्यांची कहाणी ऐकून अदानींच्या डोळ्यात पाणी
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करत आहेत. माझ्या विरोधात अशा गोष्टी बोलल्या जातात हे दुर्दैव आहे. हे सर्व निराधार आरोप आहेत. सत्य हे आहे की, आपले यश हे कोणा एकामुळे नाही तर तीन दशकात अनेक सरकारांच्या धोरणात्मक बदलांमुळे आहे.