आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची गीता गोपीनाथ यांनी स्वीकारली सूत्रे 

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जानेवारी 2019

वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती.

वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती.

हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या गीता गोपीनाथ यांनी 2015 मध्ये चलनाच्या विनिमय दरातील चढ-उतारामुळे विविध देशांमध्ये महागाईचा भडका कशा प्रकारे उडतो, याबाबत विस्तृत विवेचन केले होते. अशा महिला अर्थतज्ज्ञाने नुकताच आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून पदभार स्वीकारला आहे. या प्रतिष्ठित संस्थेतील महत्त्वाच्या पदावर अवघ्या 46व्या वर्षी गीता यांची वर्णी लागली आहे हे विशेष. रघुराम राजन यांच्यानंतर "आयएमएफ'च्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता या दुसऱ्या भारतीय व्यक्ती ठरल्या आहेत. तसेच या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. 

"आयएमएफ', जागतिक बॅंक आणि आर्थिक सहकार्य व विकास संस्था या जागतिक पातळीवरील तिन्ही संस्थांचे मुख्य अर्थतज्ज्ञपद सध्या महिलांकडे आहे. जागतिक अर्थव्यवस्था अडचणींतून जात असताना त्यांवर मत करण्याची मोठी जबाबदारी या तिन्ही महिलांवर आहे. गीता गोपीनाथ या व्यापार, विनिमय दर, पत धोरण आणि सार्वजनिक कर्जे आदी विषयांतील तज्ज्ञ आहेत. "जगभरातील प्रतिभावान अर्थतज्ज्ञांमध्ये गीता यांचा समावेश होते.

केरळमध्ये जन्मलेल्या गीता यांचे कुटुंब कर्नाटकातील म्हैसूरचे. त्यांचे आजी-आजोबा कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित होते. म्हैसूर व कोलकात्यातून प्रारंभीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील "लेडी श्रीराम कॉलेजा'तून बी.ए. केले. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधून एम.ए.च्या पदव्या संपादन केल्या. प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. केली असून, त्यानंतर त्यांनी शिकागो विद्यापीठात अध्यापनही केले. 

2005पासून त्या हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आपल्या लेकीने "आयएएस' व्हावे, अशी गीता यांच्या वडिलांची इच्छा होती. त्या दृष्टीनेच त्यांनी गीताला शिक्षणासाठी दिल्लीला पाठविले. मात्र लेकीची स्वप्ने वेगळी होती. तल्लख बुद्धिमत्तेच्या गीता यांनी अभ्यासवृत्ती प्राप्त केली आणि पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले गेले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 

गीता सध्या जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका करणाऱ्या गीता या केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अर्थविषयक सल्लागार आहेत. त्या बॉलिवूडपटांच्या चाहत्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gita Gopinath joins IMF as its first female Chief Economist