सोने, चांदीच्या भावातील घसरण कायम; पाहा आजचे भाव

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

सोने आणि चांदीच्या भावातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. दिल्लीत आज सोन्याचा भाव 270 रुपयांनी तर चांदीचा भाव 380 रुपयांनी घसरला.

नवी दिल्ली ः सोने आणि चांदीच्या भावातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. दिल्लीत आज सोन्याचा भाव 270 रुपयांनी तर चांदीचा भाव 380 रुपयांनी घसरला.

डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेले निराशेचे वातावरण यांचा फटका आज सोन्याच्या भावाला बसला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक आघाडीवर असलेल्या निराशाजनक वातावरणाचा परिणामही सोन्याचा भावावर झाला, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटिजचे वरिष्ठ विश्‍लेषक (कमोडिटिज) तपन पटेल यांनी दिली.

दिल्लीतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 270 रुपयांची घसरण होऊन 38 हजार 454 रुपयांवर आला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 380 रुपयांची घट होऊन 47 हजार 310 रुपयांवर घसरला. जागतिक पातळीवर आज सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 497 डॉलर आणि चांदीचा भाव प्रतिऔंस 17.72 डॉलरवर स्थिर राहिला.

मुंबईतही भावात घट
मुंबईतील सराफा बाजारात शुद्ध सोन्याच्या भाव आज प्रतिदहा ग्रॅमला 114 रुपयांची घसरण होऊन 37 हजार 622 रुपयांवर आला. स्टॅंडर्ड सोन्याचा भावही तेवढीच घट होऊन 37 हजार 471 रुपयांवर बंद झाला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 280 रुपयांची घसरण होऊन 45 हजार 545 रुपयांवर आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold and silver prices fall for third day