सोन्यातील ‘अक्षय’ गुंतवणूक

अतुल सुळे
सोमवार, 6 मे 2019

अक्षय तृतीया आणि सोने यांचे एक अतूट नाते आहे. या दिवशी केलेल्या खरेदीचा अथवा गुंतवणुकीचा क्षय होत नाही, अशी मान्यता आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसतो. दीर्घमुदतीचा विचार केल्यास फक्त सोने व शेअरमधील गुंतवणूक महागाईच्या दरावर मात करताना दिसते. आपल्या एकूण गुंतवणुकीच्या ५-१० टक्के गुंतवणूक ही सोन्यात ‘पोर्टफोलिया हेज/विमा’ म्हणून जरूर करायला हवी.

अक्षय तृतीया आणि सोने यांचे एक अतूट नाते आहे. या दिवशी केलेल्या खरेदीचा अथवा गुंतवणुकीचा क्षय होत नाही, अशी मान्यता आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसतो. दीर्घमुदतीचा विचार केल्यास फक्त सोने व शेअरमधील गुंतवणूक महागाईच्या दरावर मात करताना दिसते. आपल्या एकूण गुंतवणुकीच्या ५-१० टक्के गुंतवणूक ही सोन्यात ‘पोर्टफोलिया हेज/विमा’ म्हणून जरूर करायला हवी.

वर्षभरात साडेतीन शुभमुहूर्त असतात. दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे तीन पूर्ण मुहूर्त, तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त मानण्यात येतो. उद्या (७ मे) अक्षय तृतीया असून, कोणत्याही शुभकार्यासाठी व नव्या खरेदीसाठी हा उत्तम मुहूर्त मानण्यात येतो. या दिवशी केलेल्या खरेदीचा अथवा गुंतवणुकीचा क्षय होत नाही, अशी मान्यता आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसतो. गेल्या २० वर्षांत, अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केलेल्या सोन्यातील गुंतवणुकीचे मूल्य सातत्याने वाढलेले दिसते. सोबतचा तक्ता पाहावा.

शेजारील तक्‍त्यावरून असेही लक्षात येईल, की ज्यांनी १०-२० वर्षांपूर्वी सोन्यात गुंतवणूक केली असेल, त्यांना १० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक परतावा मिळाला व ज्यांनी २००९ नंतर खरेदी केली असेल, त्यांना कमी परतावा मिळाला. 

सोन्याच्या बाबतीत मागणी वाढती व पुरवठा मर्यादित असल्याने भाव वाढताना दिसतो. सोन्याच्या मागणीची प्रामुख्याने चार गटांत विभागणी करता येईल. मध्यवर्ती बॅंकांकडून मागणी, सर्वसामान्यांची दागिन्यांसाठी, गुंतवणूकदारांची मागणी व औद्योगिक वापरासाठी मागणी. जगभरातील प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बॅंका अडीअडचणीच्या काळासाठी ‘रिझर्व्ह’ म्हणून सोने खरेदी करीत असतात. रशिया, चीन व भारतासारख्या विकसनशील देशांनी २००१ पासून आपल्याकडील सोन्याचा साठा वाढवत नेला आहे, तर विकसित देशांनी तो स्थिर ठेवला आहे, हे खालील तक्‍त्यावरून दिसेल.

सर्वसामान्यांच्या सोन्याच्या मागणीत चीन, भारत, अमेरिका व तुर्कस्तान हे देश आघाडीवर आहेत. ही मागणी प्रामुख्याने दागदागिन्यांसाठी आहे. जगभरातील मध्यवर्ती बॅंकांकडे एकूण ३३,८०० टन सोने आहे, तर भारतीयांकडे २४,००० टन आणि चिनी लोकांकडे १६,००० टन सोने असावे, असा अंदाज आहे.

सोन्यातील गुंतवणूक प्रामुख्याने दोन प्रकारे करण्यात येते. वेढणी, बिस्किटे, चिपा अथवा नाण्यांच्या स्वरूपात किंवा गोल्ड एक्‍स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) किंवा गोल्ड बाँड्‌सच्या स्वरूपात. दीर्घमुदतीचा विचार केल्यास फक्त सोने व शेअरमधील गुंतवणूक महागाईच्या दरावर मात करताना दिसते. १९६४ मध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव रु. ६४ होता, जो २०१८ मध्ये रु. ३०,००० वर गेला, म्हणजेच ५४ वर्षांत ११.९ टक्के चक्रवाढ परतावा! १९८६ मध्ये सेन्सेक्‍स ५६१ अंशांवर होता, जो २०१८ मध्ये ३८,००० अंशांवर गेला, म्हणजेच ३२ वर्षांत १४.२ टक्के चक्रवाढ परतावा! या दोन्ही ‘ॲसेट क्‍लास’चा एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध नसल्याने आपल्या एकूण गुंतवणुकीच्या ५-१० टक्के गुंतवणूक ही सोन्यात ‘पोर्टफोलिया हेज/विमा’ म्हणून जरूर करायला हवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Investment Akshaya Tritiya