सोने, चांदी उजळले; भाव प्रतितोळा ५२ हजारांच्या वर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

बाजारपेठांमधील सोन्या-चांदीच्या दरातील चढती कमान आजही कायम राहिली आहे. कमोडिटी मार्केटमध्ये आज सोने एका तोळ्यासाठी ५२ हजारांच्यावर तर, चांदी किलोमागे ६५ हजार रुपयांवर पोहोचली.

मुंबई - कमोडिटी मार्केटमधील तसेच बाजारपेठांमधील सोन्या-चांदीच्या दरातील चढती कमान आजही कायम राहिली आहे. कमोडिटी मार्केटमध्ये आज सोने एका तोळ्यासाठी ५२ हजारांच्यावर तर, चांदी किलोमागे ६५ हजार रुपयांवर पोहोचली.

अमेरिका व चीन यांच्यामधील व्यापार युद्ध तसेच डॉलर कमकुवत झाल्याचा परिणाम म्हणून नागरिकांनी सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्या-चांदीच्या खरेदीवर भर दिला आहे. त्यामुळे सध्या सोने-चांदीचे दर चढेच राहतील, असे सांगितले जात आहे. 

सोन्या-चांदीच्या बाजारातील सोन्याचा दहा ग्रॅमचा दर आज मुंबई व दिल्लीला ५० हजार ९२० रुपये, तर चेन्नईला ५३ हजार ४९० रुपये होता. याच बाजारात चांदीचा दर किलोमागे ६१ हजार ४३० रुपये होता. कमोडिटी मार्केटमधील सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी ५२ हजारांच्यावर राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील सोन्या-चांदीच्या दरवाढीशी सुसंगत अशी दरवाढ भारतातही होत आहे, असे "एचडीएफसी सिक्‍युरिटी''चे विश्‍लेषक तपन पटेल यांनी माहिती देताना सांगितले.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

हिरे, दागिन्यांची निर्यात घटली
सध्याच्या टाळेबंदीच्या काळात मुंबईतील हिरे व दागिने निर्यातीचा व्यवसाय सुरू झाला असला तरी मागील वर्षीच्या तुलनेत त्यांच्या व्यवसायात यंदा चांगलीच घट झाली आहे. सोने व हिरे दागिन्यांच्या निर्यातीचा व्यवसाय निम्म्याने घटला आहे. पण चांदीचे दागिने दुप्पट जास्त निर्यात झाले.

हिरे व दागिने निर्यातीचा एकंदर व्यवसाय गेल्या वर्षीपेक्षा ५५ टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी एप्रिल ते जून महिन्यापर्यंत भारताने सहा अब्ज डॉलरच्या दागिन्यांची निर्यात केली होती. पण आताच्या एप्रिल ते जून दरम्यानची निर्यात पावणेतीन अब्ज डॉलर एवढी झाली आहे. पैलू पडलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीतही पन्नास टक्के घट झाली. गेल्या वर्षीच्या ३८५ कोटी डॉलरच्या व्यवहाराच्या तुलनेत या वर्षीच्या एप्रिल ते जून या तिमाहीत केवळ १८० कोटी डॉलरचा व्यवहार झाला.

सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत तर तब्बल ८० टक्के घट झाली. मागील वर्षीच्या एप्रिल ते जून दरम्यान १५३ कोटी डॉलरचे सोन्याचे दागिने निर्यात झाले. तर या वर्षीच्या एप्रिल ते जून या तिमाहीत फक्त ३२ कोटी डॉलरचे दागिने परदेशी गेले. 

चांदीच्या दागिन्यांच्या निर्यातीत मात्र जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या एप्रिल ते जून या तिमाहीत १६ कोटी डॉलरचे दागिने निर्यात झाले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ३२ कोटी डॉलरचे चांदीचे दागिने परदेशी गेले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या हिरे व दागिने निर्यातदार कारखान्यांमध्ये २५ टक्के कामगारांना कामावर ठेवण्यास व दुसऱ्या पाळीत आणखीन २५ टक्के कामगारांना कामावर ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र अद्यापही या कारखान्यात म्हणावे तसे कामगार कामावर येऊ शकले नाहीत. सरकारने व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आम्हाला आतापर्यंत भरपूर मदत केली. मात्र कामगारांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाल्यास आणखीन बरे होईल, असे "जेम्स अँड ज्वेलरी मॅन्यूफॅक्‍चर असोसिएशन''चे अध्यक्ष राजीव पंड्या यांनी "सकाळ''शी बोलताना सांगितले.

(Edited by : Kalyan Bhalerao)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold price makes history