गुगलचा फ्रान्सबरोबर 1.07 अब्ज डॉलर कर भरण्याचा समझोता

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

अमेरिकेची इंटरनेटविश्वातील दिग्गज कंपनी गुगलने फ्रान्सबरोबर कर भरणा करण्यासंदर्भातील समझोता केला आहे.

पॅरिस: अमेरिकेची इंटरनेटविश्वातील दिग्गज कंपनी गुगलने फ्रान्सबरोबर कर भरणा करण्यासंदर्भातील समझोता केला आहे. गुगल फ्रान्स सरकारला करापोटी 96.5 कोटी युरो (1.07 अब्ज डॉलर)देणार आहे. गुगलची फ्रान्स सरकारबरोबर करासंदर्भातील न्यायालयीन लढाई सुरू होती. कर चुकवल्याच्या दंडापोटी गुगल 50 कोटी युरो भरणार असून 46.5 कोटी युरो फ्रेंच कर विभागाच्या नियमावलीनुसार करापोटी भरणार आहे. गुगल आणि फ्रान्स सरकारमधील या समझोत्याची माहिती गुगलने दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून गुगलचा फ्रान्स सरकारशी यासंदर्भातील झगडा सुरू होता. अलीकडच्या काळात गुगलने ब्रिटन आणि इटली या देशांशीसुद्धा याचप्रकारचा समझोता केला आहे. फ्रान्सचे न्यायमंत्री निकोल बेलाऊबेट आणि अर्थसंकल्पमंत्री जेराल्ड डार्मनिन यांनी या समझोत्याचे स्वागत केले आहे. मागील दोन वर्षांपासून फ्रेंच अधिकारी यावर गांभीर्याने काम करत होते. हा एक ऐतिहासिक समझोता असल्याचेही ते पुढे म्हणाले. फ्रान्स आणि युरोपियन देशांचा अमेरिकेशी अनेक वर्षांपासून कर आकारणीसंदर्भातील झगडा सुरू आहे.  

ऑगस्ट महिन्यात जी7 देशांच्या परिषदेत संबंधित देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांकडून आकारण्यात येणाऱ्या करासंदर्भात तोडगा निघाला होता. 2016 मध्ये गुगलने ब्रिटिश सरकारशी झालेल्या समझोत्यानुसार 1.6 लाख डॉलरची रक्कम अदा केली होती. तर इटलीबरोबर 2017 मध्ये गुगलने 30.6 युरोंचा समझोता केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google to pay 1 billion dollar in France to settle fiscal fraud probe