'गुगल'च्या एचआर प्रमुख होणार पायउतार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

- गुगलचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख (एचआर हेड) ईलीन नॉटन या पदावरून पायउतार होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

पुणे : गुगलचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख (एचआर हेड) ईलीन नॉटन या पदावरून पायउतार होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ईलीन नॉटन सध्या गुगलमध्ये पिपल ऑपरेशन या विभागाच्या उपाध्यक्षा आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ईलीन यांच्या कंपनीतील कामगिरीसाठी आणि योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांच्या गुगलबरोबरील पुढील वाटचालीबद्दल आम्ही आशावादी आहोत, असे मत गुगुल आणि तिची प्रवर्तक कंपनी अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी व्यक्त केले आहे.

नॉटन गुगलमध्ये 2006 पासून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळत आहेत. 2016 पासून त्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. मागील काही वर्षात गुगलला कर्मचाऱ्यांबरोबरच्या मोठ्या संघर्षाला आणि तणावाला सामोरे जावे लागते आहे.
'गुगलने नॉटन यांच्या कारकिर्दीत 70,000 पेक्षा जास्त कर्मचारी जोडले असल्याचेही' पिचाई यांनी सांगितले. गुगलच्या नव्या एचआर हेडच्या शोधासाठी आणि नियुक्तीसाठी आपण सुंदर पिचाई आणि मुख्य वित्तीय अधिकारी रुथ पोराट यांच्यासोबत काम करू असे नॉटन यांनी म्हटले आहे.

'माझे पती आणि मी यांनी सहा वर्षाआधीच ठरवले होते की लंडन आणि सॅन फ्रान्सिस्को येथे काम करून पुन्हा एकदा न्यूयॉर्कला आपल्या कुटुंबियांकडे परतायचे', असेही नॉटन यांनी सांगितले आहे. अलीकडच्या काही वर्षात कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे आणि वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांबरोबरील संघर्षामुळे गुगलमधील वातावरण ढवळून निघाले आहे.

यामध्ये अमेरिकन लष्कराबरोबरच्या कंत्राटापासून ते चीनमधील सर्च इंजिन सुरू करण्याच्या मुद्द्यांपर्यत असंख्य मुद्द्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात गुगलने चार कर्मचाऱ्यांना माहिती सुरक्षेच्या धोरणांचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव नोकरीवरून काढून टाकले होते. मात्र, गुगलने कर्मचाऱ्यांना एकत्र येऊ न देण्याच्या धोरणातून हे पाऊल उचलल्याचा आरोप त्यावेळी झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Googles head of HR to step down

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: