अल्प बचत योजनांचे व्याज दर आगामी तिमाहीत ‘जैसे थे’!

वृत्तसंस्था
Friday, 29 March 2019

केंद्र सरकारने विविध अल्प बचत योजनांवरील व्याजदर नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीसाठी स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने विविध अल्प बचत योजनांवरील व्याजदर नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीसाठी स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एप्रिल ते जून तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (एनएससी) 8 टक्के वार्षिक व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. 112 महिने मुदतीच्या किसान विकास पत्राकरिता 7.7 टक्के असा व्याज दर यापुढेही असेल. 

"आर्थिक वर्ष 2019-20 मधील पहिल्या तिमाहीसाठी विविध अल्प बचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी सादर केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.  सरकारी रोखे आणि बॉंडप्रमाणे गुंतवणूक योजनांचे व्याजदर बाजाराशी सुसंगत ठेवण्याच्यादृष्टीने सरकारकडून अल्प बचतीच्या व्याजदराचा तिमाही आढावा घेतला जातो.

 पाच वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी व्याजदर 8.7 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेवरील व्याज त्रैमासिक पद्धतीने दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात पोस्टात गुंतवणूक असून अनेकजण यातील व्याजावर उदरनिर्वाह करतात. व्याजदरात वाढ न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मुलींच्या भविष्यासाठीची तरतूद असणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेतील 8.5 टक्के व्याजदर कायम आहे.

एप्रिल ते जून तिमाहीसाठी लागू व्याज दर
बँक बचत खाते    4 टक्के 
बँक आवर्ती ठेवी (5 वर्षे)     7.3   टक्के 
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (5 वर्षे)    8.7 टक्के 
सार्व. भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)    8 टक्के 
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र    8 टक्के 
किसान विकास पत्र    7.7 टक्के 
सुकन्या समृद्धी खाते    8.5 टक्के 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt keeps small savings rates unchanged for Q1 FY20