जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर दशकभराच्या नीचांकावर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

विकासदरावर अमेरिका-चीन व्यापारी संघर्षाचे पडसाद उमटल्याचे म्हटले जात आहे. 

पॅरिस : मागील बराच काळ सुरू असलेल्या अमेरिका-चीन व्यापारी संघर्षाची मोठी किंमत जागतिक अर्थव्यवस्थेला मोजावी लागणार आहे. मंदीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर मागील दहा वर्षांतील नीचांकी स्तर गाठण्याची भीती ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) या संस्थेने व्यक्त केली आहे.

चालू वर्षाचा आणि पुढील वर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर घटणार असल्याचा अंदाजही संस्थेने वर्तविला आहे. जागतिक अर्थव्यवस्था नीचांकी विकासदराच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे "ओईसीडी'ने म्हटले आहे. त्यामुळे चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 2.9 टक्‍क्‍यांपर्यंत खाली येईल. 2020 मध्ये तो जेमतेम 3 टक्के राहील, असे "ओईसीडी'ने म्हटले आहे.

2008-09 या आर्थिक मंदीच्या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 3.6 टक्के होता. मात्र, चालू वर्षात मागील काही महिन्यांमध्ये जागतिक बाजारपेठेत प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. विविध सरकारांकडून मंदीतून बाहेर पडण्यासाठी कशाप्रकारे प्रतिसाद देतात यावर जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ अवलंबून असल्याचे "ओईसीडी'ने म्हटले आहे.

सुरुवातीला तात्पुरता वाटणारा व्यापारी संघर्ष दीर्घकाळापासून चिघळला आहे. यातून व्यापारी संबंधांवर परिणाम झाल्याचे "ओईसीडी'चे मुख्य अर्थतज्ज्ञ लॉरेन्स बून यांनी सांगितले. यामुळे गुंतवणुकीला फटका बसला असून गतवर्षाच्या तुलनेत गुंतवणुकीत केवळ एक टक्का वाढ झाली.

या सर्वाचा अमेरिका आणि चीनमधील उत्पादनावर परिणाम झाला असून दोन्ही अर्थव्यवस्थेच्या वाढीला झळ बसली असल्याचे "ओईसीडी'ने म्हटले आहे. मे महिन्यात "ओईसीडी'ने चालू वर्षासाठी 3.2 टक्के आणि 2020 साठी 3.4 टक्के विकासदराचा अंदाज वर्तवला होता. 

भारताचा वृद्धीदर 5.9 टक्के राहणार 

पहिल्या तिमाहीत विकासदराने पाच टक्‍क्‍याचा तळ गाठला असला तरी चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची 5.9 टक्के दराने वृद्धी होईल, असे "ओईसीडी'ने म्हटले आहे. 2020 मध्ये विकासदर 6.3 टक्के होईल, असा अंदाज "ओईसीडी'ने व्यक्त केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The growth of the global economy at a decade-low