
HDFC Bank : चारचाकींसाठी देणार ३० मिनिटांत एक्सप्रेस कार लोन
मुंबई - रेसर मोटारीच्या वेगाने म्हणजे फक्त तीस मिनिटांत वाहनकर्ज (Vehicle Loan) देणारी एक्सप्रेस कारलोन योजना (Express Car Loan Scheme) एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) जारी केली आहे. एवढी वेगवान अशी देशातील ही अशी पहिलीच योजना असल्याचे सांगितले जाते.
या एक्सप्रेस कारलोन योजनेत वाहन खरेदीदाराने प्रक्रिया पूर्ण केली की फक्त तीस मिनिटांत मोटारविक्रेत्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. विशेष म्हणजे बँकेचे खातेदार नसलेल्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत देशभरातील बहुतांश वाहन विक्रेत्यांनाही जोडण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी बँकेला अपेक्षा आहे.
ही नवी कर्ज योजना अत्यंत सोपी, वेगवान, सोयीस्कर आणि सर्वसमावेशक असल्याचा बँकेचा दावा आहे. याने मोटारखरेदीची प्रक्रियाही सोपी होऊ शकेल व ग्रामीण आणि निम शहरी भागातही मोटारीविक्रीला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सध्या हे कर्ज फक्त चारचाकी मोटारींसाठी आहे, मात्र लौकरच दुचाकींसाठीही ते उपलब्ध होईल. हे कर्ज बँकेच्या सर्व शाखांमध्ये, सर्व विक्रेत्यांकडे तसेच अन्य अॅपवरून देखील मिळू शकेल. देशाच्या ग्रामीण व निमशहरी भागात अशा योजनांची गरज असल्याचे बँकेचे कंट्रीहेड (रिटेल अॅसेट) अरविंद कपिल म्हणाले. वीस लाखांपर्यंत कर्जाची गरज असलेले २० ते ३० टक्के ग्राहक या योजनेचा फायदा घेतील अशी आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय वाहनउद्योग येत्या पाच-सात वर्षांत जगात तिसऱ्या क्रमांकाचा होण्याच्या बेतात आहे. सध्या देशात दरवर्षी साडेतीन कोटी नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. येत्या दहा वर्षांत पस्तीस कोटी चारचाकी व पंचवीस कोटी दुचाकी गाड्या रस्त्यावर येतील, अशी शक्यता आहे. एचडीएफसी बँकेने यापूर्वीही दहा सेकंदात पर्सनल लोन व शेअर-म्युचुअल फंडावर डिजिटल लोन अशा नाविन्यपूर्ण योजना आणल्या आहेत.
Web Title: Hdfc Bank Express Car Loan In 30 Minutes For Four Wheelers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..