Capital
Capital

भांडवल उभारायचंय या चार गोष्टी लक्षात ठेवा!

अनेकदा स्टार्टअप्सचे संस्थापक भांडवलाची उभारणी करण्याबाबत अतिशय उत्साही असतात आणि संभाव्य गुंतवणूकदारांकडे भांडवलासाठी धाव घेत असतात. मात्र, तुमच्या अशा गुंतवणूकदाराकडून रकमेचा धनादेश मिळणे, हे जितके महत्त्वाचे असते; तितकेच तुमच्यावर विश्वास असलेल्या आणि तुम्ही यशस्वी होण्यासाठी तुमच्या प्रवासात सतत पाठिंबा देणाऱ्या अशाच गुंतवणूकदाराकडून भांडवल मिळणे, हेही तितकेच महत्त्वाचे असते. अनेकदा चांगल्या स्टार्टअपला चुकीचा गुंतवणूकदार मिळतो आणि त्यामुळे तो गुंतवणूकदार आणि ती स्टार्टअप यांच्यामध्ये खूप संघर्ष होण्याची शक्यता असते. या लेखात तुमच्या स्टार्टअपला भांडवलाचा पुरवठा करण्यात चांगला गुंतवणूकदार कसा शोधायचा, यासाठीचे चार मंत्र कोणते ते आपण या लेखात बघूया.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुंतवणुकदाराची मुलाखत घ्या
संबंधित गुंतवणूकदाराला तुम्ही आणि तुमची स्टार्टअप ही गुंतवणूकयोग्य आहे की नाही, हे जाणून घेण्याची जितकी इच्छा असेल; तितक्याच तुम्हालाही तुमच्या संभाव्य गुंतवणूकदाराकडून अनेक गोष्टी माहीत करून घेण्याची इच्छा असेल. गुंतवणूकदाराशी संवाद साधायला सुरुवात करताना हे काही प्रश्न लक्षात ठेवा...

गुंतवणुकदाराचा 'अभ्यास' करा
तुमच्या स्टार्टअपसाठी सगळेच गुंतवणूकदार फिट असतील, असे नाही. याची तुलना आपल्याला लग्नाशी करता येईल. लग्न करणाऱ्या दोन्ही व्यक्ती अतिशय चांगल्या असल्या; तरी त्यांचा दृष्टिकोन, इच्छा, महत्त्वाकांक्षा, आर्थिक शिस्त आदी गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे ते ‘हॅप्पीली मॅरिड’ असतीलच, असे नाही. स्टार्टअप संस्थापक आणि गुंतवणूकदार यांच्यातले नाते असेच असू शकते. चांगला गुंतवणूकदार शोधणे ही गोष्ट योग्य जोडीदार शोधण्यासारखीच असते. तुमच्यासाठी, तुमच्या व्यवसायासाठी आणि तुमच्या महत्त्वाकांक्षेसाठी नेमका पार्टनर कसा असला पाहिजे, याचा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. 

अ) गुंतवणूक करणारी व्यक्ती किंवा संस्था ‘एंजल नेटवर्क’ किंवा ‘व्हेंचर कॅपिटल’ असो- तिचा गुंतवणुकीचा इतिहास पहिल्यांदा तपासून बघा. याची कल्पना त्या गुंतवणूकदाराच्या वेबसाइटवरून कल्पना येऊ शकते. काही गुंतवणूकदार हे फक्त ‘ॲग्री स्टार्टअप्स’मध्येच गुंतवणूक करतात, काही गुंतवणूकदार तंत्रज्ञानाच्या गाभ्याशी जाणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात, तर काही सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस (सास) स्टार्टअप्सना पसंती देतात. त्यामुळे तुम्ही किंवा तुमची स्टार्टअप त्याच्या एकूण तत्त्वज्ञानात फिट बसत नसेल, तर तुम्हाला कदाचित ई-मेलवरून रिप्लायसुद्धा येणार नाही. तुमची स्टार्टअप त्या गुंतवणूकदाराला रस असलेल्या क्षेत्रातलीच असली पाहिजे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.

ब) त्या गुंतवणूकदाराने कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक केली आहे आणि त्यांची त्या त्या स्टार्टअपमध्ये सरासरी गुंतवणूक काय आहे, याचा अभ्यास करा. त्या गुंतवणूकदाराने आम्ही ‘रेव्हेन्यू स्टेज’मध्ये येऊ किंवा ‘सीरिज ए स्टेज कंपन्यां’मध्ये आम्हाला रस आहे, असे म्हटले आणि तुम्ही अजून उत्पन्नच मिळवायला सुरुवात केली नसेल, तर अशा गुंतवणूकदाराशी संपर्क साधण्याचे प्रयत्न निष्फळच ठरतील. 

क) तुम्ही गुंतवणूकदाराची लिंक्डइन प्रोफाइल बघू शकता. त्यांना कोणत्या गोष्टीतल्या गुंतवणुकीत रस आहे, त्यांनी कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक केली आहे आदी माहिती मिळेल. त्यांच्या गुंतवणुकीतून त्यांच्या गरजांमध्ये तुम्ही बसता का, याची कल्पना येते.

तुमचे सादरीकरणाचे भाषण तयार ठेवा
तुम्ही गुंतवणूकदारापुढे सादरीकरण करायला किंवा भाषण (इलेव्हेटर पिच) करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्ही नक्की कोणत्या समस्येसंदर्भात स्टार्टअप सुरू करायचा विचार करत आहात आणि तुम्ही त्यासंदर्भात देऊ इच्छित असलेल्या सोल्युशनचे वेगळेपण काय आहे आणि बाजारपेठेत कोणत्या संधी आहेत हे एक-दोन मिनिटांत सांगायचा प्रयत्न करा. तुमचे हितचिंतक किंवा मित्र-मैत्रिणी यांच्यासमोर भाषणाची प्रॅक्टिस करा आणि ते नेमके बनवायचा प्रयत्न करा. हे ‘पिच’ तुमच्याकडे कोणत्याही क्षणी तयारच असले पाहिजे. ते नेमके, मुद्देसूद असले पाहिजे. तुम्ही जितके उत्तम भाषण कराल, तितका श्रोत्यांचा रस वाढतो. 

उदाहरणार्थ, तुम्ही समजा शाळांमध्ये मुलांना गणित शिकवण्याबाबत बदल घडवून आणण्यासाठी आणि शिकवण्याची पद्धत रंजक करण्यासाठी गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी स्टार्टअप स्थापन करू इच्छित असाल, तर तुम्ही तुमचे भाषण साधारण असे करू शकाल : 

हेलो, माझं नाव सम्राट आहे. मी स्वतःच ‘गणिताचा एनसायक्लोपीडिया’ आहे आणि गणिताचा ‘बायजू’ तयार करू शकीन असा माझा विश्वास आहे. आमच्याकडे एक उत्पादन आहे, जे मुलांना गणित शिकवण्याची पद्धतच बदलून टाकेल. आम्ही ही प्रक्रिया रंजक केली आहे आणि गेल्या दोन महिन्यांत आमच्याकडे तब्बल पाच हजार विद्यार्थी आधीपासून तयार आहेत. 

ही संहिता नीट वाचा. तुम्ही स्वतःचा ‘गणिताचा एनसायक्लोपीडिया’ असा उल्लेख करून श्रोत्यांचे लक्ष आधीच वेधून घेतले आहे आणि तुमच्यात गणिताबाबत पॅशन आहे हेही दाखवून दिले आहे. ‘बायजू’शी तुलना करून तुमची महत्त्वाकांक्षा दाखवून दिली आहे आणि कशा प्रकारे बदल घडवून आणू इच्छित आहात, याचीही चुणूक दाखवून दिली आहे. किती कमी वेळात तुमच्याकडे किती विद्यार्थी आकर्षित झाले आहेत, हे सांगून तुम्ही गणित रंजक करण्याची गरज दाखवून देताना संभाव्य गुंतवणूकदाराचा तुमच्या स्टार्टअपमधला रसही तितकाच वाढवत आहात.

गुंतवणूक मिळालेल्या स्टार्टअप्सशी संपर्क साधा
तुम्हाला अपेक्षित असलेल्या गुंतवणूकदाराकडून ज्या स्टार्टअप्सना गुंतवणूक मिळाली असेल, त्यांच्या संस्थापकांशी बोला. त्यातून त्या गुंतवणूकदाराबाबत आणि त्याने त्या कंपनीच्या कार्यशैलीत काही मूल्यवर्धन केले का, याबाबत बरीच माहिती मिळेल. कशा प्रकारे ‘पिच’ करायचे याबाबत काही कानमंत्रही या संस्थापकांकडून मिळतील. 

या स्टार्टअप्सच्या संस्थापकांचे फोन नंबर किंवा ई-मेल ॲड्रेसेस मिळवण्यासाठी तुम्ही crunchbase.com, pitchbook.com आदींचा वापर करू शकता, yourstory किंवा inc42 यांच्यावर उपलब्ध असलेल्या सार्वजनिक माहितीचा वापर करू शकता किंवा लिंक्डइनद्वारेही त्या संस्थापकाशी संपर्क साधू शकता. या संस्थापकांचे अनुभव जाणून घेतल्याने त्या गुंतवणूकदाराची कामाची पद्धत, त्याचे विचार, ते कशा प्रकारे ‘स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू’ वाढवू शकतात किंवा त्यांच्या पोर्टफोलिओतल्या कंपन्यांना ते कशा प्रकारे पाठबळ देतात आदी अनेक गोष्टी तुम्हाला कळतील. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com