जेट एअरवेज संदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक?

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मे 2019

नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद दिला असून पुढील बोलणी सुरु असून लवकरच जेट एअरवेज पुन्हा अवकाशात झेपावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी जेटच्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद दिला असून पुढील बोलणी सुरु असून लवकरच जेट एअरवेज पुन्हा अवकाशात झेपावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी जेटच्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जेट एअरवेज संदर्भातील ताज्या घडामोडींनंतर शेअरमध्ये तब्बल 15 टक्क्यांची वाढ होऊन इंट्राडे व्यवहारात 153.85 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. 

धातू, आयात निर्यात, व्यापार, वाहन उद्योग, बँकिंग, आरोग्य आणि सेवा क्षेत्रात हिंदुजा समूह कार्यरत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत हिंदुजा बंधू सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थानी राहिले आहेत. ते 22.5 अब्ज पौंड इतक्या संपत्तीचे मालक आहेत. 

विशेष म्हणजे  2001 मध्ये, हिंदुजा ग्रुपने एअर इंडियासाठी बोली लावली होती त्याचबरोबर इंडियन एअरलाइन्समध्ये 26 टक्क्यांची मागणी केली होती.  मात्र प्रस्तावास सरकारने उदासीनता दर्शविल्याने ते अंमलात येऊ शकले नाही. मात्र आता जेट एअरवेजच्या माध्यमातून हवाई सेवा क्षेत्रात उतरण्याचे हिंदुजा समूहाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

हिंदुजा ग्रुपची स्थापना 1914 मध्ये झाली. त्यांच्या व्यवसायाची सुरुवात मुंबई आणि कराचीमध्ये झाली होती. श्रीचंद (वय 83) आणि गोपीचंद (79) हे चार बंधूंपैकी दोन भाऊ लंडनहून तर प्रकाश हे जिनिव्हातून आणि अशोक हे भारतातून कंपनीचा कारभार बघतात. अशोक लेलँड, इंड्सलँड बँक यासारख्या कंपन्यांची मालकी त्यांच्याकडे असून मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलही हिंदुजा बंधूंचे आहे. श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश व अशोक हिंदूजा यांच्या नियंत्रणाखाली विविध क्षेत्रातील जवळपास 50 कंपन्या आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल 40 अब्ज पौंड इतकी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hinduja Group set to bid for Jet Airways this week