ठेवींवरील व्याजदर कमी झाले तर गुंतवणूकदारांचे काय?

ठेवींवरील व्याजदर कमी झाले तर गुंतवणूकदारांचे काय?
ठेवींवरील व्याजदर कमी झाले तर गुंतवणूकदारांचे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्या आहेत. याचे अनेक क्षेत्रावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. बॅंकांमध्ये नवीन नोटा घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. बॅंकांनी सुरुवातीला फक्त चार हजार आणि आता साडेचार हजार रुपये बदलून देत आहेत. उर्वरित शिल्लक रक्कम बॅंकेतील खात्यात जमा केली जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये सुमारे तीन ते पाच लाख कोटी रुपये देशभरातील बॅंकांमध्ये जमा झाले. रिझर्व्ह बॅंक येत्या 7 डिसेंबरला पतधोरणाचा आढावा घेणार आहे. त्यामध्ये व्याजदरात कपातीची घोषणा होण्याची शक्‍यता वाढली आहे.

बॅंकांकडे जमा झालेल्या रकमेमुळे येत्या काळात बॅंकांकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करणे शक्‍य आहे. भारत हा आधीपासूनच बचतकर्त्यांचा देश असल्याने सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात मुदत ठेवी बॅंकेत ठेवल्या जातात. मुद्दल सुरक्षित राहील आणि गुंतवलेल्या रकमेवर निश्‍चित परतावा मिळेल हा विचार त्यामागे असतो. म्हणूनच बॅंकांतील मुदत ठेवींना सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. याशिवाय जनसामान्यांकडून आवर्ती ठेवी (आरडी), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) या योजनांमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.

नोटा बंद करून मोदी सरकारने केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक'मुळे बॅंकांमध्ये ठेवींचा महापूर आला आहे. शिवाय दिवसेंदिवस महागाईचा दर वाढतो आहे. शिवाय आता बॅंकांकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता वाढल्याने इतर गुंतवणुकीच्या साधनांचा विचार करणे आवश्‍यक आहे. मुदत ठेवींमध्ये पैसा ठेवण्यपूर्वी त्यावर भरावा लागणारा प्राप्तिकर आणि महागाईच्या दराचा विचार करणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला कोणतीही गुंतवणूक करताना त्यातून आपल्याला काय परतावा मिळणार याचे आकलन असणे महत्त्वाचे आहे. ठेवीवर मिळणारा परतावा आणि त्यावर बसणारा प्राप्तिकर हा यातील एक भाग महत्त्वाचा असतो. प्राप्तिकर कापून आपल्या गुंतवणुकीतून किती परतावा मिळणार याचा विचार सामान्य गुंतवणूकदाराने केला पाहिजेच. बॅंकांमधील मुदत ठेवीवर मिळणारे उत्पन्न पूर्णतः करपात्र असते. त्यामुळे ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर कापून घेतला जातो. हा विचार केला तर बॅंकांमधील मुदत ठेवी या गुंतवणूकदाराच्या दृष्टीने फारशा फायद्याच्या ठरत नाहीत. कारण बॅंकेकडून ठेवीवरील व्याजावर उद्‌गमकराची (टीडीएस) कपात केली जाते.

याच बरोबर महागाईदराशी मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाशी तुलना केल्यास बऱ्याचदा आपले नुकसान होत असल्याचे लक्षात येईल. म्हणजेच नकारात्मक परतावा मिळतो. कारण महागाई ज्या दराने वाढते, त्या प्रमाणात ठेवीवरील व्याजाचे दर वाढत नाहीत. त्यामुळे ठेवीदार आता गुंतवणूकीचे अन्य पर्याय शोधण्याच्या मार्गावर आहे.

गुंतवणुकीचे इतर पर्याय
मुदत ठेवींवर मिळणारे व्याजदर कमी होण्याची शक्‍यता असल्याने आता गुंतवणुकीच्या इतर पर्यायांचा विचार होणे गरजेचे आहे. म्हणजेच म्युच्युअल फंड, डेट फंड किंवा शेअर बाजार यासारखे मुदत ठेवींपेक्षा अधिक व्याज देणारे पर्याय उपलब्ध आहेत.

'मुदत ठेवी'च पाहिजे तर दीर्घ मुदतीची हवी
सुरक्षितता आणि निश्‍चित परताव्यासाठी जर मुदत ठेवींनाच पसंती द्यायची असेल तर अशा परिस्थितीत दीर्घकालीन मुदतठेवी ठेवाव्या लागतील. बॅंकांमध्ये दीर्घकालावधीसाठी मुदत ठेवी ठेवल्यास त्यावर मिळणारे व्याज हे अधिक असते. त्यामुळे सध्या बॅंकेत व्याजदर कमी होण्यापुर्वी दीर्घ कालावधीच्या मुदत ठेवी फायदेशीर ठरू शकतात. परिणामी अधिक व्याज घेता येऊ शकेल.

म्युच्युअल फंड
मुदत ठेवींना म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. म्युच्युअल फंडाच्या विविध योजना आहेत. त्यामध्ये इक्वीटी शेअर्स (समभाग) आधारित योजना, समभाग आणि कर्जरोखे यांचा संयोग असलेल्या योजना, इक्वीटी लिंक सेव्हिंग्स, म्युच्युअल फंडमध्ये नियमीतपणे दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवून दीर्घ मुदतीत भरघोस उत्पन्न मिळवू शकतो.

निश्‍चित कालावधीसाठी गुंतवणूक करायची असल्यास: "फिक्‍सड्‌ मॅंच्युरिटी' - एफएमपी
"फिक्‍सड्‌ मॅंच्युरिटी' हे निश्‍चित कालावधी डेब्ट योजना (क्‍लोज़ एंडेड डेट इनकम स्कीम्स) या प्रकारच्या योजनेत गणली जाते. यामध्ये मुदतपूर्तीचा कालावधी आधीच जाहीर केला जात असतो. शिवाय सर्वसाधारणपणे अशा योजनांची शेअर बाजारात नोंदणी केली जाते. या योजनेत जाहीर केलेल्या कालावधीतच गुंतवणूक करता येते, शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर गुंतवणूकदार ह्या योजनेच्या युनीटस्‌ शेअर बाजारात खरेदी-विक्री करु शकतो. शिवाय या योजनेतून मिळणा-या रक्कमेतून टीडीएस कापला जात नाही.

शेअर बाजार

शेअर बाजार हा देखील गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम उपाय आहे. गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची तयारी असल्यास शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. शेअर बाजारातील गुंतवणूक दीर्घ काळासाठी कायमच फायदेशीर ठरते. शेअर बाजारात विविध कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी करू शकतो. त्यामुळे अप्रत्यक्षपणे कंपनीला होणार नफा आपल्या पदरी पडून घेता येतो. शिवाय नफ्यातील कंपन्या लाभांश आणि बक्षीस शेअरची देखील घोषणा करत असतात, त्यामुळे बॅंकेतील ठेवीपेक्षा निश्चितच अधिक परतावा मिळतो. 

डेट फंड (कर्जरोखे आधारीत) योजना

डेट फंडमध्ये गुंतवणूक हि फक्त सरकारी/खाजगी कंपन्यांच्या कर्जरोखे (बॉंड), बँक ठेवी, मनी मार्केट इ. सुरक्षीत साधनांत केली जाते. अशा प्रकारच्या योजनेत व्याज दराच्या बदलाची, क्रेडिट रेटिंग बदलाची फक्त जोखीम असते. अशा योजनेत विविध कालावधीच्या मुदतीसाठीही गुंतवणूक करता येते. यात जोखीम अत्यल्प असते. 

मुदत ठेवी म्हणजे काय?

मुदत ठेव (एफडी) हा एक गुंतवणुकीचा दीर्घकाळापासूनचा लोकप्रिय पर्याय असून, एखादी व्यक्ती त्याच्याकडील शिल्लक रक्कम भविष्यातील खर्चाच्या तरतुदीसाठी ठराविक काळाकरिता गुंतवते. मुदत ठेवीमध्ये रक्कम गुंतविल्यावर त्यावर ठराविक काळासाठी बॅंक निश्‍चित व्याजदराने परतावा मिळतो. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर घाम गाळून कमावलेला आपल्या कष्टाचा पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवून जास्तीत जास्त व्याज मिळविण्याचा प्रयत्न करूयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com