डबल धमाका

प्राप्तिकर विभागाने करदात्यांना करात सूट
डबल धमाका

आपल्याकडे प्राप्तिकर विभागाने करदात्यांना करात सूट मिळावी म्हणून विविध कलमांअंतर्गत गुंतवणूक करण्याची तरतूद केलेली आहे. या कलमांमध्ये प्राप्तिकर विभागाने सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक केल्यास प्राप्तिकरात काही प्रमाणात सूट मिळते. जसे आरोग्य विम्याचा हप्ता ‘८० डी’ या कलमांतर्गत येतो किंवा आयुविम्याचा हप्ता ‘८० सी’ कलमांतर्गत येतो. या विविध कलमांपैकी सर्वांत प्रचलित असे ‘८० सी’ हे कलम आहे.

सध्याच्या तरतुदीनुसार या कलमांतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास प्राप्तिकरात सूट मिळते. या कलमाअंतर्गत प्रामुख्याने आयुविम्याचा हप्ता, गृहकर्जाचे मुद्दल, भविष्य निर्वाह निधीची रक्कम, मुलांची ट्युशन फी अशाप्रकारचे खर्च येतात. तरीसुद्धा दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक होत नसेल, तर गुंतवणूकदार हा टप्पा गाठण्यासाठी खालील गुंतवणुकींचा आधार घेतात.

१) पीपीएफ

२) एनएससी

३) बँक एफडी (५ वर्षांकरिता)

गुंतवणुकीचे हे प्रकार गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मात्र या गुंतवणुकींचा दीर्घावधीसाठी अभ्यास केला, तर असे लक्षात येते, की या गुंतवणुकींनी दिलेला परतावा हा एकतर महागाई दराएवढा आहे किंवा त्यापेक्षाही कमी आहे. तसेच या गुंतवणुकींचा लॉक-इन कालावधीसुद्धा मोठा आहे. ‘८० सी’ अंतर्गत अजून एक गुंतवणूक करता येते, ज्यामुळे करही वाचतो आणि दीर्घवधीसाठी परतावाही महागाई दरापेक्षा अधिक मिळतो. तसेच याचा लॉक-इन कालावधीसुद्धा इतरांच्या तुलनेत कमी आहे. ही गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंडातील ‘ईएलएसएस’मधील गुंतवणूक. गेल्या १५ वर्षांचा ‘ईएलएसएस’चा परतावा बघितला, तर सरासरी परतावा हा १४.५ टक्क्यांच्या आसपास आहे. इतर कोणत्याही करबचतीच्या गुंतवणुकीच्या परताव्यापेक्षा तो जास्त आहे.

सोबतच्या तक्त्यावरून हे सहज लक्षात येते, की दीर्घावधीसाठी केलेली ‘ईएलएसएस’मधील गुंतवणूक ही कर वाचवतेच, त्याचबरोबर मोठा परतावाही देते. आपल्याकडे बहुतांशी गुंतवणूकदार हे करबचतीसाठी ‘पीपीएफ’ अकाउंट उघडतात आणि त्यात कमीतकमी १५ वर्षे तरी गुंतवणूक करतात. गुंतवणूकदारांना तेवढीच रक्कम ‘ईएलएसएस’मध्ये टाका, असे सांगितले, तर ते घाबरतात. ‘पीपीएफ’मधील गुंतवणुकीचे सातत्य आपण ‘ईएलएसएस’मध्ये ठेवले, तर किती मोठा परतावा मिळू शकतो, हे या तक्त्यावरून दिसतेच.

कलम ‘८० सी’ अंतर्गत करबचतीसाठी आयुर्विमा आणि इतर गुंतवणूक केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते. त्याची १२ महिन्यात विभागणी करून दरमहा ‘एसआयपी’ करावी. म्हणजे आपल्याला ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा’ही फायदा मिळेल, असे माझे मत आहे. तर गुंतवणूकदारांनो, यावर्षीपासून करबचतीसाठी नक्कीच ‘ईएलएसएस’चा वापर करा आणि करबचतीबरोबरच दीर्घ कालावधीमध्ये मोठा परतावाही मिळवा. आहे ना डबल धमाका!

(लेखक हे किरण जाधव अँड अससोसिएट्स येथे म्युच्युअल फंड तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

गुंतवणुकीचा प्रकार - पीपीएफ - एनएससी - बँक एफडी - ईएलएसएस

रक्कम प्रतिवर्ष - १,५०,००० - १,५०,००० - १,५०,००० - १,५०,०००

कालावधी-१५ वर्षे-१५ वर्षे-१५ वर्षे-१५ वर्षे

सरासरी परतावा - ७.८०% - ६.६०% - ६.४०% - १४.५०%

एकूण गुंतवणूक - २२,५०,००० - २२,५०,००० - २२,५०,००० - २२,५०,०००

मूल्यांकन - ४१,७७,४५१ - ३७,८४,६३३ - ३७,२३,२६६ - ७३,७७,५१७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com