Income Tax Returns: ITR भरण्याचे 8 मोठे फायदे! इन्कम टॅक्स रिटर्न का भरला पाहिजे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income Tax

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. अशाच 8 फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

ITR भरण्याचे 8 मोठे फायदे! इन्कम टॅक्स रिटर्न का भरला पाहिजे?

sakal_logo
By
शिल्पा गुजर

Income Tax Returns: सध्या 2020-21 या वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेकांचा पगार इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नाही किंवा आला तरी आयटीआर भरण्याची गरज नाही असे त्यांना वाटते. पण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. अशाच 8 फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

1. महत्त्वाचा उत्पन्नाचा पुरावा (Income Proof)

आयकर रिटर्न भरल्यावर करदात्यांना (taxpayers) सर्टिफिकेट मिळते. हा सरकारी पुरावा आहे, जो व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दर्शवतो. क्रेडिट कार्ड, कर्ज घेण्यासाठी उत्पन्नाचा हाच नोंदणीकृत पुरावा मदत करतो.

2. तुम्हाला कर परताव्यासाठी (Tax Refund) भरा आयटीआर

काही लोकांचे इन्कम स्लॅब टॅक्सच्या कक्षेत येत नाही, तरीही काही वेळेस TDS कापला जातो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला परतावा (Return) हवा असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे. आयटीआर दाखल केल्यानंतर, आयकर विभाग त्याचे मूल्यांकन करतो. त्यानुसार तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात परतावा दिला जातो.

3. व्यवसाय सुरू करण्यासाठी ITR आवश्यक

व्यवसाय सुरू करण्यासाठीही आयकर रिटर्न भरणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणत्याही विभागाकडून कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल तर आयटीआर कामाला येईल. कोणत्याही सरकारी विभागात कंत्राट पाहिजे असल्यास मागच्या 5 वर्षांचा आयटीआर आवश्यक आहे.

4. कर्ज मिळवणे सोपे

कर्ज घेताना तुमच्या उत्पन्नाचा पुरावाही पाहिला जातो. विशेषत: गृहकर्जाच्या बाबतीत, उत्पन्नाचा पुरावा म्हणून तीन वर्षांचा ITR मागितला जातो. हे सर्व सरकारी आणि निमसरकारी बँकांना लागू आहे. तुम्ही ITR शिवाय कर्जासाठी अर्ज केल्यास बँका ते नाकारू शकतात. तुम्ही नियमितपणे ITR फाइल केल्यास, तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

5. आयटीआर हा अॅड्रेस प्रूफही

इन्कम टॅक्स रिटर्न मॅन्युअली भरल्यावर आयकर रिटर्नची पावती नोंदणीकृत पत्त्यावर पाठवली जाते. यासोबत तो पत्ता म्हणूनही स्वीकारला जातो.

6. जास्तीच्या विमा संरक्षणासाठी आयटीआर आवश्यक

इंश्युरंन्स कव्हर जास्त पाहिजे असेल किंवा 1 कोटी रुपयांपर्यंतच्या टर्म प्लॅनसाठी ITR पाहिला जातो. उत्पन्नाचा स्रोत ( Income Source )आणि परतफेडीची स्थिती तपासण्यासाठी कंपन्या ITR मागतात.

7. व्हिसासाठी आयटीआर आवश्यक

दुसऱ्या देशात जाण्यापूर्वी व्हिसा आवश्यक असतो. व्हिसासाठी अर्ज करताना, तुम्हाला आयकर रिटर्नसाठी विचारले जाते. व्हिसा अधिकारी 3 ते 5 वर्षांचा ITR मागू शकतात. आयटीआरद्वारे हे तपासले जाते की जी व्यक्ती आपल्या देशात येत आहे किंवा येऊ इच्छित आहे, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे. म्हणूनच ITR भरणे आवश्यक आहे.

8. शेअर्समधील तोटा झाल्यास काय करावे ?

शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही आयटीआर हा एक चांगला स्रोत आहे. शेअर्समध्ये नुकसान झाल्यास, तोटा पुढील वर्षात कॅरी फॉरवर्ड (carry forward) करण्यासाठी दिलेल्या मुदतीत आयटीआर भरणे आवश्यक आहे. पुढील वर्षात नफा झाल्यास, तोटा नफ्याच्या तुलनेत ॲडजस्ट केला जाईल आणि तुम्हाला कर (Tax) सूटमध्ये लाभ मिळेल.

loading image
go to top