लोकप्रियतेत ‘इंडेक्‍स फंड’ मागे

किरण रानडे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

प्रख्यात गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांनी त्यांच्या ट्रस्टींना सांगितले आहे, की त्यांच्या मृत्यूनंतर जी रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी ठेवली आहे, त्यामधील १० टक्के रक्कम अल्प मुदतीच्या सरकारी रोख्यांमध्ये ठेवून, बाकी ९० टक्के एस अँड पी ५०० या व्हॅनगार्ड इंडेक्‍स फंडामध्ये गुंतवावी. याला कारण म्हणजे स्वतः बफे इंडेक्‍स फंड सुरक्षित मानतात व त्याचा खर्च अत्यल्प असल्यामुळे अधिक परतावा मिळू शकतो, असा त्यांना विश्‍वास आहे. व्हॅनगार्ड हा एस अँड पी ५०० वर आधारित इंडेक्‍स फंड अमेरिकेत बराच लोकप्रिय आहे.

प्रख्यात गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांनी त्यांच्या ट्रस्टींना सांगितले आहे, की त्यांच्या मृत्यूनंतर जी रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी ठेवली आहे, त्यामधील १० टक्के रक्कम अल्प मुदतीच्या सरकारी रोख्यांमध्ये ठेवून, बाकी ९० टक्के एस अँड पी ५०० या व्हॅनगार्ड इंडेक्‍स फंडामध्ये गुंतवावी. याला कारण म्हणजे स्वतः बफे इंडेक्‍स फंड सुरक्षित मानतात व त्याचा खर्च अत्यल्प असल्यामुळे अधिक परतावा मिळू शकतो, असा त्यांना विश्‍वास आहे. व्हॅनगार्ड हा एस अँड पी ५०० वर आधारित इंडेक्‍स फंड अमेरिकेत बराच लोकप्रिय आहे. पण, भारतात मात्र म्युच्युअल फंडांचे इंडेक्‍स फंड एक तर लोकांना विशेष माहीत नाहीत आणि तसेच ते अजूनही फारसे विकले गेलेले दिसत नाहीत, असे का असावे? पाहूया.

इंडेक्‍स फंड ज्या इंडेक्‍सवर आधारित असतात (म्हणजे निफ्टी ५० अथवा बीएसई सेन्सेक्‍स), त्या इंडेक्‍समधील शेअर्समध्ये त्या इंडेक्‍समधील शेअर्सच्या त्याच वजनाप्रमाणे (वेटेज) गुंतवणूक करतात. जर निफ्टी ५० यावर आधारित फंड असेल, तर या इंडेक्‍समध्ये असलेल्या शेअर्सच्या प्रतिबिंबाप्रमाणे गुंतवणूक केली जाते. उदाहरणार्थ, निफ्टी ५० मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचे वजन ८.५ टक्के आहे. त्यामुळे या इंडेक्‍सवर आधारित फंडांमध्ये ‘रिलायन्स’चे प्रमाण ८.५ टक्‍क्‍यांच्या जवळपास ठेवण्याचा प्रयत्न केला जातो व त्यात जी तफावत असेल, त्याला ‘ट्रॅकिंग एरर’ म्हणतात. जितकी ‘ट्रॅकिंग एरर’ कमी, तितका फंड चांगला मानला जातो.

सर्व इंडेक्‍स फंड निष्क्रिय (पॅसिव्ह) या प्रकारात मोडतात व अशा फंडांच्या मॅनेजरचे मुख्य काम इंडेक्‍सच्या वजनाप्रमाणे सर्व शेअर घेणे, हे असते. त्यामुळे या फंडांचा खर्च कमी असतो आणि म्हणून गुंतवणूकदाराला मॅनेजमेंट फी कमी पडल्याने जास्त परतावा मिळण्याची शक्‍यता असते. परंतु, असे असूनसुद्धा प्रत्यक्षामध्ये चांगल्या सक्रिय (ॲक्‍टिव्ह) फंडांच्या तुलनेत इंडेक्‍स फंडांनी दिलेला परतावा दीर्घ मुदतीत कमी आहे. उदाहरणार्थ, ऑगस्ट-सप्टेंबर २००२ मध्ये सुरू केलेल्या एका इंडेक्‍स व दोन सक्रिय फंडांची कामगिरी सोबतच्या चौकटीप्रमाणे आहे.

याचप्रमाणे इतर फंडांच्या इंडेक्‍स फंडाची इतर सक्रिय फंडांशी तुलना केल्यास असे लक्षात येईल, की जरी कमी मुदतीत (म्हणजे एक वर्षापर्यंत) इंडेक्‍स फंडाचा परतावा थोडा चांगला असला, तरी दीर्घ मुदतीत सक्रिय फंड अधिक चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.

हे असे का होत आहे, याची कारणमीमांसा केल्यास लक्षात येते, की निफ्टी ५० इंडेक्‍समध्ये केवळ ५० शेअर समाविष्ट आहेत, तर बीएसई सेन्सेक्‍समध्ये एकूण ३१ शेअर. निफ्टी ५० मध्ये फक्त एचडीएफसी व बॅंक, रिलायन्स, आयटीसी व इन्फोसिस या पाच शेअरचे वजन ३८ टक्के आहे, तर बीएसई सेन्सेक्‍समध्ये ४५.८ टक्के आहे. त्यामुळे हे दोन्ही इंडेक्‍स खऱ्या अर्थाने शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करत नाहीत. त्याचप्रमाणे अशोक लेलॅंड, एमआरएफ, बायोकॉन, कोलगेट, ओरॅकल यांसारख्या अनेक कंपन्यांना (ज्यांचा पीई रेशो १६ ते ४० पेक्षा अधिक आहे) इंडेक्‍समध्ये प्रतिनिधित्व नाही. पण या उलट अनेक सक्रिय (ॲक्‍टिव्ह) फंडांनी कोणतेही चांगले शेअर घेण्याच्या स्वातंत्र्यामुळे इंडेक्‍स फंडांपेक्षा थोडी अधिक चांगली कामगिरी नोंदविली आहे. याला अपवाद आयसीआयसीआय प्रू निफ्टी नेक्‍स्ट ५० ईटीएफ, एसबीआय नेक्‍स्ट ५० ईटीएफ यांसारख्या थोड्या फंडांचा आहे. पण ईटीएफ फंडात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते आवश्‍यक असते. 

निफ्टी नेक्‍स्ट ५० या इंडेक्‍समध्ये बायोकॉन, कोलगेट यांसारख्या कंपन्यांचा समावेश असला, तरी इन्फोसिस, एचडीएफसी, रिलायन्स यांसारख्या लार्ज कॅप शेअरचा समावेश नाही. त्यामुळे बीएसई सेन्सेक्‍स किंवा निफ्टी ५० आणि निफ्टी नेक्‍स्ट ५० अशा दोन्ही इंडेक्‍सवर आधारित दोन फंडांत गुंतवणूक करायची, का सक्रिय फंड निवडायचा, याचा निर्णय गुंतवणूकदारांना घ्यावा लागेल. 

अमेरिकेतील एस अँड पी ५०० प्रमाणे एस अँड पी बीएसई ५०० या इंडेक्‍सवर आधारित एक इंडेक्‍स फंड आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू केला आहे. तो ईटीएफ आहे. या फंडाची पुढील काही काळात कशी वाटचाल होते, ते पाहून गुंतवणूकदारांना निर्णय घेता येईल. 
थोडक्‍यात, आपल्या बाजाराचे अधिक चांगले प्रतिनिधित्व करणारा इंडेक्‍स आला व त्यावर आधारित इंडेक्‍स फंड निघाले, तर गुंतवणूकदार त्याकडे निश्‍चितच ओढले जातील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Index Fund Investment