esakal | भारत बाँड ईटीएफ गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

india-bond-etf-investment

भारत बाँड ईटीएफ या भारताच्या पहिल्या कॉर्पोरेट डेट ईटीएफची दुसरी मालिका १४ जुलैपासून १७ जुलैपर्यंत विक्रीसाठी खुली होत आहे. यानिमित्ताने या आकर्षक गुंतवणूक पर्यायाविषयी जाणून घेऊया.

भारत बाँड ईटीएफ गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय

sakal_logo
By
डॉ. दिलीप सातभाई

एडलवाईज म्युच्युअल फंडाद्वारे व्यवस्थापित भारत बाँड ईटीएफ (एक्‍सचेंज ट्रेडेड फंड) या भारताच्या पहिल्या कॉर्पोरेट डेट ईटीएफची दुसरी मालिका १४ जुलैपासून १७ जुलैपर्यंत विक्रीसाठी खुली होत आहे. यानिमित्ताने या आकर्षक गुंतवणूक पर्यायाविषयी जाणून घेऊया.

कॉर्पोरेट डेट ईटीएफ म्हणजे काय?
ज्या कंपन्यांना कर्जाची आवश्‍यकता असते, त्या कंपन्या बाँड ईटीएफचे व्यवस्थापन करणाऱ्या फर्मकडे जातात. बाँड ईटीएफ गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते आणि निश्‍चित मुदतीसाठी त्यांना अंतर्निहित कंपन्यांच्या स्वाधीन करते. कार्यकाळ संपल्यानंतर, या कंपन्या ईटीएफला रक्कम परत देतात, जे नंतर ती गुंतवणूकदारांना परत करतात. यात गुंतवणूकदारांना कंपन्यांची मालकी खरेदी केलेल्या युनिट्‌सच्या आधारे इक्विटी ईटीएफप्रमाणे दिली जात नाही, हे याचे वेगळेपण आहे. त्याऐवजी, हे फंड सरकारी मालकीच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांकडून रास्त दरात कर्ज घेण्याची संधी उपलब्ध करून देतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणत्या सरकारी कंपन्यांचा सहभाग?
या योजनेत सुमारे २२ सरकारी कंपन्यांचे रोखे (बाँड) असतील. पाच वर्षांच्या बाँडमध्ये १३ सरकारी कंपन्या असतील व त्यात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, नाबार्ड व आरइसी यांचा मोठा सहभाग असेल, तर ११ वर्षांच्या बाँडमध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन व आरइसी यांचा मोठा सहभाग असेल.

कालावधी, किमान व कमाल रक्कम
पहिला ईटीएफ ११ वर्षे कालावधीचा असून, त्याची मुदतपूर्ती एप्रिल २०३० मध्ये, तर दुसरा ईटीएफ ५ वर्षांचा असून, त्याची मुदतपूर्ती एप्रिल २०२५ मध्ये होणार आहे. किमान गुंतवणूक एक हजार रुपयांची करावी लागेल, तर कमाल रु. दहा लाख आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोठे गुंतवणूक करणार?
भारत बाँड ईटीएफ सुरवातीला या ‘एएए’ मानांकीत कंपन्या आणि बाँडमध्ये गुंतवणूक करणार आहेत.

इतर वैशिष्ट्ये काय?
भारत बाँड ईटीएफ हा कमी खर्चाचे प्रमाण असलेला सरकारने सुरू केलेला क्‍लोज एंडेड फंड आहे. यात खर्चाचे प्रमाण रु. १० लाख उलाढालीमागे रु. ५ इतके कमी असल्यामुळे गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण वाढेल.

निश्‍चित कालावधीसाठी बॅंकांमध्ये मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी रु. ५ लाखांपेक्षा अधिक करपात्र उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी जोखीम घेऊ इच्छिणारा गुंतवणूकदार असल्यास, या फंडामध्ये एक छोटासा भाग गुंतवून उत्पन्न आश्वस्त करून घेऊ शकतो.

या फंडामधील मूलभूत बाँड फक्त ‘एएए’ दर्जाच्या सरकारी मालकीच्या कंपन्यांद्वारे जारी केले जाणार असल्याने व त्यास भारत सरकारची हमी असल्याने गुंतवणूक सुरक्षित राहील.

जे करदाते मध्यम व उच्च प्राप्तिकर दराच्या गटवारीत असतील, त्यांना हा ईटीएफ फायदेशीर ठरणार. ३६ महिन्यांनंतर मिळणाऱ्या उत्पन्नावर ‘इंडेक्‍सेशन’च्या फायद्यासह २० टक्के दराने भांडवली लाभ मोजला जाणार आहे. त्यामुळे बॅंकांतील मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर उपलब्ध नसणारा हा फायदा मिळून कमी कर द्यावा लागणार असल्याने वाढीव उत्पन्न हाती मिळेल. या गुंतवणुकीमध्ये दरवर्षी उत्पन्न किंवा परतावा देण्याची तरतूद नसून, उत्पन्न किंवा परतावा हा मूळ मुद्दलात समाविष्ट करण्याची तरतूद आहे. ती वृद्धी (ग्रोथ) या सदरात  गुंतवणूक समाविष्ट केली आहे. हा फंड बॅंकांत ठेवलेल्या मुदत ठेवींच्या तुलनेत अधिक परतावा देईल, अशी अपेक्षा आहे.   

हे बाँड केवळ डीमॅट फॉर्ममध्येच मिळणार आहेत. ज्यावेळी पैशाची आवश्‍यकता असेल, त्यावेळी शेअर बाजारात याची विक्रीद्वारे देवाण-घेवाण सहजपणे करता येऊ शकते.

या बाँडच्या निव्वळ मालमत्ता मूल्याच्या (एनएव्ही) माहितीची पारदर्शकता जपण्यासाठी गुंतवणूकदारास आवश्‍यकता असेल, तेव्हा लाइव्ह निव्वळ मालमत्ता मूल्य मिळू शकेल. निधीच्या पोर्टफोलिओची माहितीदेखील संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर केली जाणार असल्याने गुंतवणूकदारांना निधी गुंतवणूक व जोखीम जाणून घेण्यास मदत होणार आहे.
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट - सीए आहेत.)