esakal | India: अर्थव्यवस्थेला बळकटी : औद्योगिक उत्पादनात ११ टक्के वृद्धी
sakal

बोलून बातमी शोधा

market

अर्थव्यवस्थेला बळकटी : औद्योगिक उत्पादनात ११ टक्के वृद्धी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे प्रभावित झालेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्ववत असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोळसा, नैसर्गिक वायू, पोलादासह ८ प्रमुख समजल्या जाणाऱ्या उद्योगांच्या उत्पादनात ऑगस्ट महिन्यात वार्षिक आधारावर ११.६ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात याच प्रमुख उद्योग क्षेत्रातील उत्पादनात ६.९ टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) कोळसा, नैसर्गिक वायू, कच्चे तेल, रिफायनरी उत्पादने, पोलाद, वीज आणि सिमेंटचा वाटा ४०.२७ टक्के राहिला आहे. प्रमुख उद्योग क्षेत्रातील वृद्धीचा हा सलग तिसरा महिना आहे. आकडेवारीनुसार कोळसा, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, पोलाद, वीज आणि सिमेंटचे उत्पादन २०२१ मध्ये वार्षिक आधारावर वृद्धी दर्शवत आहेत. तर दुसरीकडे कच्चे तेल आणि खत उद्योगाच्या उत्पादनात घसरण झाल्याचे दर्शवले जात आहे. औद्योगिक उत्पादनातील वृद्धीमुळे रोजगार वाढीचेही सकारात्मक संकेत मिळत आहेत.

रोजगाराच्या संधी वाढल्या

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या आर्थिक सल्लागार कार्यालयाने ऑगस्ट २०२१ साठी आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक जाहीर केला आहे. या उद्योगांचा संयुक्त निर्देशांक जुलै २०२१ मध्ये १३४ होता, यात जुलै २०२० च्या तुलनेत ९.४ टक्के वृद्धी झाली होती. त्यामुळे ऑगस्ट २०२१ मध्ये औद्योगिक उत्पादनात वाढ नोंदविल्याने आर्थिक उलाढालीही वाढल्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे पुन्हा रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

निर्देशांकांची गटांगळी सुरूच

मुंबई : नफावसुलीमुळे आज भारतीय शेअरबाजार निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशीही घसरला. आज सेन्सेक्स २८६.९१ अंश, तर निफ्टी ९३.१५ अंशांनी घसरला. आजही सेन्सेक्सने ५९ हजारांचा स्तर कसाबसा टिकवून धरला. आज औषधनिर्मिती कंपन्या, तसेच वित्तसंस्था यांचे शेअर वाढले; तर बँका, धातूनिर्मिती, आयटी आणि वाहन उद्योग यांच्या शेअरचे भाव पडले. आज दिवसभर सेन्सेक्स ५९ हजारांच्या आसपास होता. त्याला व्यवहारादरम्यान ६० हजारांना स्पर्श करता आला नाही. मात्र त्याने ५९ हजारांच्या खाली गेला नाही. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ५९,१२६ अंशांवर टिकून राहिला, तर निफ्टी १७,६१८ अंशांवर स्थिरावला.

loading image
go to top