भारताचा विकासदर अपेक्षेपेक्षा खूपच कमी - आयएमएफ

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

कॉर्पोरेट क्षेत्रातील सुस्ती, हवामान अस्थिरता तसेच अडचणीत आलेल्या "एनबीएफसी' क्षेत्रातील कंपन्यांमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण नोंदवली असून, तो अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केले. दुसरीकडे, अमेरिका चीनमधील व्यापार संघर्षाची झळ जागतिक अर्थव्यवस्थेला बसत असून, यामुळे 2020 मध्ये विकासदरात 0.8 टक्‍क्‍यांची घसरण होईल, असा अंदाजही "आयएमएफ'ने वर्तविला आहे.

वॉशिंग्टन - कॉर्पोरेट क्षेत्रातील सुस्ती, हवामान अस्थिरता तसेच अडचणीत आलेल्या "एनबीएफसी' क्षेत्रातील कंपन्यांमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण नोंदवली असून, तो अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केले. दुसरीकडे, अमेरिका चीनमधील व्यापार संघर्षाची झळ जागतिक अर्थव्यवस्थेला बसत असून, यामुळे 2020 मध्ये विकासदरात 0.8 टक्‍क्‍यांची घसरण होईल, असा अंदाजही "आयएमएफ'ने वर्तविला आहे.

विकासदरात लक्षणीय घट झाली असली, तरी जगात सर्वांत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख अद्याप टिकून आहे. चिनी अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सरस असल्याचेही "आयएमएफ'ने या वेळी नमूद केले. तत्पूर्वी, "आयएमएफ'ने 2019 व 2020 साठी भारताच्या विकासदराचा अंदाज जुलैमध्ये 0.3 टक्‍क्‍यांनी घटवत तो अनुक्रमे 7 आणि 7.2 टक्‍क्‍यांवर आणला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेबाबत बोलताना "आयएमएफ'चे प्रवक्ते गेरी राइस म्हणाले, 'व्यापार संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत असून, 2007-08 च्या जागतिक मंदीनंतर प्रथमच उत्पादन क्षेत्राची अवस्था इतकी दयनीय झाली आहे. भू-राजकीय तणाव, अनिश्‍चितता, गुंतवणुकीचा घटलेला ओघ आदी कारणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मगरळ असून, व्यापार संघर्षाचा नकारात्मक परिणाम तिच्यावर उमटायला सुरवात झाली आहे.''

दरम्यान, "आयएमएफ'कडून आपला सुधारित आर्थिक अहवाल पुढील महिन्यात प्रसिद्ध केला जाणार असून, त्याबाबत अधिक माहिती देण्याचे राइस यांनी टाळले.

'आयएमएफ'चा अहवाल आपण अद्याप पाहिलेला नाही. मात्र, व्यापार संघर्षाचा अमेरिकेवर फार मोठा परिणाम होईल, असे वाटत नाही.
- स्टीव्हन म्नुचिन, अमेरिकेचे अर्थमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias growth rate is much lower than expected IMF