पारले जी: 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट 

वृत्तसंस्था
Wednesday, 21 August 2019

देशातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी असलेली पारले कंपनीतील दहा हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे

मुंबई: भारतात मंदीचे ढग अधिक गडद होऊ लागले आहेत. आता लोकप्रिय आणि देशातील सर्वात मोठी बिस्किट कंपनी असलेली पारले कंपनीतील दहा हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मंदीमुळे बिस्किटाची बाजारातील मागणी खूप कमी झाली आहे.  पारले समूहाचा व्यवसाय मोठा असून बिस्कीट ब्रँड पारले जी, मोनॅको, मिलानो, हाईड अँड सीक बिस्कीट आणि मँगो बाईट टॉफिजचा यांची एकत्रित उलाढाल जवळपास 10 हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. सध्या कंपनीत सुमारे 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. पारलेकडून विविध उत्पादनाशीसंबंधित 10 कंपन्या चालवल्या जातात. 

''आता सरकारकडे 100 रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किंमतीच्या बिस्किटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. ग्राहकांना कमी पैशात बिस्कीट पुरविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पारलेजी बिस्किटाची पाच रुपये किंवा त्याहून कमी किंमतीच्या पाकिटातून विक्री होते. पण जर सरकारने जीएसटी आणि इतर मागण्या मान्य केल्या नाहीत तर विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या 8 ते 10 हजार जणांना रोजगार गमावावा लागणार आहे.'', अशी माहिती कंपनीचे कॅटेगरी हेड मयंक शाह यांनी एका दैनिकाला दिली आहे. 

कंपनींच्या उत्पादनाची 50 टक्के विक्री ही ग्रामीण भागांतील बाजारापेठांवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनच मागणी कमी झाल्याने आता उद्योगासमोर संकट उभे राहिले आहे. ग्राहकांकडूनच बिस्किटांची मागणी घटल्यामुळे किरकोळ विक्रेतेही खरेदी करत नाहीत. अधिक जीएसटी आकारल्याने उपभोक्त्यांकडून मागणी घटली आहे. शिवाय सरकारकडून यावर कोणतीही पावले उचलली जात नाहीये. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. 

पारलेची 1929 रोजी स्थापना झाली होती. आज पारलेची बिस्कीट ब्रँड पारले जी, मोनॅको, मिलानो, हाईड अँड सीक बिस्कीट आणि मँगो बाईट टॉफिज, पॉपिन्स असे विविध ब्रँड प्रसिद्ध आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias Largest Biscuit-Maker Parle May Fire Up To 10000 Amid Slowdown