ऑगस्टमध्ये महागाई डोईजड! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

यंदा किरकोळ चलनवाढ 10 महिन्यांच्या उच्चांकावर गेली आहे.

नवी दिल्ली : भाजीपाला, डाळी यांसह मांस, मच्छीच्या किमती वधारल्याने किरकोळ बाजारात महागाई वाढली आहे. ऑगस्टमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढीचा (सीपीआय) दर 3.21 टक्‍क्‍यांवर गेला असून, हा गेल्या दहा महिन्यांतील उच्चांकी स्तर आहे. 

यापूर्वी ऑक्‍टोबर 2018 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 3.38 टक्‍क्‍यांवर गेला होता. तत्पूर्वी ऑगस्ट 2018 मध्ये तो 3.69 टक्के होता. सरकारने गुरुवारी (ता.12) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थातील चलनवाढ गेल्या महिन्यात 2.99 टक्के राहिली. जुलैमध्ये हीच दरवाढ 2.36 टक्के होती. मांस व मच्छीतील चलनवाढीचा दर ऑगस्टमध्ये 8.51 टक्के नोंदविला; तर भाजीपाला, डाळी व इतर उत्पादनांतील चलनवाढ अनुक्रमे 6.9 आणि 6.94 टक्के राहिली. 

सांख्यिकी मंत्रालयाने या वेळी आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रातील चलनवाढीची आकडेवारीही जाहीर केली. त्यानुसार, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील चलनवाढ अनुक्रमे 7.84 आणि 6.10 टक्के असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, किरकोळ चलनवाढ रिझर्व्ह बॅंकेने निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार नियंत्रणात असल्याने रिझर्व्ह बॅंकेकडून रेपोदरात आणखी कपात केली जाण्याची शक्‍यता आहे. 

आसाम, कर्नाटकात भडका 
आसाम, कर्नाटक, उत्तराखंडमध्ये महागाईचा भडका उडाला असून, या राज्यांतील किरकोळ चलनवाढीचा दर ऑगस्टमध्ये अनुक्रमे 5.79, 5.47 आणि 5.28 टक्के नोंदविला. चंडीगडमध्ये हा पारा उणे 0.42 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. देशाच्या ग्रामीण व शहरी भागातील चलनवाढ अनुक्रमे 2.18 व 4.49 टक्के असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inflation high in August