‘इनपुट टॅक्‍स क्रेडिट’साठी काय करावे लागणार?

inputs tax credit
inputs tax credit

आवक पुरवठ्यावरील कराची वजावट अर्थात "इनपुट टॅक्‍स क्रेडिट' हा "जीएसटी'मधील महत्त्वाचा भाग असेल. खरेदीवरील आणि इतर व्यावसायिक खर्चावर भरलेल्या कराची वजावट विक्रीवरील कर भरण्यासाठी पूर्णपणे मिळणे हा मूल्यवर्धित कर प्रणालीचा मुख्य गाभा आहे. अशी वजावट सरकार सहजपणे देत नाही. त्यासाठी अनेक नियम-उपनियम केले आहेत.

खरेदीवर भरलेल्या कराचे क्रेडिट मिळण्यासाठी पुढील कागदपत्रांची आणि अटींची पूर्तता करावी लागेल.
1) वस्तू व सेवा पुरवठासंबधी टॅक्‍स इन्व्हॉइस असणे आवश्‍यक आहे. वस्तूचा पुरवठा केला जातो, तेव्हा साधारणतः टॅक्‍स इन्व्हॉइस दिले जाते. सेवा घेताना मात्र या बाबत काळजी घेणे आवश्‍यक आहे.
2) वस्तू व सेवेचा प्रत्यक्ष पुरवठा झालेला असला पाहिजे. पुरवठा न करताच बिल दिले असेल तर जोपर्यंत पूर्ण पुरवठा होत नाही, तोपर्यंत टॅक्‍स क्रेडिट घेता येणार नाही.
3) ज्याने वस्तू व सेवेचा पुरवठा केला आहे, त्याने त्याच्या "रिटर्न'मध्ये हा व्यवहार दाखविला पाहिजे.
4) त्यावरील कर विक्रेत्याने पूर्णपणे भरला असला पाहिजे. क्रेडिट घेण्यासाठी त्या रकमेची इलेक्‍ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये नोंद असेल तर क्रेडिट मिळेल.
काही वस्तू व सेवा अथवा व्यवहारांवर "इनपुट क्रेडिट' घेता येणार नाही. ते थोडक्‍यात असे आहेत-
1) मोटार वाहनावर जो कर भरलेला असेल, त्याचे क्रेडिट घेता येणार नाही. मात्र याला काही अपवाद केले आहेत. वाहन विक्रीचा व्यवसाय असेल तर; तसेच प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, मोटार चालविण्याचे शिक्षण देणे अशा सेवा देण्यासाठी जर मोटार वाहन खरेदी केली असेल तर त्यांना टॅक्‍स क्रेडिट घेता येईल.
2) खालील वस्तू वा सेवा यांचा पुरवठा:
1) अन्न पदार्थ, पेय, आउटडोअर केटरिंग, सौंदर्य प्रसाधने व सेवा, आरोग्य सेवा, सौंदर्य व प्लॅस्टिक सर्जरी, या जर जावक पुरवठ्यासाठी केल्या नसतील तर.
2) क्‍लब, आरोग्य आणि तंदुरुस्ती सेवा
3) भाड्याने टॅक्‍सी, आयुर्विमा, आरोग्य विमा. मात्र जर सरकारने घोषित केलेल्या आणि कोणत्याही कायद्याने मालकाने नोकरास ज्या सेवा देणे बंधनकारक असेल तर त्यावर क्रेडीट घेता येईल. तसेच अशा वस्तू वा सेवेचा जावक पुरवठा करण्यासाठी घेतल्या असतील, तर क्रेडिट घेता येईल.
3) अंतिमतः अचल मालमत्ता म्हणजे इमारत आदी उभारण्यासाठी प्लांट आणि मशिनरी उभी राहत असेल तर त्या वस्तू व सेवांवर टॅक्‍स क्रेडिट घेता येईल.
4) ज्या वस्तू अथवा सेवा खासगी आणि वैयक्तिक कारणासाठी वापरल्या असतील त्या प्रमाणात टॅक्‍स क्रेडिट घेता येणार नाही.
5) हरवलेल्या, चोरीस गेलेल्या, नष्ट झालेल्या, हिशेबातून काढलेल्या तसेच भेट किंवा नमुना म्हणून मोफत दिलेल्या वस्तूंबाबत क्रेडिट घेता येणार नाही.
6) भांडवली वस्तूंवर प्राप्तिकर कायद्यानुसार घसारा घेता येतो. ज्या भांडवली वस्तूंवर "जीएसटी'मध्ये टॅक्‍स क्रेडीट घेता येते, त्या कराची रक्कम घसारा घेताना किमतीतून वजा न करता जर घसारा घेतला असेल तर "जीएसटी'मध्ये टॅक्‍स क्रेडिट घेता येणार नाही.
या शिवाय करमाफ पुरवठ्यासाठी जे इनपुट असेल त्यावर क्रेडीट घेता येणार नाही. हे नियम नीट समजून घेणे आवश्‍यक आहे. कारण जास्त क्रेडीट घेतल्यास आणि ते नंतर लक्षात आले तर त्यावरील कर व्याजासह भरावा लागेल.

शिल्लक मालावरील कर वजावट
एक जुलै 2017 रोजी जो आरंभी शिल्लक माल (स्टॉक) असेल, तो जेव्हा विकला जाईल त्यावर "जीएसटी' भरावा लागेल. मग त्या मालाच्या किमतीत अगोदरच्या कायद्यानुसार भरलेला कर समाविष्ट आहे, त्याची वजावट मिळणार का नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. जीएसटी कायद्यात त्यासाठी विशेष प्रकरण आहे. काही अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यास त्या करांची वजावट जीएसटी भरताना घेता येईल. मुख्य तरतुदी थोडक्‍यात पुढीलप्रमाणे-
अ) सेन व्हॅट क्रेडिट : जीएसटी लागू होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 30 जून 2017 रोजी संचित उत्पादनशुल्क/सेवाकर असेल तेवढी रक्कम जीएसटी भरण्यासाठी वापरता येईल. म्हणजेच जीएसटी ज्या दिवशी येईल, त्या दिवशी कच्चा माल शिल्लक असेल, उत्पादन प्रक्रियेत त्याचा वापर अर्धवट झाला असेल, सुरू असेल किंवा पूर्ण उत्पादन झालेल्या मालामध्ये त्याचा समावेश असेल, अशा सर्व प्रकारे शिल्लक उपलब्ध सेनव्हॅट क्रेडिट जीएसटीमध्ये वापरता येईल. त्याला दोन महत्त्वाच्या अटी आहेत-
1) जीएसटी कायद्यातील इनपुट टॅक्‍स क्रेडिटच्या तरतुदीनुसार त्याला प्रतिबंध नसावा. म्हणजे जीएसटीच्या इनपुट क्रेडिट नियमानुसारही कर वापरता येत असला पाहिजे.
2) जीएसटी लागू होण्याच्या अगोदरच्या सहा महिन्यांची "रिटर्न' भरलेली पाहिजेत.
ब) शिल्लक मालातील ड्युटीची रक्कम : उत्पादनशुल्क कायद्यानुसार रजिस्ट्रेशन घेणे आवश्‍यक नसले तरी काही व्यापाऱ्यांकडे ड्युटी पेड इन्व्हॉइस असतो. अशा

व्यापाऱ्यांना देखील शिल्लक मालातील टॅक्‍स क्रेडिट जीएसटीमध्ये वापरता येईल. मात्र, त्यासाठी काही अटी आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
1) त्या शिल्लक वस्तू जीएसटीमधील करपात्र वस्तू-सेवेचा पुरवठा करण्यासाठी वापरल्या पाहिजेत किंवा त्यासाठी वापरण्याचा उद्देश असला पाहिजे.
2) जीएसटीच्या इनपुट क्रेडिट नियमानुसारही कर वापरता येत असला पाहिजे.
3) अगोदरच्या कायद्याखालील कर भरल्याचा पुरावा म्हणून जे बिल/इन्व्हॉइस किंवा अन्य कागदपत्रे आवश्‍यक असतील, ती व्यापाऱ्याकडे असली पाहिजेत.
4) असे बिल/इन्व्हॉइस किंवा अन्य कागदपत्रे जीएसटी येईल, त्या दिवसाच्या 12 महिन्यांपूर्वीची नसावीत.
क) इतर व्यापारी : उत्पादन शुल्क लागू असणाऱ्या वस्तूंचा शिल्लक माल असेल; पण ड्युटी भरल्याच्या पुराव्यासाठी वर उल्लेख केलेली कागदपत्रे नसतील तरीही इनपुट टॅक्‍स क्रेडीट घेता येईल. त्यासाठी अशा शिल्लक मालाची माहिती स्वतंत्रपणे द्यावी लागेल. त्या मालाची विक्री होईल, त्यावर कर भरावा लागेल आणि जेवढा जीएसटी भरला असेल, त्याचा एकूण करदर 18 पेक्षा कमी असल्यास त्याच्या 40 टक्के रकमेचे क्रेडिट मिळेल. जर जीएसटी करदर 18 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 60 टक्के रकमेचे क्रेडिट मिळेल. वरील क्रेडिट हे सीजीएसटी आणि आयजीएसटी भरण्यासाठीच वापरता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com