‘शेअर बाजारात वाढतोय  छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग’

गौरव मुठे
Monday, 28 October 2019

सरलेल्या आर्थिक वर्षात नव्यानेच नोंदणी झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये ६८ टक्के गुंतवणूकदार पहिल्या १० शहरांपलीकडील आहेत... सांगत आहेत राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई) एमडी आणि सीईओ विक्रम लिमये.

गेल्या तीन ते पाच वर्षांत टिअर-२ आणि टिअर-३ शहरांमधील छोट्या गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात वाढत्या संख्येने गुंतवणूक होऊ लागली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात नव्यानेच नोंदणी झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये ६८ टक्के गुंतवणूकदार पहिल्या १० शहरांपलीकडील आहेत... सांगत आहेत राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई) एमडी आणि सीईओ विक्रम लिमये.

प्रश्न - राष्ट्रीय शेअर बाजाराने अलीकडेच रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले. या पार्श्‍वभूमीवर ‘एनएसई’चा देशाला कसा लाभ झाला आहे?
गेल्या २५ वर्षांत ‘एनएसई’ने भारतात इलेक्‍ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन मोठा बदल घडविला आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीने शेअर ट्रेडिंग करण्याची पद्धत मागे पडून व्यवहारांमधील कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली आहे. प्रत्येक गुंतवणूकदार किंवा ट्रेडरला समान संधी मिळते आहे. आमचा प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वोत्तम, जागतिक दर्जाचा, बाजाराची विश्वासार्हता जपणारा, नियामकांद्वारे बाजाराची सुरक्षितता सांभाळणारा, धोक्‍याचे योग्य नियमन करणारा आणि भारताला आत्मविश्वासाने भविष्याची वाटचाल करायला लावणारा आहे. ‘एनएसई’ने कंपन्यांनासुद्धा भांडवल उभारण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

प्रश्न - छोट्या शहरांमधील लहान गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात गुंतवणूक होते आहे का? 
पारंपरिकरीत्या महानगरांमधूनच शेअर बाजारातील बहुतांश गुंतवणूक येत आहे. मात्र, गेल्या तीन ते पाच वर्षांत टिअर-२ आणि टिअर-३ शहरांमधील छोट्या गुंतवणूकदारांकडून वाढत्या संख्येने गुंतवणूक होऊ लागली आहे. भारताच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. समाजाच्या सर्व स्तरांमधून शेअर बाजारात वाढत्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मुख्यत- मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू येथून मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येताना दिसत आहेत. एकूण गुंतवणुकीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यात राजकोट, बडोदा, लखनौ, नागपूर येथून मोठ्या प्रमाणावर नव्या गुंतवणूकदारांची नोंदणी होताना दिसते आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात नव्यानेच नोंदणी झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये ६८ टक्के गुंतवणूकदार पहिल्या १० शहरांपलीकडील आहेत. 

प्रश्न - लहान आणि मध्यम उद्योग- व्यवसायांबद्दल काय सांगाल? ‘एसएमई’ कंपन्यांसंदर्भात ‘एनएसई’ काय करते आहे?
लहान आणि मध्यम (एसएमई) स्वरूपाच्या उद्योगांना मदत करण्यात आणि त्यांना सक्षम करण्यात ‘एनएसई’ अग्रभागी आहे. ‘एनएसई’ने नेहमीच पारंपरिक मॅन्युफॅक्‍चरिंग कंपन्यांपासून ते नव्या अर्थव्यवस्थेतील स्टार्टअपपर्यंत, भांडवल उभारणीला गती मिळण्यासाठीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. ‘एसएमई’ हे फक्त अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठीचे नव्हे, तर रोजगारनिर्मितीसाठी आणि सर्वसमावेश विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आतापर्यंत ‘एनएसई इमर्ज’ व्यासपीठाच्या मदतीने २०० कंपन्यांची नोंदणी झाली आहे. ‘एनएसई इमर्ज’ आज जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आहे. जवळपास २२ कंपन्या ‘एनएसई’च्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत. ‘एसएमई’च्या चांगल्या ‘आयपीओ’साठी एक चांगली यंत्रणा उभी करण्यात यश आले आहे.

प्रश्न - ‘निफ्टी ५०’ निर्देशांक हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वांत महत्त्वाचा निर्देशांक आहे. या निर्देशांकाच्या यशामागचे रहस्य काय?
इतक्‍या वर्षांमध्ये ‘एनएसई’ हे भारतातील भांडवली बाजारासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून पुढे आले आहे. ‘एनएसई’च्या नव्या लोगोत ‘एन’ या मुळाक्षरावर भर देण्यात आला आहे. त्यातील चढता आलेख, वाढ आणि गती ही भारतीय भांडवली बाजाराची नवी दिशा दर्शवते. सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना उपयुक्त ठरू शकणाऱ्या विविध गुंतवणूक प्रकारांसाठी नवा नावीन्यपूर्ण निर्देशांक विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. 

प्रश्न - नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर ‘एनएसई’ने कारवाई केली आहे. गुंतवणूकदारांनी अशा कंपन्यांपासून सावध राहावे, यासाठीचा हा हशारा आहे का?
असे पाऊल ‘सेबी’च्या नियमावलीअंतर्गत उलचण्यात येते. ज्या कंपन्या नियमांचे पालन करीत नाहीत, त्यांच्यासंदर्भात ‘सेबी’ने विशिष्ट कार्यप्रणाली लागू केली आहे. गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुंतवणूकदारांच्या आर्थिक हितांची काळजी घेतली जावी, यासाठी ‘एनएसई समूह’ समर्पितपणे काम करतो. आता गुंतवणूकदारांमध्ये मोठा विश्वास निर्माण केल्यानंतर, नवनवे गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करायला नक्कीच सुरवात करतील, अशी आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interview CEO Vikram Limaye