‘हीच ती वेळ!’

‘हीच ती वेळ!’

सुमारे दोन वर्षांपूर्वी स्मॉल आणि मिड कॅप शेअर तेजीत होते. त्यानंतर म्हणजे फेब्रुवारी २०१८ पासून स्मॉल आणि मिड कॅप शेअरमध्ये पडझड सुरू झाली. त्यामुळे अनेक जण चिंतेत होते. परंतु नववर्षाच्या सुरुवातीपासून ही पडझड थांबलेली दिसत असून, अनेक शेअर आता हळूहळू वधारू लागले आहेत. मागील दोन वर्षांपासून अनेक गुंतवणूकदारांना एकच प्रश्‍न पडत असेल, की शेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करीत असताना आपल्या शेअरची पडझड का होत आहे?

नव्या पहाटेचे संकेत 
मागील दोन वर्षांत निर्देशांकात झालेली वाढ ही सर्वसमावेशक नव्हती, केवळ निवडक १०-१२ कंपन्यांमध्ये झालेली वाढ ही निर्देशांकांत दिसून येत होती. गेल्या दोन वर्षांत अनेक दशके जुन्या अशा नामांकित कंपन्या अडचणीत आल्या. त्यात दिवाण हाउसिंग फायनान्स, कॉक्‍स अँड किंग्ज, सिंटेक्‍स अशी अनेक नामांकित ग्रुप हे रसातळाला गेलेत. हा काळ अनेक स्मॉल आणि मिड कॅप; तसेच अनेक मोठ्या कंपन्यांसाठीसुद्धा कसोटीचा होता. केवळ मिड आणि स्मॉल कॅपच नव्हे, तर अनेक ब्लू चिप अथवा लार्ज कॅप कंपन्यासुद्धा २०१८ च्या उच्चांकापासून ६० टक्के ते ८५ टक्के सरले होते, परंतु अखेर नवी पहाट उजाडण्याचे संकेत या नववर्षात मिळत आहे. फक्त हे करताना सरसकट कोणत्याही कंपनीचे शेअर न घेता अभ्यासपूर्ण निवडलेले चांगले मिड आणि स्मॉल कॅप शेअरची यादी बनवून निर्णय घ्यायला हवा. शिवाय, स्मॉल आणि मिड कॅप म्युच्युअलद्वारे ही तुम्ही ही संधी हेरू शकता, दुसरा फायदा म्हणजे म्युच्युअल फंडमुळे तुमची जोखीम ही कमी करता येईल, फक्त हे करताना झटपट नफा मनात न ठेवता दीर्घकालीन गुंतवणुकीचाच विचार करावा. 

महत्त्व व्यवस्थापनाला! 
गेल्या अनेक वर्षांत एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे परदेशी आणि देशांतर्गत मोठे गुंतवणूकदार हे सर्वांत जास्त महत्त्व देतात ते कंपनीच्या व्यवस्थापनाला (Corporate Governance)! आपणही गुंतवणूक करताना हेच सूत्र लक्षात ठेवूनच सावध पावले उचलली पाहिजेत. अर्थसंकल्पानंतर आता बाजारातील अनिश्‍चितता संपुष्टात येईल, अशी आशा करू यात. स्मॉल कॅप किंवा मिड कॅप म्हणजे ज्या कंपन्यांच्या शेअरची किंमत कमी आहे ते नव्हेत, तर ज्या कंपनीचे बाजारमूल्य कमी आहेत ते शेअर. हे नक्की लक्षात ठेवा. यामुळे स्मॉल व मिड कॅप समजून पेनी स्टॉक (Penny Stocks ) अजिबात घेऊ नये. त्यामुळे जे गुंतवणूकदार स्मॉल आणि मिड कॅपमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छूक आहेत, त्यांच्यासाठी हीच ती वेळ!

(लेखक शेअर बाजाराचे अभ्यासक-विश्‍लेषक आहेत.)

(डिस्क्‍लेमर - लेखकाने त्यांच्या अभ्यासानुसार वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com