म्युच्युअल फंडातली गुंतवणूक 100 लाख कोटींवर जाणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 29 August 2019

 भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात आगामी दशकभरात सध्याच्या तुलनेत मालमत्ता चारपटीने वाढून 100 लाख कोटींवर जाईल, असा आशावाद या उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना "ऍम्फी'ने दिला आहे.

मुंबई: भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात आगामी दशकभरात सध्याच्या तुलनेत मालमत्ता चारपटीने वाढून 100 लाख कोटींवर जाईल, असा आशावाद या उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना "ऍम्फी'ने दिला आहे. मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या "ऍम्फी-बीसीजी व्हिजन डॉक्‍युमेंट'मध्ये बड्या महानगरांबाहेर देशाची 90 टक्के लोकसंख्येचा निवास असणाऱ्या प्रमुख 30 शहरांमध्ये म्युच्युअल फंडांकडून चांगला जम बसविला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

बॅंका, टपाल कार्यालये या माध्यमातून म्युच्युअल फंडांचे वितरण व्यापक झाल्याने आणखी चार लाख वितरकांची दशकभरात भर घातली जाईल. परिणामी देशातील 100 शहरांमध्ये अस्तित्व विस्तारले जाऊन, गुंतवणूकदारांमध्येही सध्याच्या दोन कोटींमध्ये आणखी आठ कोटींची भर घातली जाईल, असे "ऍम्फी'चे अध्यक्ष निमेश शहा यांनी स्पष्ट केले. एप्रिल 2016 पासून ते जुलै 2019 पर्यंत म्युच्युअल फंड गंगाजळीत 10 लाख कोटींची नवीन भर पडली आहे, तर त्यातील 23 टक्के हे नियोजनबद्ध गुंतवणूक पद्धत अर्थात "एसआयपी'तून आली आहे. एसआयपी खात्यांची संख्या 1 कोटींवरून 2.73 कोटींवर गेली आहे. 

महाराष्ट्रातून सर्वाधिक गुंतवणूक 
मार्च 2014 मध्ये एकूण फंड मालमत्तेत जवळपास निम्मा म्हणजे 47 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा होता, तो जून 2019 अखेर 42 टक्के असा कायम आहे. या आघाडीवरील अन्य चार राज्ये म्हणजे नवी दिल्ली (8 टक्के), कर्नाटक (7 टक्के), गुजरात ( 5 टक्के), पश्‍चिम बंगाल ( 5 टक्के) महाराष्ट्राच्या तुलनेत खूप मागे असल्याचे "ऍम्फी'ची आकडेवारी दर्शविते. मागील पाच वर्षांत अव्वल पाच राज्यांमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वार्षिक सरासरी 21.5 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investment in mutual funds will reach Rs 100 lakh crore