गुंतवणूकदारांची रोख्यांकडे पाठ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

अपरिवर्तनीय रोख्यांमधील गुंतवणुकीला ओहोटी 

मुंबई : अर्थव्यवस्थेतील मंदी, कंपन्यांना देणी परत करण्यात आलेले अपयश आणि भांडवली बाजारातील अनिश्‍चिततेमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. याचा फटका अपरिवर्तनीय रोख्यांना (नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स "एनसीडी') बसला आहे.

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत कंपन्यांनी "एनसीडी'तून केवळ सात हजार कोटींचा निधी उभारला आहे. तसेच यंदा गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा "एनसीडी'मधून होणाऱ्या निधी उभारणीत तब्बल 67 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. 

भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या माहितीनुसार 2018-19 या वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत कंपन्यांनी एनसीडी इश्‍यू करून 21 हजार 48 कोटींचा निधी उभारला होता; मात्र गेल्या वर्षभरात कॉर्पोरेट्‌सला मंदीने ग्रासले आहे.

अनेक बड्या कंपन्यांना रोकडटंचाईमुळे गुंतवणूकदारांची देणी मुदतपूर्तीनंतर चुकती करण्यात अपयश आले. ज्यामुळे गुंतवणूकदारांचा एनसीडी गुंतवणुकीवरील विश्‍वास उडाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. चालू वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत बाजारात 14 एनसीडी दाखल झाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investors are in trouble due to economic downturn