शेअर बाजार:  'आयआरसीटीसी'च्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दामदुप्पट परतावा

IRCTC-investors
IRCTC-investors

सरकारी मालकीची 'भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ' म्हणजे आयआरसीटीसी कंपनी आज भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. शेअर बाजारात सूचिबद्ध होताना कंपनीचा शेअर आयपीओच्या इश्यू प्राइसपेक्षा तब्बल 103 टक्क्यांनी वाढून 644 वर उघडला होता. दुपारच्या सत्रात त्यात आणखी वाढ होऊन कंपनीचा शेअर 714.70 वर व्यवहार करत होता. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना पहिल्याच दिवशी दामदुप्पट परतावा मिळाला आहे.

30 सप्टेंबर रोजी 'आयआरसीटीसी'ने 315 ते 320 रुपयांच्या इश्यू प्राइस सहित आयपीओ बाजारात दाखल केला होता. या आयपीओच्या माध्यमातून 480 कोटींचे भागभांडवल उभारण्याचा आयआरसीटीसीचा मानस होता. यासाठी कंपनीने 2 कोटी शेअर्स बाजारात आणले होते. त्याला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद देत 112 पटींनी अधिक नोंदणी केली होती. 480 कोटींच्या उभारणीसाठी 72 हजार कोटींचे अर्ज दाखल झाले होते.

इंटरनेट तिकीट, केटरिंग, ‘रेल नीर’ ब्रँड अंतर्गत पॅकेज्ड पिण्याचे पाणी आणि प्रवास आणि पर्यटन या चार विभागांमध्ये आयआरसीटीसीचा व्यवसाय  विभागला गेला आहे. ऑगस्टमध्ये नियामकांकडे दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये कंपनीची एकूण उलाढाल 1,899 कोटी इतकी होती. तर, निव्वळ नफा 23.5 टक्क्यांनी वाढून 272.5 कोटी डॉलर झाला आहे. केटरिंग विभाग हा सर्वाधिक महसूल गोळा करणारा विभाग आहे. या विभागातून तब्बल 1,044 कोटींची उलाढाल झाली. तर, टिकेटिंग, प्रवास आणि पर्यटन आणि पाणी यामधून अनुक्रमे 235, 444 आणि 176 कोटींचा महसूल गोळा झाला.

आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर दिवसाला तब्बल 8लाख तिकिटे बुक केली जातात. वेबसाईटवर दररोज येणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करता कंपनी आशिया-पॅसिफिक विभागात आघाडीच्या वेबसाइट्सपैकी एक आहे.

आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अॅण्ड सेक्युरिटीज लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि येस सेक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड या संस्थांनी  आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) म्हणून काम पहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com