‘जेट’चा वर्धापन दिन वेदनादायी - गोयल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

‘जेट एअरवेज’साठी यंदाचा २६ वा वर्धापन दिन अतिशय दु:खदायक आहे. जेटमधील प्रत्येकासाठी ५ मे हा दिवस विशेषच होता; परंतु आज त्या दिवशी एकही उड्डाण नाही, ही स्थिती वेदनादायी असल्याची भावना कंपनीचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी व्यक्त केली.

मुंबई - ‘जेट एअरवेज’साठी यंदाचा २६ वा वर्धापन दिन अतिशय दु:खदायक आहे. जेटमधील प्रत्येकासाठी ५ मे हा दिवस विशेषच होता; परंतु आज त्या दिवशी एकही उड्डाण नाही, ही स्थिती वेदनादायी असल्याची भावना कंपनीचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी व्यक्त केली. कंपनीची सेवा पूर्वव्रत होण्यासाठी तुमच्याप्रमाणेच आपणही सर्वतोपरी प्रयत्न करत असून, बॅंकांनी २५० कोटी उपलब्ध केल्याची माहिती गोयल यांनी पत्रातून कर्मचाऱ्यांना दिली. 

अनेक जण जेटसाठी प्रार्थना करत आहात. तुमची जेटप्रति असलेली निष्ठा, विश्‍वास, प्रेम आणि कटिबद्धता ही प्रोत्साहन देणारी आहे. सेवा ठप्प झाल्यापासून अनेक कर्मचाऱ्यांनी विविध माध्यमातून मला आणि नीताला संपर्क साधून भावना व्यक्त केल्या. काही मर्यादांमुळे प्रत्येकालाच प्रतिसाद देणे शक्‍य झाले नाही, असे गोयल यांनी सांगितले. कंपनीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून झाले आहेत. बॅंकांनी २५० कोटी उपलब्ध केले. त्याशिवाय ‘९ डब्ल्यू’मधील माझा हिस्सा विक्री केला. तुमच्या मेहनतीचा पैसा (वेतन) अद्याप मिळालेले नाही, हे पाहून प्रचंड दु:ख वाटत आहे. १० मे रोजी हिस्सा विक्रीसंदर्भातील निविदा उघडली जाणार असून, यात काहीतरी सकारात्मक होईल, असा आशावाद गोयल यांनी व्यक्‍त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jet Airways Anniversary Painful Naresh Goyal