‘जेट’चा धडा आणि इमर्जन्सी फंडाचे महत्त्व

Gold
Gold

पूर्वीच्या काळी एकदा नोकरीला सुरवात केली, की बहुतेक लोक ३० ते ३५ वर्षांनी त्याच संस्थेतून किंवा कंपनीतून निवृत्त होत असत. परंतु, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मोठ्या पदावर असलेले व चांगला पगार घेत असलेले वरिष्ठ कर्मचारीसुद्धा अकस्मात नोकरी सुटली म्हणून घरी बसलेले दिसतात. ‘जेट एअरवेज’च्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे उदाहरण ताजे आहे.

चांगली नोकरी अकस्मात जाणे, हे खूप क्‍लेशदायक असते. अशा कर्मचाऱ्यांनी कर्जे घेतली असतील तर त्यांची परिस्थिती आणखीनच कठीण होते. नोकरी गेल्यामुळे ‘मेडिकल इन्शुरन्स’ संपुष्टात येतो आणि अशा वेळी जर घरातील कोणाला मोठे आजारपण आले तर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती होते. या पार्श्‍वभूमीवर इमर्जन्सी फंडाचे महत्त्व अधोरेखित होते. आणीबाणीची परिस्थिती उद्‌भवली तर आपल्याकडे काही महिने पुरेल एवढी रक्कम राखीव स्वरुपात असायला हवी, ही त्यामागची संकल्पना आहे. 

काय आहे हा ‘इमर्जन्सी फंड’?
हा फंड म्हणजे कोणतीही म्युच्युअल फंड योजना नसून, तो प्रत्येकाने स्वतःच तयार करावयाचा फंड आहे. प्रत्येक नोकरदाराने; तसेच व्यावसायिकानेसुद्धा हा फंड सुरू केला पाहिजे, कारण व्यावसायिकांचे उत्पन्नसुद्धा खूप अनिश्‍चित असते. आर्थिक नियोजनामध्ये ‘इमर्जन्सी फंडा’ला खूप महत्त्व दिले जाते व तो नसेल तर तो तातडीने निर्माण करायला सांगितले जाते. हा एक असा फंड असतो, की ज्या पैशांचा उपयोग इतर कोणत्याही कारणासाठी न करता केवळ आणीबाणीच्या आणि संकटांच्या वेळीच करायचा असतो. आजारपण किंवा निधन यासारख्या संकटाच्या वेळी इन्शुरन्स उपयोगाला येऊ शकतो. परंतु, नोकरी गेली तर इन्शुरन्स उपयोगी पडत नाही, तर त्यासाठी ‘इमर्जन्सी फंड’ कामाला येतो.

‘इमर्जन्सी फंड’ किती असावा?
सध्याची नोकरी गेल्यानंतर दुसरी नोकरी मिळण्याची खात्री असेल (उदाहरणार्थ, आयटी क्षेत्र), तर साधारणपणे चार ते सहा महिन्यांच्या निव्वळ पगाराइतका हा फंड असावा. तुमच्या हातामध्ये येणारा निव्वळ पगार महिन्याला ५० हजार रुपये असेल, तर तुमचा ‘इमर्जन्सी फंड’ साधारणपणे तीन लाख रुपये असणे योग्य राहील. परंतु, तुम्ही अशा क्षेत्रात काम करीत असाल की जिथे तुम्हाला लगेचच दुसरी नोकरी मिळणे अवघड आहे, तर अशा ठिकाणी तुमचा ‘इमर्जन्सी फंड’ हा साधारणपणे एक वर्षाच्या निव्वळ पगाराइतका असणे योग्य राहील.

‘इमर्जन्सी फंड’ कोठे असावा?
‘इमर्जन्सी फंड’ हा चांगल्या म्युच्युअल फंडाच्या ‘लिक्विड’ किंवा ‘अल्ट्रा शॉर्ट टर्म’ योजनेमध्ये ठेवणे योग्य राहील. कारण अशा योजनांना कोणताही ‘लॉक इन पीरियड’ नसतो व तुम्ही या योजनांमधील पैसे कधीही काढू शकता. या योजनेमध्ये ‘लाभांश’ऐवजी ‘वृद्धी’ हा पर्याय निवडावा; जेणेकरून योजनेमधील पैसे वाढतील. हा फंड तुम्ही एकरकमी किंवा ‘एसआयपी’द्वारे सुद्धा तयार करू शकता. ‘इमर्जन्सी फंडा’ची रक्कम इक्विटी योजनेमध्ये गुंतविलेली नसावी, कारण ‘इमर्जन्सी’ ही सांगून येत नाही आणि त्या वेळी शेअर बाजार कसा असेल, हे सांगता येणे कठीण आहे. त्याचप्रमाणे तो स्थावर मालमत्ता आणि सोन्यातसुद्धा गुंतविलेला नसावा; कारण जमीन अथवा घर विकणे हे क्‍लिष्ट व वेळखाऊ असते आणि सोन्याच्या भावामध्येसुद्धा चढ-उतार असतात व घट येऊ शकते.  

तात्पर्य - जर तुम्ही ‘इमर्जन्सी फंड’ तयार केलेला नसेल, तर ताबडतोब त्याच्या तयारीला लागा आणि ते पैसे इतर कोणत्याही कारणासाठी वापरू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com