फायद्याचे टेकऑफ नजरेच्या टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फायद्याचे टेकऑफ नजरेच्या टप्प्यात
फायद्याचे टेकऑफ नजरेच्या टप्प्यात

फायद्याचे टेकऑफ नजरेच्या टप्प्यात

sakal_logo
By
अवतरण टीम

:- जितेंद्र भार्गव

तोट्यात असलेली एअर इंडिया कंपनी तब्बल सहा दशकांनी पुन्हा टाटा समूहाच्या ताब्यात गेली आहे. कोरोनामुळे जगातील अनेक क्षेत्रे आर्थिक संकटात कोलमडून पडली. विमान वाहतूक क्षेत्रापुढेही मोठे आव्हान उभे राहिले. अशा परिस्थितीत ‘एअर इंडिया’ची खरेदी टाटा समूहासाठी घाटे का सौदा ठरेल का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. कधीकाळी जगातील उत्कृष्ट विमानसेवेत मोडणाऱ्या एअर इंडियाचा ब्रॅण्ड अन् मार्केट व्हॅल्यू पुन्हा मिळवण्याचे आव्हान ‘टाटा’समोर आहे. कंपनी नफ्यात आणायला किती वर्षे जातील, त्यासाठी ‘टाटा’ची काय व्यूहरचना असेल याचा घेतलेला आढावा...

कोरोना संसर्गाचा जगभरातील विमानसेवेवर घातक परिणाम झाला. कोविड काळात बहुतांश विमाने धावपट्टीवरच होती. दोन वर्षांत जगभरातील विमान कंपन्यांचे जवळपास दोनशे अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान झाले. भारतीय कंपन्यांवरही त्याचा थेट परिणाम झाला. तोटा वाढत चालला. त्यातच उत्पन्न घटू लागल्याने काही कंपन्यांना कामगारांची वेतनकपात करावी लागली. दुसरीकडे जगभरात चित्र वेगळे होते. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी इत्यादींसह अनेक देशांनी सरकारी विमानसेवेला आर्थिक मदत दिली. मात्र, भारतात केंद्र सरकारने कुठल्याही विमान कंपनीला पैशाचे इंधन पुरवले नाही. अशा कठीण काळात एअर इंडियाचे खासगीकरण होणे ही महत्त्वाची घडामोड ठरते. १९३२ मध्ये टाटा समूहाने एअर इंडिया कंपनीची सुरुवात केली होती. एअर इंडिया आणि टाटामध्ये नक्कीच एक भावनिक नाते आहे. कंपनीचे महत्त्व आणि तिचे मोल टाटा समूह पुरेपूर जाणून होता. टाटा समूहाने या वेळी सर्व बारीकसारीक तपशिलांचा विचार आणि अभ्यास करून आपली निविदा सादर केली. त्यात ते यशस्वी झाले आणि एअर इंडिया पुन्हा भरारी घेण्यास सज्ज झाली.

कधीकाळी एअर इंडियाचा समावेश जगातील उत्कृष्ट विमान कंपनीत होत असायचा. एअर इंडियामुळे जगभरात देशाचा गौरव होत होता. मात्र, गेल्या चार दशकांतील काही चुकीचे निर्णय आणि वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा विपरीत परिणाम एअर इंडियावर झाला. १९९० नंतर सरकारने देशात खासगी विमान सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. त्याचा मोठा परिणाम प्रवाशांच्या मानसिकतेवर झाला आणि एअर इंडियाची प्रवासी संख्या घटत गेली.

तीन कारणांमुळे एअर इंडिया जमिनीवर

वर्क कल्चर अर्थात कामाची पद्धत किंवा मानसिकता म्हणा हवं तर, ती फार महत्त्वाची ठरते. सरकारी कंपनी असल्यामुळे तिथेही काम करण्याची एक विशिष्ट मानसिकता आणि संस्कृती होती. आजच्या स्पर्धात्मक वातावरणात अशी मानसिकता कामाची नाही. दुसरे म्हणजे, ऑपरेशनल खर्च कमीत कमी असायला हवा. मात्र, सरकारी नियंत्रण असलेल्या एअर इंडियात अशा गोष्टी होणे कठीण होते. तिसरा मुद्दा होता, विमानखरेदीचा... २००५ मध्ये सरकारने नवी विमानखरेदी केली. साहजिकच एअर इंडियावर कर्जाचा बोजा वाढला. त्यानंतर इंडियन एअरलाईन्स-एअर इंडियाचे विलीनीकरण झाले. केंद्र सरकार एअर इंडियाच्या अडचणी समजूच शकले नाही. महत्त्वाचा मुद्दा होता, आयएएस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा. २००३ नंतर सरकारने एअर इंडियाच्या संचालक पदावर सनदी अधिकारी बसवणे सुरू केले. एक तर त्या अधिकाऱ्यांना विमान कंपनी चालवण्याचा कुठलाच अनुभव नव्हता. दुसरे म्हणजे, अधिकारी एक-दोन वर्षांसाठी वरिष्ठ पदांवर यायचे. साहजिकच त्यांची एअर इंडियाप्रती कमिटमेंट नव्हती.

मार्केट शेअर घसरला

सरकारी हस्तक्षेप वाढू लागल्याने एअर इंडियाची दुर्दशा झाली. कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास ढासळला. कंपनीचा मार्केट शेअर कमी कमी होत गेला. तो ११ ते १७ टक्क्यांपर्यंत पोहोचला. प्रत्येक नऊ विमान प्रवाशांमागे एक एअर इंडियाचा होता. अशीच परिस्थिती कायम राहिली असती तर १५ प्रवाशांमागे एकच प्रवासी एअर इंडियाला मिळाला असता. कारण नवीन विमाने खरेदी करण्यासाठी, प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी आणि विमान अपग्रेड करण्यासाठी एअर इंडियाकडे पैसेच नव्हते. दुसरीकडे खासगी विमान कंपन्या आपल्या सेवा उत्कृष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत होत्या. या स्पर्धेत एअर इंडियाचा टिकाव लागणे कठीण होते... भविष्य धूसर होत चालले होते.

एअर इंडियासाठी टाटामध्ये एक भावनिक नाते आहे ही बाब कुणीही नाकारू शकत नाही. १९५३ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी एअर इंडिया कंपनी सुरू केली. १९७८ पर्यंत त्यांनी ती यशस्वीपणे चालवली. महत्त्वाचे म्हणजे या काळात एअर इंडिया सरकारी विमान कंपनी होती, परंतु तिचे नेतृत्व, व्यवस्थापन जे. आर. डी. टाटा यांच्यासारख्या व्यक्तीकडे असल्यामुळे ती उत्कृष्ट एअरलाईन्स होती. मात्र, केवळ भावनेपोटी टाटाने एअर इंडिया खरेदी केलेली नाही. तसे असते तर टाटा समूहाने २०१८ मध्ये एअर इंडिया खरेदीसाठी बोली लावली असती. २०२१ मध्ये टाटा समूहाच्या तज्ज्ञांनी एअर इंडियाची व्हॅल्यू तपासली. एअर इंडियाची कार्यशैली सरकारी होती. टाटा समूहाला आता तिकडे नव्याने वर्क कल्चर रुजवावे लागणार आहे. प्रत्येक विमानामागील कर्मचारी संख्या नियंत्रणात आणावी लागेल. आता कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीचे तत्त्व येईल. सरकारी कर्मचारी असल्याने कारवाई होऊ शकत नाही, अशी मानसिकता संपून जाईल. कॉर्पोरेट कल्चर येईल अन् त्याचा मोठा फायदा होईल.

टाटा समूह आपल्या संचालक मंडळात नक्कीच पक्के व्यावसायिक कर्मचारी अन् तज्ज्ञांची नेमणूक करील. तातडीचे आणि जोखमीचे निर्णय घेता येईल. यापूर्वी अधिकारी निर्णय घेताना घाबरायचे. निर्णय चुकल्यास चौकशी वा कारवाईची भीती होती. मात्र आता एअरलाईन्सच्या भविष्यानुसार निर्णय घेणे शक्य आहे.

सहा महिने ते दोन वर्षांची व्यूहरचना

पहिल्या सहा महिन्यांत टाटा समूह एअर इंडियाची प्रतिमा सुधारण्यावर भर देईल. बिनकामाच्या गुंतवणुकीला कात्री लावली जाईल. नवी गुंतवणूक करून विमाने अपग्रेड केली जातील. सर्व विमानांची दुरुस्ती आणि सुधारणा करण्यासाठी टाटाला किमान दोन वर्षे लागतील. त्यानंतर खऱ्या अर्थाने एअर इंडियाचे मार्केट सुरू होईल. टाटा समूहाला नागरी विमान सेवेचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे कार्यप्रणालीत सुधारणा करणे त्यांच्यासाठी तसे अवघड नाही. जेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक विमान ऑपरेट करता तेव्हा तुमचा खर्च आणि नुकसानही कमी होते. त्यामुळे एअर इंडिया-एअर एशिया-विस्ताराचे विलीनीकरण झाल्यास पुढच्या तीन वर्षांत एअर इंडिया फायद्यात येऊ शकते.

एअर इंडिया टाटाकडे जाणे एक संयोगच म्हणता येईल. टाटाने एअर इंडिया घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुठलाच विरोध केला नाही. टाटाऐवजी दुसरी कंपनी असती तर प्रचंड विरोध झाला असता. त्या कंपनीवर तेवढा विश्वास नसता. मानवी मूल्य जपून कर्मचाऱ्यांना वागवणारी-जगवणारी कंपनी अशी टाटाची ओळख आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी आणि प्रवासीही अशा डिलचे स्वागत करत आहेत.

दोन दशकांत एअर इंडिया तोट्यात गेली. दुसरीकडे देशातील नागरी विमान क्षेत्र विस्तारत होते. एअर इंडियात क्षमतेचा अभाव होता. त्यामुळे केंद्र सरकारला आखाती देशातील कंपन्या आणि काही दक्षिण एशियन एअरलाईन्सला बायलॅटरल राईट्स देऊन आपल्याकडे विमान सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे एमिरेट्स एअर इंडियापेक्षा जास्त प्रवासी परदेशात घेऊन जात होती. त्यामुळे एमिरेट्सला भारताचे नॅशनल कॅरियरही म्हणायला लागले. त्यामुळे जर एअर इंडिया तोट्यात सुरू ठेवली असती तर देशात विदेशी एअरलाईन्सचा प्रभाव वाढला असता. त्यातून रोजगाराच्या संधी देशात उपलब्ध झाल्या नसत्या. शिवाय परदेशी कंपन्यांनी आपली क्षमता आणि विमानसंख्या वाढवली असती तर त्याचा फायदा त्या देशांना झाला असता. अशा परिस्थितीत एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय अत्यंत योग्य असून पुढील दोन वर्षांत तो किती चांगला होता हे जनतेला समजेल. टाटा समूहाकडे पैशांची कमी नसल्यामुळे एअर इंडियाचा `क्वालिटी` आणि `क्वान्टिटी` दोन्हीमध्ये वाढ होईल. त्यामुळे भारत आणि एअर इंडियाच्या प्रतिमेवर फरक पडणार आहे.

‘टाटा’समूहासाठी फायद्याचे मुद्दे

जगभरात विमान सेवा :

एअर इंडिया एक ऑपरेशनल कंपनी आहे. कंपनीकडे एक मोठे आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे. भारतातील कुठल्याही विमान कंपन्या अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांत सेवा देत नाहीत. अगदी विस्तारा आणि एअर एशिया कंपन्याही काही देश सोडले तर इतर ठिकाणी सेवा देत नाही. इंडिगो, स्पाईस जेट वगैरे आखाती देश किंवा दक्षिण आशियात विमान सेवा देतात; परंतु एअर इंडिया जगभरात विमान सेवा देते.

लॅण्डिंग स्लॉट उपलब्धता

लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या आंतरराष्ट्रीय, व्यस्त विमानतळावर मुळात लॅण्डिंग स्लॉट मिळणे खूप कठीण काम आहे. मात्र, एअर इंडियामुळे टाटाकडे ते उपलब्ध झालेत. यापूर्वी टाटा विस्तारा, एअर एशियाचे संचलन करायचे. मात्र, तरीही जगातील बड्या एअरलाईन्समध्ये त्याचा समावेश नव्हता. मात्र, एअर इंडिया ताब्यात आल्यामुळे टाटा समूहाची गणना आता जपान, डेल्टा, लुफ्थांसा वगैरेंसारख्या कंपन्यांमध्ये होईल. टाटा समूहाला त्याचा लगेचच फायदा होणार नाही, परंतु नुकसान निश्चितच कमी होईल.

बाजारपेठ आणि ब्रॅण्ड व्हॅल्यू :

एअर इंडियाकडे अजूनही प्रवासी बाजारपेठेचा १७ टक्के हिस्सा आहे. एअर इंडिया आता टाटाकडे गेल्याने जनतेच्या मानसिकतेवर थेट परिणाम होईल. प्रवासी एअर इंडियाकडे वळतील. दुसरे म्हणजे, टाटा समूहाला दोन हजार अनुभवी, कुशल पायलट मिळाले आहेत. टाटा समूह एअर इंडियात नव्याने गुंतवणूक करील. साहजिकच एअर इंडिया नावाचा ब्रॅण्ड अन् प्रॉडक्ट अधिक बळकट होईल. महत्त्वाचे म्हणजे एअर इंडियाची जगभरात ओळख असल्यामुळे टाटा समूहाला मार्केटिंगवर भर देण्याचा किंवा वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नाही.

(लेखक एअर इंडियाचे तज्ज्ञ आहेत. एअर इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी १३ वर्षांहून अधिक काळ काम पाहिले आहे)

loading image
go to top