तुम्ही 'डिजी लॉकर' वापरलंय का? (व्हिडिओ)

बुधवार, 26 डिसेंबर 2018

डिजी लॉकर म्हणजे काय?

डिजी लॉकर म्हणजे काय?
सामन्यत: आपण आपल्या मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकर मध्ये ठेवतो व अशा मौल्यवान वस्तू आपण गरजेच्या वेळी लॉकर मधून काढून काम झाल्यावर परत बँकेच्या लॉकरमध्ये परत ठेवून देतो, यामुळे आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतात. तद्वतच आता आपण आपली महत्वाची कागदपत्रे (उदा: आधार कार्ड, पास पोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, आरसी बुक, पदवी प्रमाणपत्र, मार्क शीट, आयुर्विमा पॉलीसी,पॅन कार्ड, खरेदीचे दस्त ) या डीजी लॉकरमध्ये सहजपणे ठेऊ शकतो व गरजेच्या वेळी दाखवू शकतो अथवा सबंधीतास याची डिजिटल प्रत मेल,व्हाट्सअॅप किंवा  फेसबुक वर पाठवू शकतो. असे असले तरी अजूनही या सुविधेची अनेकांना माहिती नाही आणि म्हणून आज आपण याबाबतची थोडक्यात माहिती घेऊ. 

डिजी लॉकर म्हणजे काय? हे जाणून घेऊया सुधाकर कुलकर्णी यांच्याकडून 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाचा डीजी लॉकर हा एक महत्वाचा भाग आहे.  केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ  इलेक्ट्रॉनिक आणि  इन्फर्मेशन टेक्नोलॉजी  मार्फत डीजी लॉकर ही सुविधा देऊ केली आहे.  हे अॅप आपण मोबाईलअॅप स्टोअर मधून आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकतो, तसेच डीजी लॉकरच्या वेबसाईटवरून पीसी किंवा लॅपटॉपवर डाऊनलोड करू शकतो. तथापि मोबाईलअॅप वापरणे एकूणच खूप सोयीचे असते. मात्र यासाठी आपला मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डशी सलग्न (लिंक) असणे आवश्यक असते. हे मोबाईलअॅप डाऊनलोड केल्यावर सबंधित प्रमाणपत्र किंवा कार्ड डीजी लॉकरशी सलग्न असलेल्या  संस्थेच्या नावावर क्लिक करून  आपले नाव व सबंधित कार्ड अथवा प्रमाणपत्राचा नंबर  टाकून हे कार्ड/प्रमाणपत्र आपल्या डीजी लॉकर मोबाईलअॅपमध्ये मूळ स्वरुपात डाऊनलोड करता येते.उदा: आपल्याला जर आपले आधार कार्ड मूळ स्वरुपात डाउनलोड करावयाचे असेल तर फेच डॉक्युमेंट्स वर युएडीआय वर क्लिक करून आपले नाव व आधार कार्ड नंबर टाकला असता आपले आधार कार्ड मूळ स्वरुपात (ओरीजनल) आपल्या डीजी लॉकर मोबाईलअॅपमध्ये स्टोअर केले जाते.हे आधार कार्ड आपण आवश्यक त्या सर्व ठिकाणी ओरीजनल म्हणून दाखवू शकतो तसेच गरज पडल्यास शेअर करू शकतो. याच प्रमाणे आपले पॅन कार्ड, पास पोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, आरसी बुक यासारखी व अन्य वर उल्लेखिलेली महत्वाची कागद पत्र आपल्या डीजी लॉकर मोबाईलअॅपमध्ये मूळ स्वरुपात स्टोअर करून ठेऊ शकतो या डीजी लॉकरची स्टोअरेज क्षमता 1 जी बी इतकी असून ही सुविधा मोफत उपलब्ध आहे. या डीजी लॉकर मध्ये स्टोअर केलेल्या डॉक्युमेंट्सचा  वापर गरजेनुसार करू शकतो. उदा: आपल्याला रस्त्यात वाहतूक पोलिसाने अडविले आहे व आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स, आरसी बुक,व गाडीच्या विम्याच्या पॉलीसीची मागणी केली तर आपण आपल्या मोबाईलवर असलेल्या डीजी लॉकर मधील ही डॉक्युमेंट्स वाहतूक पोलिसास दाखवू शकता आणि वाहतूक पोलीसास ती मान्य करवी लागतात, वाहतूक पोलीस  आपणास ओरीजनल डॉक्युमेंट्स मागू शकत नाही.

याशिवाय डीजी लॉकर सोबत इ-सिग्नेचर ही सुविधा सुद्धा उपलब्ध आहे या  सुविधेचा वापर करून इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सवर इ-सिग्नेचर करता येत यासाठी डिजिटल सिग्नेचर साठीच्या डोंगलची गरज राहात नाही. आत्तापर्यंत सुमारे 1.75 कोटी लोकांनी ही सुविधा वापरण्यास सुरुवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keep your Aadhaar, other docs safe Shift to DigiLocker app