दिवाळीत कर्ज स्वस्त होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

मुंबई: पतधोरणातील व्याजदरकपातीचा ग्राहकांना लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेने दणका दिला आहे. दिवाळीच्या खरेदीला चालना देण्याच्या दृष्टीने ऑक्‍टोबरपासून बाह्य मानकावर आधारित (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) कर्जदर लागू करण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना दिले आहेत. ही प्रणाली बॅंकांसाठी बंधनकारक केल्याने गृह, वाहन, वैयक्तिक तसेच उद्योजकांसाठीचा कर्जाचा दर अर्धा ते पाऊण टक्‍क्‍याने कमी होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या निर्णयाने दीर्घकाळापासून स्वस्त कर्जांसाठीची ग्राहकांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. 

सध्या बॅंकांकडून "मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट'नुसार (एमसीएलआर) कर्जाचा दर ठरवला जातो; मात्र ही पद्धत रेपो दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात फायदेशीर नसल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या निदर्शनात आले होते. याशिवाय औद्योगिक संघटनांकडूनदेखील रेपो दरकपातीचा फायदा बॅंकांकडून दिला जात नसल्याबद्दल "आरबीआय'कडे नाराजी व्यक्त केली होती. त्यातच वस्तूंचा खप कमी झाला असून अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग दाटू लागले आहेत. घर खरेदी, वाहन तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीला प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना 1 ऑक्‍टोबरपासून बदलत्या व्याजदराशी संबंधित कर्जदर बाह्य मानकावर आधारित कर्जदर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गृहकर्जदर प्रणाली पारदर्शक होणार असून कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. बॅंकांना तीन महिन्यांतून एकदा व्याजदराचा आढावा घ्यावा लागणार आहे. 

पतधोरणाकडे लक्ष 
रिझर्व्ह बॅंकेने सलग चार पतधोरणात 1.10 टक्के व्याजदरकपात केली; मात्र याच कालावधीत बॅंकांकडून कर्जाचा दर 0.50 ते 0.60 टक्‍क्‍याच्या दरम्यान कमी केला. त्यामुळे रेपो दरकपातीचा 100 टक्के लाभ ग्राहकांना मिळालेला नाही. दरम्यान 1 ते 4 ऑक्‍टोबरदरम्यान रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार असून त्यात व्याजदर कपात झाल्यास बॅंकांना व्याजदर कमी करावे लागतील. "एक्‍स्टर्नल बेंचमार्क'वर आधारित व्याजदर बंधनकारक केल्याने रेपो कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळू शकेल. 

एक्‍स्टर्नल बेंचमार्कची निवडणे शक्‍य 
बॅंकांकडून अंतर्गत मानकानुसार गृहकर्जाचा दर ठरवला जातो. जवळपास 90 टक्के कर्ज बदलत्या व्याजदरावर आधारित आहेत. 20 वर्षे मुदतीच्या दीर्घकालीन कर्ज योजनेत ठराविक कालावधीनंतर व्याजदर आढावा घेतला जातो. कर्जदाराला कोणत्या बेंचमार्कने कर्ज घ्यायचे आहे, हे निवडण्याचा पर्याय आहे. त्याशिवाय कर्जदाराला सध्याचे कर्ज एक्‍स्टर्नल बेंचमार्कनुसार कर्जदरामध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बदलला येऊ शकते. 

बॅंकांकडून सुरवातीला प्राईम लेंडिंग रेट लागू केला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्यात कर्जदर ठरवण्याची पद्धत बदलत गेली. अंतर्गत मानकानुसार बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंग रेट फ्लोटिंग इंटरेस्ट रेट (बदलत्या व्याजदरानुसार) आदी व्याजदर लागू केले जातात. 
 
बाजारातील व्याजदर 
रिझर्व्ह बॅंक रेपो दर 5.75 टक्के 
बॅंकांमधील कर्जदर 10 ते 11 टक्के 
गृहकर्ज 8.40 ते 10.50 टक्‍के 
वाहनकर्ज 8.50 ते 12.75 टक्के 
वैयक्तिक कर्ज 12.75 ते 24 टक्के 
उद्योगाकरिता कर्ज 8.65 ते 16.25 टक्के 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loans will become cheaper in DIWALI