esakal | गॅस सिलिंडर पुन्हा महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

4LPG_20gas_20delivery.jpg

गॅस सिलिंडर पुन्हा महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Gas Cylinder Price Hike : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाप बसणार आहे. इंधन दरवाढीने आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) दरांत वाढ केली आहे. विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरांत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंगडरच्या दरांत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता 15 दिवसांत पुन्हा 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. महिनाभराच्या आत घरगुती गॅस (14.2 किलो) सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. याचबरोबर 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर 75 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर 1693 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये 1,772 रुपये तर मुंबईत 1,649 रुपये झाला आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या 14.2 किलोच्या LPG सिलिंडरचा दर राजधानी दिल्लीत 884.50 रुपये झाला आहे. याआधी दिल्लीमध्ये या गॅस सिलिंडरची किंमत 859.5 रुपये इतकी होती. आर्थिक राजधानीमध्येही गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत गॅसची किंमत 859.5 रुपये इतकी होती. आता यामध्ये 25 रुपयांनी वाढ झाली असून मुंबईत गॅस 884.5 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्येही 14 किलोच्या घरगुती गॅसची किंमत 911रुपये इतकी झाली आहे. याआधी कोलकातामध्ये गॅस सिलिंडर 886 रुपयांना मिळत होता. आता चेन्नईमध्ये 900.5 रुपयांना 14 किलोचा गॅस मिळेल.

यंदा 190.5 रुपयांनी महागला घरगुती गॅस -

मागील काही महिन्यांपासून सातत्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. एक जानेवारी 2021 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये प्रति सिलिंडर होती. 1 मार्च 2021 पर्यंत ही किंमत 819 वर पोहचली होती. एप्रिल महिन्यात त्यात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. मे महिन्यात सिलिंडरचा भाव 810 रुपये झाला होता. तर जून महिन्यात कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नाही. ऑगस्ट महिन्यात 25 रुपयांनी आणि सप्टेंबरमध्ये 25 रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर महागला आहे. वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडर तब्बल 190.50 रुपयांनी महागला आहे.

loading image
go to top