महिंद्रा करणार दुचाकी मार्केटमध्ये कमाल; इलेक्ट्रीक गाडी आणणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

महिंद्रा अॅंड महिंद्रा ही देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी लवकरच इलेक्ट्रीक मोटरसायकल बाजारात आणण्याच्या विचारात आहे.

महिंद्रा अॅंड महिंद्रा ही देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी लवकरच इलेक्ट्रीक मोटरसायकल बाजारात आणण्याच्या विचारात आहे. देशातील गरजांनुरूप विकसित केलेली इलेक्ट्रीक दुचाकी महिंद्रा अॅंड महिंद्रा आणेल अशी चिन्हे आहेत. भारतात इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात आघाडी घेणाऱ्या महिंद्रा अॅंड महिंद्राने इलेक्ट्रीक दुचाकींपासून मात्र आतापर्यत स्वत:ला दूर ठेवले होते. 7 ऑगस्टला समभागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भातील सूतोवाच केले आहे. आम्ही या क्षेत्रावर लक्ष ठेवून आहोत. यासंदर्भात आमचे काही प्लॅनसुद्धा तयार आहेत. आम्ही भारतातच तयार केलेली इलेक्ट्रीक दुचाकी बाजारात आणू, असे मत यावेळी आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे. 

अमेरिकेत महिंद्राची जेनझी 2.0 ही इलेक्ट्रीक स्कुटर बाजारात उपलब्ध आहे. 56 किलोमीटरचा पल्ला असलेली ही दुचाकी तिथे 3,699 डॉलरला (2.62 लाख रुपये) विक्रीस उपलब्ध आहे. ही दुचाकी महिंद्राने फक्त अमेरिकेची बाजारपेठ डोळ्यासमोर ठेऊनच विकसित केली आहे. आम्ही अमेरिकेतील इलेक्ट्रीक दुचाकी भारतात लॉंच न करण्यामागचे कारण म्हणजे तिची जास्त किंमत, असेही महिंद्रा म्हणाले. पुढील तीन वर्षात महिंद्रा अॅंड महिंद्रा इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात चार नव्या चारचाकी प्रवासी कार आणि काही मिनी ट्रक बाजारात आणणार आहे. अलीकडेच कंपनीने जावा मोटरसायकल बाजारात आणल्या होत्या. महिंद्रा अॅंड महिंद्राच्या प्रतिस्पर्धी कंपन्या असलेल्या, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर आणि हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांबरोबरच डझनभर स्टार्टअप कंपन्या देशात इलेक्ट्रीक मोटरसायकल आणण्याच्या तयारीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahindra confirms launch plans of electric two-wheelers in India