‘मेक इन इंडिया’मधून फक्त नोकऱ्यांचीच निर्यात

वृत्तसंस्था
Monday, 19 August 2019

मेक इंडिया अंतर्गत आणखी काम होण्याची गरज

मुंबई: लार्सन अॅंड टुब्रोचे अध्यक्ष ए एम नाईक यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर स्पष्ट मते मांडली आहेत. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत रोजगाराची अपेक्षित निर्मिती झालेली नाही. कारण कंपन्या स्थानिक पातळीवर उत्पादन करण्याऐवजी मालाची आयात करण्यावरच भर देत आहेत. त्यामुळे मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत आणखी बरेच काम होण्याची अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीदरम्यान नाईक यांनी अर्थव्यवस्थेच्या सद्य स्थितीवर भाष्य केले आहे. बहुसंख्य भारतीय कंपन्या भारतातच मालाचे उत्पादन करण्याऐवजी मालाची आयात करण्यावरच का भर देत आहेत, यावर देशाने उत्तर शोधण्याची गरज आहे. क्रेडिटची सुविधा मिळत असल्यामुळे भारत आयातीला परवानगी देत असतो. मात्र देशात कंपन्यांना पुरेसे भांडवली पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणावर आयात करत आहेत. ज्या तुलनेत कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आहे त्या तुलनेत निर्मिती क्षेत्रात नोकऱ्यांची किंवा रोजगाराची अपेक्षित निर्मिती होत नसल्याचेही ते म्हणाले. 

चीनच्या जवळपासच आपली लोकसंख्या असल्यामुळे आपली अर्थव्यवस्थासुद्धा त्याच तोलामोलाची असली पाहिजे. अन्यथा या देशात कायमच रोजगाराचा अभाव राहील. यासाठी चीनप्रमाणेच अर्थव्यवस्था विस्तारावी लागेल. जोपर्यत चीनप्रमाणेच भारताची अर्थव्यवस्था 12 ते 13 टक्क्यांनी विस्तारात नाही तोपर्यत हा प्रश्न असाच राहील. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या गुजरात मॉडेलची अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवर करावी असेही नाईक यांनी सुचवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make in India is yet to create enough jobs says L&T chairman