अर्थभान : म्युच्युअल फंड : गरज कशाची?

गेल्या काही वर्षांत अनेक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कशी करावी, कोठे करावी, या गोष्टींविषयी माहिती झाली आहे.
Mutual Fund
Mutual FundSakal
Summary

गेल्या काही वर्षांत अनेक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कशी करावी, कोठे करावी, या गोष्टींविषयी माहिती झाली आहे.

गेल्या काही वर्षांत अनेक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कशी करावी, कोठे करावी, या गोष्टींविषयी माहिती झाली आहे. ‘सकाळ’च्या ‘धन की बात’ या साप्ताहिक पानातून या क्षेत्रातील विविध जाणकार मान्यवरांनी वेळोवेळी या गुंतवणूक प्रकाराविषयी अगदी बारीकसारीक माहिती गुंतवणूकदारांपर्यंत पोचवली आहे. आज मी या लेखातून परत तेच सांगणार नाही. पण जर खरोखरच आपल्याला म्युच्युअल फंडातून आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन परतावा मिळवायचा असेल तर नक्की आपण काय करावे, यावर थोडा प्रकाश टाकायचा प्रयत्न करणार आहे.

कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या काळात शेअर बाजारातील मोठ्या पडझडीनंतर, आपण शेअर बाजारात एक मोठी तेजी बघितली. याच काळात बऱ्याच नव्या गुंतवणूकदारांनी प्रथमच शेअर बाजारात म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक केली आणि अगदी अल्पावधीतच त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा बघायला मिळाला. पण यामुळे या नव्या गुंतवणूकदारांचा असा गैरसमज झाला असेल, की शेअर बाजारातून अथवा म्युच्युअल फंडातून पैसे कमविणे खूप सोपे आणि तेही कमी वेळात शक्य आहे.

पण एवढ्या मोठ्या तेजीनंतर गेल्या दोन महिन्यांत शेअर बाजारात साधारणपणे १० ते १२ टक्क्यांची घसरण आपण बघितली आणि या घसरणीच्या अनुषंगाने म्युच्युअल फंडाचे मूल्यांकनही कमी झाले. त्यामुळे या सर्व गुंतवणूकदारांची चलबिचल चालू झाली. शेअर बाजार घसरला, आता सर्व गुंतवणूक विकायला हवी, काढून घ्यायला हवी, असे विचार मनात येऊ लागले. दीर्घ कालावधीसाठी चालू केलेली ‘एसआयपी’ बंद करण्यासाठी फोन येऊ लागले. विविध कारणे सांगून गुंतवणूक बंद व्हायला लागली. कारण या नवख्या गुंतवणूकदारांना शेअर बाजाराच्या चढ-उताराचा स्थायीभाव माहीतच नाही. कारण त्यांनी गुंतवणूक चालू केल्यापासून शेअर बाजार कधी पडलाच नव्हता. खरे तर म्युच्युअल फंड हे छोट्या कालावधीसाठी गुंतविण्याचे साधन नाहीच, असे माझे ठाम मत आहे. जर कोणाला शेअर बाजाराशी निगडित असलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक चालू करायची असेल किंवा चालू केली असेल तर ती कमीत कमी १० ते १२ वर्षांचा कालावधीसाठी असावी. तर आणि तरच आपण या गुंतवणुकीतून मोठ्या परताव्याची अपेक्षा करू शकतो.

आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, की कशावरून मी हे म्हणत आहे? माझे हे म्हणणे गेल्या १२ ते १५ वर्षांच्या कालावधीतील म्युच्युअल फंडाच्या परताव्यावर आधारित आहे.

सोबतचा तक्ता आपणास हे सांगतो, की आपण दीर्घ कालावधीसाठी का गुंतवणूक केली पाहिजे?

चला पाहूया, गेल्या १० वर्षांत म्युच्युअल फंडातील काही योजनांची कामगिरी (ता. १४ जानेवारी २०२२ च्या आकडेवारीनुसार) कशी आहे ते-

वरील तक्त्यावरून हे स्पष्ट होते, की जर आपण शेअर बाजाराशी निगडित असलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक शेअर बाजाराच्या होणाऱ्या चढ-उतारांकडे दुर्लक्ष करून दीर्घ कालावधीसाठी ठेवली तर इतर कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपेक्षा ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात परतावा देऊ शकते.

पण आजकाल गुंतवणूकदारांमध्ये एक विचित्र मानसिकता बघायला मिळते. म्हणजे गुंतवणूक चालू करताना १५ ते २० वर्षांच्या कालावधीसाठी चालू करायची. पण ४ ते ५ वर्षानंतर मात्र शेअर बाजारात थोडी जरी घसरण झाली तरी लगेच घाबरून त्या दीर्घ कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीतून बाहेर पडायचे. हे पूर्णतः चुकीचे वर्तन आहे. सोबतच्या तक्त्यामधील म्युच्युअल फंडाच्या योजनेचा गुंतवणूक कालावधी जर आपण बघितला तर तो १० वर्षांच्या पुढचा आहे. आता गेल्या १० वर्षांत शेअर बाजार कधी पडला नाही का? तर, बऱ्याच वेळा पडला! काही वेळा तर मोठ्या प्रमाणात पडला. अगदी अलीकडे कोरोना महासाथीच्या काळात शेअर बाजारात झालेली पडझड आपण सर्वांनी पाहिली. त्यावेळेस घाबरून आपली गुंतवणूक काढून घेतलेल्या गुंतवणूकदारांना आज नक्कीच पश्चात्ताप होत असणार. त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या योजनेतून जर आपल्याला चांगला परतावा मिळवायचा असेल तर संयम असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

(लेखक प्रमाणित म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com