क्‍लोज एंडेड फंडांत गुंतवणूकसंधी 

अरविंद शं. परांजपे 
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

प्रश्‍न - राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) "निफ्टी' हा निर्देशांक 11 हजार अंशांच्या उच्चांकावरून आता अंदाजे 10,450 अंशांपर्यंत घसरला आहे. तरीसुद्धा इक्विटी फंडात गुंतवणूक करणे योग्य आहे का? 

प्रश्‍न - राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) "निफ्टी' हा निर्देशांक 11 हजार अंशांच्या उच्चांकावरून आता अंदाजे 10,450 अंशांपर्यंत घसरला आहे. तरीसुद्धा इक्विटी फंडात गुंतवणूक करणे योग्य आहे का? 
उत्तर - हो. कारण निर्देशांकाची निव्वळ पातळी बघण्यापेक्षा त्याचे सध्याचे आणि भविष्यातील मूल्यांकन कसे आहे, याला महत्त्व असते. पी/ई रेशो, प्राईस टू बुक (पी/पीबी), मार्केट कॅप टु जीडीपी या निकषांवरून असे दिसते, की हे मूल्यांकन दीर्घकालीन सरासरीपेक्षा फार काही जास्त नाही आणि अजूनही (विशेषतः बाजार घसरलेला असताना) गुंतवणूक करायला वाव आहे. डिसेंबर 2017 ला संपलेल्या तिमाहीच्या निकालांवरून असे दिसते, की पुढील काळात कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे, ज्यामुळे सध्याचे थोडे महाग असलेले मूल्यांकन योग्य पातळीवर येऊ शकेल. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या दीर्घकालीन भांडवली नफा कराचा प्रतिकूल परिणाम होणार नाही. सध्या बाजारात झालेल्या घसरणीचा संबंध प्रामुख्याने परदेशातील घटना-घडामोडींशी आहे. पुढील काळातही आर्थिक सुधारणा चालूच राहून देशाची प्रगती सात टक्‍क्‍यांपेक्षा अधिक होईल, असा अंदाज आहे. 

प्रश्‍न - अर्थसंकल्पानंतर खाली आलेल्या बाजारभावांचा विचार करता नव्या गुंतवणुकीसाठी कोणत्या संधी आहेत? 
उत्तर : नव्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातही मोदी सरकारची सुरवातीपासूनची दिशादर्शक वाटचाल स्पष्टपणे दिसते आहे. म्युच्युअल फंडाच्या नेहमीच्या चालू इक्विटी योजना तर आहेतच; त्याशिवाय सध्या कोटक म्युच्युअल फंडाची "इंडिया ग्रोथ फंड' आणि एल अँड टी म्युच्युअल फंडाची एल अँड टी अपॉर्च्युनिटीज फंड या दोन बंद प्रकारातील (क्‍लोज एंडेड) योजना उपलब्ध आहेत. त्यांचा विचार करता येईल. (दोन्ही योजनांची शेवटची तारीख 12 जानेवारी आहे.) 

प्रश्‍न - म्युच्युअल फंडांच्या खुल्या (ओपन एंडेड) योजनेतच खरेदी करावी, असे एक मत आहे. त्यामुळे बंद प्रकारातील (क्‍लोज एंडेड) योजनेत गुंतवणूक करावी का? 
उत्तर - आपल्याला तीन वर्षे पैसे लागणार नसतील तर क्‍लोज एंडेड योजनांचा नक्कीच विचार करता येऊ शकतो. त्यावर फुली मारण्याची गरज नाही. कोटकची इंडिया ग्रोथ फंड ही मल्टिकॅप योजना आहे; ज्यात मोठ्या, मध्यम आणि लहान कंपन्यांच्या शेअरचा समावेश असेल. एल अँड टी अपॉर्च्युनिटीज फंड या योजनेचा प्रामुख्याने छोट्या कंपन्यांच्या (स्मॉल कॅप) शेअरचा पोर्टफोलिओ असेल आणि यामुळे यातील जोखीम मल्टिकॅप योजनेपेक्षा जास्त आहे. गेल्या तीन वर्षांत मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअरनी मोठ्या कंपन्यांच्या शेअरपेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. पण या प्रकारातील चांगल्या कंपन्या शोधणे हे फार अवघड असते. यात विश्‍लेषकही कमी असतात. फंड व्यवस्थापकाच्या हुशारीला आणि अनुभवाला महत्त्व असते. 

प्रश्‍न - ही योजना तीन वर्षांनी बंद झाल्यावर काय पर्याय आहेत? तेव्हाची "एनएव्ही' आमच्या खरेदीपेक्षा कमी असू शकते का? 
उत्तर - कोटक इंडिया ग्रोथ फंडात संभाव्य उतरण टाळण्यासाठी सहा टक्‍क्‍यांचे निफ्टी पुट ऑप्शन्स घेतले जाणार आहेत. जर तीन वर्षांनी सध्याच्या पातळीच्या खाली बाजार आला, तर या पुट ऑप्शन्समुळे "एनएव्ही' राखली जाईल. इक्विटी योजनेत गुंतवणूक करताना शेअर बाजाराची जोखीम पत्करावीच लागते. ती घेऊनच त्यातील संभाव्य लाभाचा विचार करावा लागतो. तसेच इक्विटी प्रकारात किती गुंतवणूक करावी, याचे उत्तर तुमच्या ऍसेट ऍलोकेशनमध्ये दडलेले असते.

Web Title: marathi news sakal money finanace