मंदीचा इफेक्ट; मारूती ठेवणार उत्पादन बंद

पीटीआय
Wednesday, 4 September 2019

अर्थव्यवस्थेतील मंदी, कमी झालेली मालवाहतूक आणि घटलेले भाडेदर यामुळे व्यावसायिक वाहनांची विक्री कमी होत आहे. 

- गिरीश वाघ, अध्यक्ष, व्यावसायिक वाहन व्यवसाय विभाग, टाटा मोटर्स

नवी दिल्ली : मारुती सुझुकी कंपनीने गुडगाव आणि मानेसर या दोन प्रकल्पांमधील प्रवासी मोटारींचे उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांतील उत्पादन 7 आणि 9 सप्टेबरला बंद राहील. 

देशातील सर्वात मोठी प्रवासी मोटार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या विक्रीत गेल्या महिन्यात 32.7 टक्के घट झाली आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात कंपनीने 1 लाख 6 हजार 413 मोटारींची विक्री आणि निर्यात केली. गेल्या वर्षी याच महिन्यात ही संख्या 1 लाख 58 हजार 189 होती.

मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात उत्पादनात 33.99 टक्‍क्‍यांची कपात केली होती. सलग सातव्या महिन्यात उत्पादनात करण्यात आली होती. इतरही वाहननिर्मिती कंपन्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात घसरली आहे. आर्थिक मंदीमुळे ग्राहकांकडून मोटारींची मागणी सातत्याने कमी होत आहे. 

टाटा मोटर्सच्या विक्रीत 49 टक्के घट

टाटा मोटर्सच्या देशांतर्गत मोटार विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 49 टक्के घट झाली आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात 7 हजार 316 प्रवासी वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी ही संख्या 17 हजार 351 होती. यात मागील महिन्यात 58 टक्के घसरण झाली आहे. कंपनीची व्यावसायिक वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये 45 टक्‍क्‍याने घसरुन 21 हजार 824 वर आली आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये ती 29 हजार 140 होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maruti will put off production The impact of the recession