राजीव बजाज यांचा 'ऑटो' क्षेत्राला घरचा आहेर

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

भारतातील वाहन उद्योगावर रोखठोक भाष्य करताना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी या क्षेत्राला आत्मपरिक्षण करण्यास सांगितले आहे

मुंबई: भारतातील वाहन उद्योगावर रोखठोक भाष्य करताना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी या क्षेत्राला आत्मपरिक्षण करण्यास सांगितले आहे. सरकारकडून एखादी मदत मागण्याआधी वाहन उद्योग क्षेत्राने आपल्या कच्च्या दुव्यांवर काम करावे, असेही ते म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी यासंदर्भातील आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. अलीकडेच मारुती सुझुकी आणि महिंद्रा अॅंड महिंद्रा या देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी केंद्र सरकारकडे ऑटोमोबाईल क्षेत्राला मंदीतून बाहेर काढण्यासाठी खास प्रोत्साहनपर पॅकेजची मागणी केली होती. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणावर घटली असून नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सरकारकडून आर्थिक मदत मागण्याआधी या क्षेत्राने आंतरराष्ट्रीयदृष्ट्या स्पर्धात्मक होण्यासाठी आपण काय केले आहे याकडे पाहणे गरजेचे आहे. भारतीय वाहन उत्पादने ही साधारण दर्जाचीच आहेत. ऑटोमोबाईलमधील मंदी ही बहुतांश या क्षेत्रानेच ओढवून घेतली आहे. बहुंसंख्य कंपन्यांची निर्यात वाढत नसण्यामागे त्यांची उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची नाहीत हेच कारण आहे. मला कोणत्याही एका विशिष्ट कंपनीचे नाव घ्यायचे नाही मात्र जर तुम्ही स्कुटर, मोटरसायकल, कार, जीप, एसयुव्ही, ट्रक, बस आणि सुर्याखालील प्रत्येकच वस्तू बनवणार असाल तर हे पुरेसे स्पष्टच आहे की तुमच्या उत्पादनांचा दर्जा जागतिक असणार नाही, अशी मार्मिक टिप्पणी राजीव बजाज यांनी केली. सध्या वाहन उदोयगातील नोकऱ्या धोक्यात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे, त्यावर राजीव बजाज म्हणाले की सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अतिशय खडतर काळ सुरू आहे याबद्दल मी सहमत आहे मात्र त्यासंदर्भातील भीती पसरवण्याची आवश्यकता नाही. वाहन विक्रीत 5 ते 7 टक्क्यांनी घट झाली म्हणजे खूप मोठे अरिष्ट आले असे समजण्याचे कारण नाही. 

जर कठीण काळ असेल तर मी तुम्हाला नोकरीतून काढून टाकेन हा संदेश जर मी माझ्या कर्मचाऱ्यांना देणार असेल तर ते माझ्यावर कसा काय विश्वास ठेवतील. देशातील वाहन उत्पादक कंपन्यांनी भारतापलीकडील बाजारपेठेचा विचार करण्याची गरज आहे. देशांतर्गत खपात झालेली घट जागतिक बाजारपेठेतील निर्यात वाढवून भरून काढली पाहिजे असेही पुढे ते म्हणाले. आगामी येऊ घातलेल्या उत्सवी हंगामात खपात सुधारणेची अपेक्षा बजाज यांनी व्यक्त केली. सध्या देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र मोठ्या मंदीला सामोरे जात आहे. विक्रीत घट झाल्यामुळे देशातील डिलर्सकडून जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त नोकऱ्यांची कपात झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most of the automobile slowdown is the industry own making says Rajiv Bajaj