निश्‍चित उत्पन्नाची संधी

smart-investment
smart-investment

गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात झालेल्या चढ-उतारांमुळे (उतारच जास्त) शेअर्स, तसेच इक्विटी म्युच्युअल फंड योजनांतील आपल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी दिसू लागल्यामुळे अनेक गुंतवणूकदार निराश झाल्याचे जाणवत आहे. भांडवली बाजाराशी निगडित असलेल्या गुंतवणुकीवरील परताव्याबाबत कायमच अनिश्‍चितता असते; पण ज्यांना अशी अनिश्‍चितता नको असते आणि निश्‍चित दराने उत्पन्न हवे असते, अशा मंडळींसाठी पोस्टाच्या योजना, बॅंकेच्या मुदत ठेवींबरोबरच, विविध कंपन्यांचे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर (एनसीडी) आणि कॉर्पोरेट किंवा कंपनी एफडीचा पर्याय उपलब्ध असतो. सध्या बॅंकांच्या ठेवींवर; तसेच पोस्टाच्या योजनांतील गुंतवणुकीवर जास्तीत जास्त ७ ते ८ टक्‍क्‍यांपर्यंत व्याज मिळताना दिसते. पण यापेक्षा अधिक व्याज हवे असेल, तर थोडी जोखीम स्वीकारून ‘एनसीडी’ किंवा ‘कंपनी एफडी’चा पर्याय निवडता येऊ शकतो. 

बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) सध्या निधीचा तुटवडा जाणवत आहे. बॅंकांकडून होणारा अर्थपुरवठाही रोखला गेला आहे. अशा वेळी ‘एनसीडीं’चा मार्ग बऱ्याच कंपन्यांनी अवलंबिल्याचे दिसून येत आहे. अशा मार्गाने उभारलेल्या पैशांमुळे ‘एनबीएफसीं’कडील सध्याची निधीची चणचण दूर होऊ शकते. यानिमित्ताने त्यांचे कर्जपुस्तक वधारू शकते; शिवाय भांडवली पर्याप्ततेचे प्रमाणही (सीएआर) सुधारण्यास मदत होऊ शकते. 

‘एनसीडीं’चा पाऊस
विशेषतः गेल्या महिन्यापासून अशा एनसीडी इश्‍यूंना सुरवात झाली आणि या महिन्यात तर पाऊसच पडायला लागला आहे. विशेष म्हणजे गुंतवणूकदारांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता जाणवत आहे. कारण शेअर्स आणि म्युच्युअल फंडातून सध्या चांगला परतावा दिसत नसल्याने बरेच गुंतवणूकदार पुन्हा पारंपरिक निश्‍चित उत्पन्नाच्या पर्यायाच्या शोधात आहेत. त्यातच रिझर्व्ह बॅंकेने या वर्षात सलग चारवेळा मिळून आपल्या रेपो दरात १.१० टक्‍क्‍यांची कपात केली आहे, त्यामुळे एफडींवरील व्याजदरही कमी होण्याची दाट शक्‍यता आहे. अशावेळी जर कोणी बॅंकेच्या एफडीपेक्षा जास्त परतावा देत असेल तर त्याकडे छोटे गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. याद्वारे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत सध्या बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

‘एनबीएफसीं’कडून महिन्याभरात आलेल्या ‘एनसीडी इश्‍यूं’मध्ये दिल्या जात असलेल्या आकर्षक व्याजदरामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता दिसत आहे; पण हे इश्‍यू गुंतवणुकीसाठी कसे आहेत आणि त्यात गुंतवणूक करण्याआधी कोणत्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत, हे आताच जाणून घेणे गरजेचे आहे.

‘एनसीडी’ म्हणजे काय?
नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर म्हणजे अपरिवर्तनीय कर्जरोखे. या कर्जरोख्यांचे कंपनीच्या शेअरमध्ये रूपांतर होत नसते. दुसऱ्या भाषेत त्यांचे स्वरूप बाँड्‌ससारखे असते. त्यातील गुंतवणुकीवर निश्‍चित दराने व्याजाच्या रूपात परतावा मिळत असतो. अशा डिबेंचरची शेअर बाजारात नोंदणी केली जात असते. त्यामुळे मुदतीपूर्वी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग गुंतवणूकदारांना उपलब्ध असतो. परंतु, शेअर्सच्या तुलनेत एनसीडी किंवा बाँडचे व्यवहार कमी होतात, हेही लक्षात घेतले पाहिजे. जोपर्यंत तुमच्या नावावर हे डिबेंचर असतात, तोपर्यंत तुम्हाला त्याचे व्याज मिळते, तुम्ही जेव्हा ते दुसऱ्याला विकता, तेव्हा पुढील काळाचे व्याज नव्या गुंतवणूकदाराला मिळते. आजकाल हे डिबेंचर ‘डी-मॅट’ स्वरूपातच दिले जात आहेत, त्यामुळे सध्याच्या नियमानुसार त्यातून उद्‌गम करकपात (टीडीएस) केली जात नाही. मात्र, त्यांचे व्याज करपात्र असते, हे लक्षात ठेवायला हवे.

कोणत्याही ‘एनसीडी इश्‍यू’साठी अर्ज करण्यापूर्वी केवळ व्याजदराला भुलून न जाता, हे डिबेंचर सिक्‍युअर्ड किंवा अनसिक्‍युअर्ड अशा कोणत्या प्रकारात मोडणारे आहेत, संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती, त्यांच्या कामकाजाचे स्वरूप, कर्जवाटपाचा प्रकार, त्याला असलेले भवितव्य आणि सुरक्षिततेबद्दल दिले जाणारे ‘रेटिंग’ आदी गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत आणि मगच या ‘एनसीडीं’च्या पावसात आपणही भिजायचे का नाही, हे ठरवावे लागेल. सध्याचे ‘रेटिंग’ हे त्या-त्या डिबेंचर इश्‍यूसाठी असते. कंपनीच्या परिस्थितीनुसार त्यात बदल होऊ शकतो. त्याचा परिणाम संबंधित डिबेंचरच्या बाजारमूल्यावरही होऊ शकतो.  

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर या एनसीडींचे वाटप होत असते, त्यामुळे प्रारंभीच्या दिवसांत अर्ज करणाऱ्यांना हे डिबेंचर मिळण्याची शक्‍यता अधिक असते, हे लक्षात घ्यावे.

कंपनी एफडी
रिझर्व्ह बॅंकेने नुकतीच रेपो दरात पुन्हा कपात केली आहे. साहजिकच बॅंकांकडून कर्जाबरोबरच ठेवींवरील व्याजदरही थोडे कमी करण्याचे अपेक्षित पाऊल उचलले जाऊ लागले आहे. व्याजदरांची चढती कमान थांबलेली असून, या दरांचे ‘दक्षिणायन’ सुरू झाले आहे. एनसीडी इश्‍यूंबरोबरच काही चांगल्या कंपन्या मुदत ठेवी स्वीकारत असून, त्यांच्या रूपाने बॅंकांच्या एफडीपेक्षा अधिक व्याजदराचा पर्याय गुंतवणूकदारांना मिळतो. अर्थात, कंपनी एफडी या प्रकारात जास्त जोखीम (रिस्क) असते, त्यामुळे ज्यांची काही प्रमाणात ‘रिस्क’ घ्यायची तयारी असते, त्यांनीच या पर्यायाचा विचार करणे योग्य ठरेल. हा पर्याय स्वीकारताना कंपन्यांची निवड ही केवळ व्याजदरांवर अवलंबून न ठेवता, संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती, रेटिंग, ताळेबंद, नफ्याचे प्रमाण, लाभांशवाटप, कर्जाचा बोजा, बाजारातील तिची पत, संचालक मंडळ आदी गोष्टी तपासून करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकाच कंपनीत सर्व किंवा मोठी रक्कम ठेवण्याची चूक कधीही करू नये. अधिक व्याजदर मिळविण्याच्या प्रयत्नात मूळ मुद्दलच गायब होण्याची शक्‍यता नाकारता येत नसते. तेव्हा कंपनी एफडींचा पर्याय जरूर निवडावा, पण पुरेशी खातरजमा करून आणि त्यातील जोखीम लक्षात घेऊनच!

एफडी स्वीकारणाऱ्या काही कंपन्या
एचडीएफसी लि., बजाज फायनान्स, पीएनबी हाउसिंग फायनान्स, महिंद्र अँड महिंद्र फायनान्स, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com