अस्थिरतेत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय कराल?

Mutual-Fund
Mutual-Fund

बहुतेक छोटे गुंतवणूकदार हे शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूक करायला सुरवात करतात आणि जरा अस्थिरता दिसली, की घाईघाईने त्यातून बाहेर पडतात. म्युच्युअल फंडाचे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (एसआयपी) हे बाजारपेठेच्या अस्थिरतेचा फायदा करून देणारे सर्वांत योग्य साधन आहे. 

जगभरातील गुंतवणूकदारांना बाजारपेठेतील अस्थिरता हाताळणे अवघड जाते. कित्येक गुंतवणूकदार बाजारपेठेशी जोडलेली आपली गुंतवणूक वेळेआधीच काढून घेतात आणि त्याचे प्रमुख कारण अस्थिरता हे असते. या प्रक्रियेमध्ये त्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा मिळत नाही. कित्येकदा ते नुकसान सहन करून बाजारपेठेतून बाहेर पडतात. इक्विटी फंड आणि इक्विटी ओरिएंटेड हायब्रीड फंडशी निगडित गुंतवणूकदारांच्या बाबतीत हे जास्त प्रमाणात घडते. मग, अशा प्रकारच्या अस्थिर बाजारपेठेत म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओचे काय करावे, या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी मी पुढील पाच गोष्टी सांगत आहे. त्याचा गुंतवणूकदारांना उपयोग होऊ शकेल, असे मला वाटते. 

आर्थिक ध्येय मनात ठेवा!
गुंतवणुकीचे उद्दिष्ट हे केवळ कोणत्या तरी गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवणे एवढेच नसते, तर तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी बचत करण्याचे कारणही त्यामागे असते. तुमची संमिश्र गुंतवणूक म्हणजेच गुंतवणुकीचा संमिश्र पोर्टफोलिओ सातत्याने चांगली कामगिरी करतो तेव्हाच उद्दिष्ट गाठणे शक्‍य होते. बाजारपेठेतील प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीमध्ये गुंतवणुकीचे निर्णय घेताना दूरगामी चित्र मनात ठेवायला हवे. बाजारपेठेचा अस्थिरपणा तुमच्या आर्थिक उद्दिष्टांकडे नेणाऱ्या वाटचालीवर परिणाम करीत आहे का आणि त्यात बदल करण्याने खरोखरच मदत होणार आहे का, हे तपासा. जर तुम्ही गेली पाच वर्षे मुलाच्या उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक करत असाल आणि तो पैसा तुम्हाला आजपासून दहा वर्षांनंतर लागणार असेल, तर सध्याची अस्थिर बाजारपेठ तुमच्यासाठी केवळ चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल. 

जोखमीला विरोध नको!
अस्थिर बाजारपेठेत बहुतेक गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक नुकसानच करणारी ठरेल, असे मानतात. पण, संयम ठेवून तुम्ही योग्य काळ गुंतवणूक कायम ठेवलीत, तर तसे होण्याची शक्‍यता नसते. कित्येक अहवाल असे सांगतात, की ८ ते १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी केलेली इक्विटी गुंतवणूक बहुतेक वेळेस उत्तम परतावा देते. त्याउलट बाजारपेठ अस्थिर असताना किंवा बाजारपेठेत तीव्र घसरण होत असताना, वेळेआधी बाहेर पडणाऱ्या गुंतवणूकदारांचे नुकसान होते. म्हणूनच मुलाचे शिक्षण किंवा निवृत्तीसारखे आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी, दीर्घकाळात तुम्हाला मदत करू शकणारी जोखीम टाळण्यापेक्षा तुमचे नुकसान करणाऱ्या गोष्टी टाळणे जास्त महत्त्वाचे आहे. 

अस्थिरतेशी मैत्री करा!
अस्थिरतेशी मैत्री करा, हा माझा सल्ला तुम्हाला विचित्र वाटेल, पण खरेतर तुम्ही अस्थिर बाजारपेठेचा फायदा घेऊन अधिक समृद्ध होऊ शकता. बहुतेक छोटे (रिटेल) गुंतवणूकदार हे शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूक करायला सुरवात करतात आणि जरा अस्थिरता दिसली, की घाईघाईने त्यातून बाहेर पडतात. जेव्हा तुम्ही थेट शेअर्सऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता, तेव्हा योजनेच्या वैविध्यतेमुळे बाजार कोसळल्याने होणारे नुकसान हे वैयक्तिक शेअर्समधील नुकसानाच्या तुलनेत कमी असते.

शिवाय, म्युच्युअल फंडाचे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (एसआयपी) हे तुम्हाला बाजारपेठेच्या अस्थिरतेचा फायदा करून देणारे सर्वांत योग्य साधन आहे. म्युच्युअल फंड योजनेतील या सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे बाजारपेठेत तेजी असताना कमी युनिट्‌स आणि मंदी असताना जास्त युनिट्‌स खरेदी केले जातात. या प्रक्रियेमध्ये कालांतराने युनिट्‌स खरेदी करण्याची सरासरी किंमत कमी होते आणि तुम्हाला नियमितपणे केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होतो. अस्थिर बाजारपेठेत ‘एसआयपी’ थांबविण्याची किंवा ‘एसआयपी’मधून बाहेर पडण्याची वृत्ती आढळून येते. मात्र, याच्या अगदी उलट करायला आहे म्हणजेच ‘एसआयपी’ सुरूच ठेवायला हवी आणि शक्‍य असल्यास अतिरिक्त गुंतवणूक करायला हवी.  

कामगिरीचे विश्‍लेषण करा!
गुंतवणूकदारांमध्ये कायम आढळून येणारी एक चुकीची सवय म्हणजे ते त्यांच्या गुंतवणुकीच्या कामगिरीची तुलना इतर प्रकारच्या योजनांच्या कामगिरीशी करतात. लार्ज कॅप इक्विटी योजनेतील गुंतवणुकीची तुलना त्याच योजनेच्या मापदंडाशी किंवा इतर लार्ज कॅप योजनांशीच केली गेली पाहिजे. म्युच्युअल फंडातील वैयक्तिक गुंतवणुकीची तुलना दुसऱ्या ॲसेट क्‍लासशी म्हणजे सोने अथवा स्थावर मालमत्तेशी केल्यास मनात विनाकारण भीती निर्माण होते व ती भीती तुमच्या दीर्घकालीन गुंतवणूक योजनांवर परिणाम करते. जर, तुमचा पोर्टफोलिओ ॲसेट क्‍लासच्या बाजूने असंतुलित झाला असेल, तर आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन तो पूर्ववत करा. अस्थिर बाजारपेठेत असे करणे जास्त महत्त्वाचे असते.

(लेखक आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com