esakal | म्युच्युअल फंडात संयमाची कसोटी
sakal

बोलून बातमी शोधा

म्युच्युअल फंडात संयमाची कसोटी

म्युच्युअल फंडात संयमाची कसोटी

sakal_logo
By
अरविंद शं. परांजपे

अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पण गेल्या वर्षभरापासून ज्यांनी गुंतवणुकीला सुरवात केली आहे, त्यांना सध्या फायदा झालेला दिसत नाही. परंतु म्युच्युअल फंडात संयम ठेवून, दीर्घकाळ, शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास फायदा होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्‍यात, या गुंतवणूक प्रकारात आपल्या संयमाची बऱ्याचदा कसोटी लागते. यानिमित्ताने सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्‍नांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न...     

प्रश्‍न - गेले वर्षभर आम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतोय. पण आम्हाला फायदा होताना दिसत नाही आणि काही योजनांमध्ये आमचे मुद्दलही कमी झाले आहे. त्याऐवजी आम्ही बॅंकेत पैसे ठेवले असते तर व्याज तरी मिळाले असते...

उत्तर - हे खरे आहे, की गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या शेअर बाजाराची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. मिड कॅप, स्मॉल कॅप योजनांचे मूल्यही कमी झाले आहे. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे, की म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांची कामगिरी दरवर्षीच चमकदार राहील, अशी अपेक्षा ठेवणे रास्त नाही. तसेच इक्विटी योजनांच्या परताव्याची तुलना बॅंक ठेवींवरील व्याजाशी करणेही योग्य नाही. याचे कारण शेअर बाजार कधीच ठराविक गतीने वाटचाल करून निश्‍चित परताव्याची हमी देत नाही. तो कायमच वर-खाली होत राहणार, याची तयारी ठेवली पाहिजे. ३ ते ५ वर्षांच्या कालावधीनंतर त्यातील जोखीम कमी होत जाते. त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी दरवर्षी ठराविक परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेऊ नये. महत्त्वाचे म्हणजे अल्प काळातील परताव्याकडे पाहून लगेच निष्कर्ष काढू नये. 

प्रश्‍न - सध्याच्या काळातील शेअर बाजाराची कामगिरी खालावली आहे, त्याची काय कारणे आहेत?

उत्तर - एक वर्षापूर्वी आपल्या सर्वसाधारण अर्थव्यवस्थेत (मॅक्रो फॅक्‍टर) असलेली मजबुती आता थोडी कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या भावातील वाढ (८० डॉलर प्रति पिंप), रुपयाचे घसरलेले मूल्य (१ अमेरिकी डॉलर = ६९ रुपये), थोडासा वाढलेला व्याजदर, आधीच्या वर्षीपेक्षा थोडी जास्त अपेक्षित महसुली तूट, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या नव्या सरकारविषयीची अनिश्‍चितता, अमेरिकेने सुरू केलेले व्यापार युद्ध अशा काही बाबींचा उल्लेख करता येईल, ज्यामुळे बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. परंतु कमकुवत रुपयाने आयात महाग झाली असली तरी निर्यातदार खूष आहेत. (आयटी कंपन्यांचे भाव वधारले आहेत.)

प्रश्‍न - यापुढचे चित्र कसे राहील? 

उत्तर - कंपन्यांचे नफे अजूनही अपेक्षेइतके येत नसल्याने मूल्यांकनाच्या दृष्टीने शेअर बाजार थोडा महाग असल्याची भावना आहे. सध्याचा ‘सेन्सेक्‍स’चा २२.६ हा पीई रेशो हा गेल्या १० वर्षांच्या १८.९ या सरासरीपेक्षा जास्त आहे. पण आपल्या देशाच्या अर्थव्यस्थेच्या दृष्टीने पुढील काही अनुकूल बाबी असल्याने नजीकच्या भविष्यकाळात कंपन्यांचे नफे वाढून त्याचे मूल्यांकन योग्य होईल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. १) ‘जी २०’ देशांमध्ये सर्वांत अधिक वेगाने (७ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त) प्रगती करणारा देश, २) परकी चलनाचा समाधानकारक राखीव निधी, ३) शेतीमालाचे हमीभाव वाढविल्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम होण्याची अपेक्षा, ४) वाहन, सिमेंट, रस्ते, भांडवली उद्योग आदी क्षेत्रात भरीव वाढ, ५) ‘जीएसटी’ला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यातून अर्थव्यवस्थेतील करसंकलनाला बळकटी आली आहे. अधिकाधिक उद्योग आता कररचनेत सामील झाल्याने पायाभूत सुविधांच्या विकासाला मजबुती येण्याची अपेक्षा आहे, ६) रेल्वे (प्रवासी आणि मालवाहतूक), विमान प्रवासी यांत लक्षणीय वाढ झाली आहे. आधार जोडणीमुळे सबसिडीच्या खर्चावर नियंत्रण आले आहे, ७) या वर्षीचा मॉन्सूनचा अंदाज सर्वसामान्य राहील, असे वाटत आहे, ८) बॅंकांच्या ‘एनपीए’तून वसुली सुरू झाली आहे. 

प्रश्‍न - मग आम्ही कशात गुंतवणूक करावी?  
उत्तर - आपल्या ॲसेट ॲलोकेशननुसार इक्विटी, बॅलन्स्ड आणि डेट योजनांमधे गुंतवणूक करावी. इक्विटी योजनेत एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा ‘एसटीपी’द्वारे केली तर जोखीम कमी होईल. ‘एसआयपी’मध्ये जरी सध्या तोटा दिसत असला तरीही ‘एसआयपी’ चालूच ठेवावे. कारण कमी दरात युनिट्‌स मिळाली तर नंतर जास्त फायदा होतो. मिड/स्मॉल कॅप योजनेपेक्षा लार्ज कॅप योजनांचे मूल्यांकन कमी असल्याने त्यांचा विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांच्या मदतीने योजनांची निवड करून गुंतवणुकीचा निर्णय घेणे हिताचे ठरेल.

loading image