esakal | 'कॅम्स'चा आयपीओ: 'फर्स्ट मूव्हर'चा फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

ipo

देशातील सर्व म्युच्युअल फंडांकडे असलेल्या मालमत्तेमधील७०टक्के हिस्सा या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली येतो.या व्यतिरिक्त इन्शुरन्स कंपन्या,बॅंकिंग,बिगर-बॅंकिंग वित्तीयसंस्था यांनाही ही कंपनी सेवा पुरविते

'कॅम्स'चा आयपीओ: 'फर्स्ट मूव्हर'चा फायदा

sakal_logo
By
नंदिनी वैद्य

प्रश्‍न - ‘कॅम्स’च्या बहुचर्चित ‘आयपीओ’बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?
- कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लि.चा (कॅम्स) ‘आयपीओ’ २१ ते २३ सप्टेंबर २०२० दरम्यान प्राथमिक बाजारामध्ये विक्रीसाठी खुला होत आहे. २२४४ कोटी रुपयांचा हा इश्‍यू असून, यासाठीचा किंमतपट्टा प्रतिशेअर रु. १२२९-१२३० असा ठेवण्यात आला आहे. किमान १२ व त्यापुढे १२ शेअरच्या पटीत मागणी करता येणार आहे. या शेअरची नोंदणी १ ऑक्‍टोबर २०२० रोजी दुय्यम बाजारात (मुंबई शेअर बाजार) होणार आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
प्रश्‍न - कंपनीची प्राथमिक माहिती व व्यवसायाचे स्वरूप कसे आहे?
- म्युच्युअल फंड व्यवसायासाठी रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट म्हणून मागील २० वर्षे ‘कॅम्स’ व्यवसाय करीत आहे. थोडक्‍यात, एखादा गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायला आल्यापासून ते पैसे परत घेण्यापर्यंत ज्या सर्व प्रक्रियांमधून तो जातो, ते सर्व काम ही कंपनी करते. देशातील सर्व म्युच्युअल फंडांकडे असलेल्या मालमत्तेमधील (एयूएम) ७० टक्के हिस्सा या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली येतो. या व्यतिरिक्त इन्शुरन्स कंपन्या, बॅंकिंग व बिगर-बॅंकिंग वित्तीय संस्था यांनाही ही कंपनी सेवा पुरविते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
प्रश्‍न - कंपनीची आर्थिक कामगिरी कशी आहे?
- कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली असून, मागील तीन वर्षांत उत्पन्न ६५७ कोटी रुपयांपासून ७२ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. नफा १४६ कोटी रुपयांपासून १७३ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. जून २०२० अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये उत्पन्न १६३ कोटी रुपये, तर नफा ४० कोटी रुपये होता. ‘रिटर्न ऑन नेटवर्थ’ ३० टक्‍क्‍यांच्या वर आहे. 

प्रश्‍न - आगामी काळात व्यवसायासाठी असलेले धोके काय आहेत?
- म्युच्युअल फंड व्यवसायावर अवलंबून असलेली कंपनीची व्यवसायवाढ, मोजक्‍या ग्राहकांभोवती असणारा व्यवसाय, स्पर्धा, साचेबद्ध कामामुळे नावीन्य व कल्पना यांना असणारा कमी वाव आदी धोके असू शकतात.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्‍न - छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी हा ‘आयपीओ’ कसा आहे?
- पी-ई रेशो, पी-बुक रेशोचा विचार केल्यास या इश्‍यूची किंमत महाग वाटते. या कंपनीशी तुलना होईल, अशी कोणतीही दुसरी कंपनी आता बाजारात नाही. मात्र, बाजारात ‘फर्स्ट मूव्हर’ असण्याचा फायदा, आगामी काळात म्युच्युअल फंड व्यवसायात अपेक्षित असलेली वाढ, या व्यवसायात नव्याने येणाऱ्यांसाठी असणारे अडथळे (एन्ट्री बॅरिअर) आणि परिणामी कमी स्पर्धा, ॲसेट-लाइट मॉडेल, झिरो डेट स्टेटस, उत्तम आर्थिक कामगिरी, देशभरातील २५ राज्यांमध्ये पसरलेले व्यवसायाचे मजबूत जाळे या बाबींमुळे इश्‍यू आकर्षक वाटतो. नोंदणीच्या (लिस्टिंग) वेळी उत्तम परताव्यासाठी व दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूकदारांनी अर्ज करायला काहीच हरकत नाही.

‘हॅपीएस्ट माइंड्‌स’चे शेअरधारक मालामाल
हॅपीएस्ट माइंड्‌स टेक्‍नॉलॉजीज लि. या बहुचर्चित शेअरची गेल्या आठवड्यात बाजारात शानदार नोंदणी झाली. त्यामुळे ‘आयपीओ’मध्ये ज्यांना या कंपनीचे शेअर मिळाले, ते गुंतवणूकदार मालामाल झाले. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरची रु. ३५० वर नोंदणी झाली. शेअरची विक्री किंमत रु. १६६ होती. त्यामुळे हा शेअर ११० टक्‍क्‍यांहून अधिक प्रीमियमने नोंदला गेला. कंपनीच्या ‘आयपीओ’ला तब्बल १५१ पट प्रतिसाद मिळाला होता. बऱ्याच दिवसांनंतर आलेल्या ‘आयपीओ’ला गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने ‘आयपीओ’ला सुगीचे दिवस येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

‘एंजल ब्रोकिंग’चाही ‘आयपीओ’
शेअर ब्रोकिंग क्षेत्रातील नामवंत कंपनी असलेल्या एंजल ब्रोकिंग लि.ची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) २२ ते २४ सप्टेंबर २०२० या काळात होत आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरसाठी रु. ३०५ ते ३०६ असा किंमतपट्टा जाहीर करण्यात आला आहे. या ‘आयपीओ’मध्ये कंपनीच्या सरासरी ६०० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअरचा समावेश असून, त्यात सरासरी ३०० कोटी रुपयांच्या नव्या शेअरचा समावेश आहे. कमीत कमी ४९ शेअरसाठी आणि त्यानंतर ४९ शेअरच्या पटीत मागणी करता येऊ शकते. आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज् लि., एडलवाइस फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. आणि एसबीआय कॅपिटल लि. हे या इश्‍यूसाठीचे प्रमुख लीड मॅनेजर असतील.

(डिस्क्‍लेमर - लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहे. तिने तिच्या अभ्यासातून वरील मत मांडले आहे. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वत-च्या जबाबदारीवर व तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)