शेअर बाजार - संकटात संधी!

share market
share market

उद्योग क्षेत्रात सध्या मंदीसदृश परिस्थितीची चर्चा सुरू आहे. परंतु मंदी आणि तेजी यांचे चक्र कायमच चालू असते. त्यामुळे मंदीनंतर तेजी आणि तेजीनंतर मंदी हा निसर्गनियम आहे. आपल्या शेअर बाजारात आतापर्यंत दहा टक्के घसरण झाली आहे. अशा वेळी हा बाजार ज्याची आतुरतेने वाट बघत होता, त्या बाजाराला चालना देणाऱ्या योजनांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच घोषणा केली आहे. संपूर्ण बाजाराचे ‘सेंटिमेंट’ सुधारण्यासाठी त्याचा निश्‍चित उपयोग होणार आहे.

गेले एक वर्ष सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी थोडे कठीणच गेले आहे. निश्‍चित परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये घटणारे व्याजदर, रिअल इस्टेटमध्ये ठप्प झालेली गुंतवणूक बघता शेअर बाजार हा एक आधार वाटत होता. पण गेल्या वर्षात निफ्टी निर्देशांकाने उणे ६.५ टक्के परतावा दिला, तर मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांची परिस्थिती त्याहून वाईट म्हणजे उणे २० टक्के अशी होती. निफ्टी निर्देशांकामध्येदेखील केवळ १०-१२ कंपन्यांच्या शेअरनीच चांगला परतावा दिला. साहजिकच त्या अनुषंगाने इक्विटी म्युच्युअल फंडांची कामगिरीदेखील खराब झाली आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये काळजीचे सावट पसरले आहे आणि नेहमीप्रमाणे इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी की न करावी हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने तातडीने निर्णय घेऊन बालाकोट येथे जो प्रतिहल्ला केला होता, त्या वेळची तत्परता पाहून शेअर बाजार एकदम खूश झाला होता. त्यावर कळस चढवला तो लोकसभेच्या निवडणूक निकालांनी. बहुमतातील सरकार स्थापन झाले आणि त्यामुळे ऑक्‍टोबर २०१८ मध्ये १० हजारांवर असणारा ‘निफ्टी’ पुढच्या सात महिन्यांमध्येच १२ हजारांपर्यंत गेला. पण ‘बीएसई सेन्सिटिव्ह इंडेक्‍स’ असे ज्याचे नावच आहे, त्यानुसार एखादे कारण बाजारामध्ये संवेदनशीलता किंवा अस्वस्थता निर्माण करण्यास पुरेसे ठरते. पाच जुलै रोजी जो अर्थसंकल्प सादर केला गेला, त्यामध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरवर (एफपीआय) अधिभार (सरचार्ज) लावण्याचे निमित्त झाले आणि ‘निफ्टी’ घसरायला लागला. तो १२ हजारांवरून आता परवा १०,८२९ अंशांवर बंद झाला.

घसरण कशामुळे?
अर्थसंकल्पातील काही तरतुदींशिवाय अजून काही घटक या घसरणीला साह्यभूत ठरले. बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी); तसेच काही नावाजलेल्या कंपन्यांच्या शेअरचे (उदा. येस बॅंक, डीएचएफएल, जैन इरिगेशन, सिंटेक्‍स प्लॅस्टिक) बाजारभाव तरलता (लिक्विडिटी) व इतर अंतर्गत कारणांमुळे जोरदार पडले. या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल फारसे चांगले लागलेले नाहीत; शिवाय आगामी निकालांबाबतदेखील बाजार साशंक आहे. मागील दोन महिन्यांत परकी वित्तीय संस्थांनी केलेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे दीड-दोन महिन्यांत रुपयाचे प्रति डॉलर ६८.५० पासून ७१.९१ इतके अवमूल्यन झाले. वाहन उद्योगामध्ये वाहनविक्रीचे आकडे खराब येत आहेत, नव्या रोजगारनिर्मितीमध्ये घट दिसत आहे. स्थानिक पातळीवर हे घडत असताना, जागतिक बाजारात अमेरिका-चीन व्यापार युद्धासारखे घटक अजून अस्वस्थता निर्माण करीत आहेत.

तेजी-मंदीचे चक्र
शेअर बाजारामध्ये आता १० टक्के घसरण तर झाली आहेच; पण आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याचे काय करायचे? हे खरे आहे, की मंदीसदृश परिस्थिती आता दिसत आहे; परंतु मंदी आणि तेजी यांचे चक्र कायम चालू असते. त्यामुळे मंदीनंतर तेजी आणि तेजीनंतर मंदी हा निसर्गनियम आहे. प्रत्येक क्षेत्रात अशा परिस्थितीचा सामना करावाच लागतो. बाजारामध्ये दीर्घ कालावधीमध्ये तर्क (लॉजिक) काम करीत असला, तरी अल्प कालावधीमध्ये भावना (सेंटिमेंट) काम करतात. परिणामी, सरकारकडून बाजार सावरण्यासाठी काही घोषणांची अपेक्षा निर्माण होते आणि त्या झाल्या की बाजाराची मनःस्थिती सुधारू शकते. 

‘सेंटिमेंट’ सुधारतील
अखेर ज्याची शेअर बाजार आतुरतेने वाट बघत होता, त्या बाजाराला चालना देणाऱ्या योजनांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच घोषणा केली आहे. संपूर्ण बाजाराचे ‘सेंटिमेंट’ सुधारण्यासाठी त्याचा निश्‍चित उपयोग होणार आहे. त्यामुळे आज (सोमवारी) बाजार गॅप-अप म्हणजे मोठ्या फरकाने वर जाण्याची शक्‍यता आहे. दीर्घ कालावधीसाठी अशा घोषणा या फक्त मलमपट्टीचे काम करतात, हे अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटकाने लक्षात ठेवले पाहिजे व त्यानुसार अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी आपली जबाबदारी उचलली तरच शाश्वत, चांगले परिणाम दिसू शकतील.

घसरणीत संधी
गेल्या ४० वर्षांमध्ये आपला देश अनेक बऱ्या-वाईट घटनांना सामोरा गेला आहे. तरीदेखील बीएसई सेन्सेक्‍स या निर्देशांकाने १९७९ मधील १०० अंशांच्या पातळीपासून आतापर्यंत ३६ हजार अंशांपर्यंत झेप घेतली आहे. ‘सीएजीआर’ पद्धतीने वाढीचा हा दर १५-१६ टक्के येतो. अधेमधे बाजार जेव्हा निराशेच्या गर्तेत जाऊन घसरतो, तेव्हा हा आकडा लक्षात ठेवला पाहिजे, म्हणजे सध्याच्या बाजारातील घसरणीला संकट न मानता एक संधी मानता येईल.

गुंतवणुकीसाठी कोणती क्षेत्रे आकर्षक ठरतील?
गेल्या वर्षभरामध्ये लार्जकॅपपेक्षा स्मॉल व मिडकॅप शेअर खूप जास्त प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे गुंतवणुकीच्या संधी तेथे अधिक दिसत आहेत. परंतु येथील गुंतवणूक ही म्युच्युअल फंडाच्या मार्गाने करणे जास्त श्रेयस्कर ठरेल. कारण अशा शेअरचा अभ्यास वैयक्तिक स्तरावर करणे अवघड असते. तसेच पॅसिव्ह-इंडेक्‍स फंडामध्ये पैसे गुंतविणेदेखील योग्य ठरू शकेल. लार्जकॅप शेअरचा विचार करायचा झाला, तर सध्या आयटी व फार्मा क्षेत्रातील निवडक कंपन्या, विपणन व वितरण क्षेत्रातील गॅस कंपन्या व विमा क्षेत्रातील कंपन्या गुंतवणुकीसाठी चांगल्या ठरू शकतील, असे वाटते.

(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com