स्मार्ट विश्‍लेषण : आनंद राठी वेल्थ ‘आयपीओ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPO
स्मार्ट विश्‍लेषण : आनंद राठी वेल्थ ‘आयपीओ’

स्मार्ट विश्‍लेषण : आनंद राठी वेल्थ ‘आयपीओ’

चालू वर्षभर प्राथमिक समभाग विक्रीचा (आयपीओ) अक्षरशः वर्षाव सुरू आहे. या दशकातील सर्वांत जास्त ‘आयपीओ’ २०२१ मध्ये आले आहेत. या महिन्यात जे ८-१० ‘आयपीओ’ येणार आहेत. त्यामध्ये तेगा इंडस्ट्रीजच्या भरभरून प्रतिसाद मिळालेल्या ‘आयपीओ’बरोबरच, आनंद राठी वेल्थ; तसेच श्रीराम प्रॉपर्टीज, मॅपमायइंडिया, गो एअरलाईन्स, अदानी विल्मर, मेट्रो ब्रँडस, व्हीएलसीसी, जेमिनी एडिबल असे महत्त्वाच्या कंपन्यांचे ‘आयपीओ’ असणार आहेत.

सध्या ज्या कंपनीचा ‘आयपीओ’ चालू आहे, तो म्हणजे आनंद राठी वेल्थ लि.! बिगरबँकिंग वित्तसंस्थांमध्ये, म्युच्युअल फंड वितरकांमधील पहिल्या तिघांमध्ये ही संस्था येते. संपत्ती व्यवस्थापन हा कंपनीचा व्यवसाय आहे. त्या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड वितरणामधून मिळणारे कमिशन, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरमधून मिळणारे उत्पन्न असे विविध स्त्रोत आहेत. रु. ६५९ कोटींचा हा इश्यू असून, आजपर्यंत (६ डिसेंबर) तो विक्रीसाठी उपलब्ध आहे. यासाठीचा किंमतपट्टा प्रतिशेअर रु. ५३० ते ५५० आहे. कमीतकमी २७ शेअर व त्याच्या पटीत अर्ज करता येणार आहे.

कंपनीची बलस्थाने

  • मागील तीन वर्षांमध्ये व्यवस्थापनाखालील संपत्ती २० टक्के दराने वाढली. कंपनीच्या ग्राहकांमध्ये देखील तेवढीच वाढ झाली.

  • संपत्ती व्यवस्थापन या व्यवसायाला खेळते भांडवल खूप कमी लागते आणि ‘ऑपरेटिंग लिव्हरेज’चा मोठा फायदा होतो.

  • घटत्या व्याजदरामुळे इतर गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळणे आता क्रमप्राप्त झाले आहे. म्युच्युअल फंड, अॅसेट मॅनेजमेंटबरोबरच पीएमएस, स्ट्रक्चर्ड प्रॉडक्ट आदींकडे गुंतवणूकदारांचा ओघ वळणे साहजिकच आहे. त्यामुळे भविष्यात कंपनीच्या व्यवसायाला खूप वाव आहे.

कमकुवत बाबी

  • कंपनीचे उत्पन्न आणि ओघाने नफाही शेअर बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे २०२०-२१ मध्ये कोरोना महासाथीच्या काळात कंपनीच्या नफ्यावर लक्षणीय परिणाम झाला होता.

  • कंपनीचे एक तृतीयांश उत्पन्न म्युच्युअल फंड वितरणातील कमिशनमधून होते. २०२१ मध्ये नियामकांचे काही निर्बंध आल्यामुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. ही बाब कंपनीच्या नियंत्रणाबाहेरची असली तरी त्याची दखल घ्यावी लागते.

  • रेग्युलेटरी कम्प्लायन्स संदर्भातील काही बाबींची पूर्तता कंपनीकडून झालेली नाही.

कंपनीचे मूल्यांकन व शिफारस

कंपनीचा तुलनात्मक अभ्यास करायचा झाल्यास, याच क्षेत्रातील ‘आयआयएफएल वेल्थ’ही दुय्यम बाजारात नोंदली गेलेली दिसते. ‘पीई रेशो’चा विचार केला असता, आनंद राठी १९, तर आयआयएफएल २४ च्या ‘पीई’ने बाजारात आहे. ‘मार्केट कॅप’ वा ‘एयुएम’ लक्षात घेता, या कंपनीचा ७.६ टक्के, तर आयआयएफएलचा १० टक्के आहे. आनंद राठी कंपनीचा व्यवसाय या दृष्टीने विचार केला, तर फक्त ‘ब्रोकिंग’च्या पलीकडे जाऊन कामाचे स्वरूप हे प्रामुख्याने अॅसेट मॅनेजमेंट कंपनीसारखे आहे. त्यामुळे मूल्यांकन करताना तसा थोडा विचार करावा लागेल. रु. ५५० ही इश्यू किंमत गृहित धरली असता, ‘इपीएस’ २९.५ येते, तर ‘पीई रेशो’ १८.७ येतो, तर ‘पीबी’ ५.६ येते. त्यानुसार इश्यू किंमत महाग वाटते; तसेच ब्रोकिंग क्षेत्रात डिस्काउंट ब्रोकर मोठ्या संख्येने येत असल्यामुळे पारंपरिक ब्रोकर संस्थांचे महत्त्व थोडे कमी होऊ लागले आहे. आगामी काळात संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांना अधिक महत्त्व येणार असले, तरीही प्रचंड स्पर्धा, बाजार नियामकांचे वाढत जाणारे निर्बंध, वारंवार तेजी-मंदीमधून जाणारा शेअर बाजार या जोखीम सांभाळत या व्यवसायाला पुढे वाटचाल करावी लागणार आहे.

या सर्व बाबींचा विचार करता गुंतवणूकदारांनी नोंदणीच्या दृष्टीने या इश्यूला अर्ज करण्यास हरकत नाही. पण पोर्टफोलिओअंतर्गत दीर्घकालीन मुदतीसाठी कायम ठेवला जावा अशा शेअरमध्ये या शेअरची गणना होऊ शकणार नाही.

(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहे. तिने तिच्या अभ्यासातून वरील मत मांडले असून, त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही.)

टॅग्स :IPOWealth