सक्सेस स्टोरी : ‘ब्यूटि’फूल बिलियनेअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Falguni nair
सक्सेस स्टोरी : ‘ब्यूटि’फूल बिलियनेअर

सक्सेस स्टोरी : ‘ब्यूटि’फूल बिलियनेअर

sakal_logo
By
नंदिनी वैद्य

वेलनेस आणि ब्यूटी प्रॉडक्ट्सचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म चालविणाऱ्या नायका कंपनीची १० नोव्हेंबरला शेअर बाजारात नोंदणी झाली आणि त्याबरोबरच फाल्गुनी नायर हे नाव घराघरांत पोहचले. रु. ११२५ या इश्यू प्राईसने आणलेल्या ‘आयपीओ’ची रु. २०१८ ने शेअर बाजारात दणक्यात नोंदणी झाली आणि फाल्गुनी नायर या भारतातील पहिल्या ‘सेल्फ मेड बिलियनेअर’ ठरल्या. या नोंदणीमुळे नायर यांची संपत्ती सुमारे रु. ५० हजार कोटींच्या (६.५ बिलियन डॉलर) घरात गेली.

PLEASE LEARN TO DREAM YOURSELVES असा खास सल्ला महिलांना देणाऱ्या फाल्गुनी यांनी CATCH THEM YOUNG या संकल्पनेला चांगल्या अर्थाने छेद दिला. वयाच्या ५० वर्षांपर्यंत त्यांनी कोटक बँकेत एक यशस्वी ‘इन्व्हेस्टमेंट बँकर’ म्हणून काम केले. कोटक बँकेमध्ये काम करीत असताना नवनवे व्यावसायिक त्यांच्या व्यवसाय उभारणीसाठी कसे झपाटलेले असतात, हे जवळून बघण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यातूनच त्यांच्यातील उद्योजिका जागी व्हायला लागली. व्यक्तीला तळमळ असेल, काहीतरी नवे करण्याची जिद्द असेल, तर वय कधीच तिच्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाही, हे फाल्गुनी यांच्या आतापर्यंतच्या प्रवासातून दिसून येते. अशा अडनडी वयात नोकरी सोडणार म्हटल्यावर बरेच जणांनी हे काय mid-life crisis आहे की काय, अशी शंका व्यक्त केली. पण प्रेरित व्यक्तीला कोणीच थांबवू शकत नाही. त्यामुळे ५० व्या वर्षी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी २०१२ मध्ये ई-कॉमर्स सारख्या नवख्या क्षेत्रात उडी मारली. आयआयएम अहमदाबाद मधून एमबीए प्राप्त केलेल्या फाल्गुनी यांना ‘कोटक’मध्ये काम केल्यामुळे अर्थक्षेत्राचा दांडगा अनुभव होता; परंतु टेक्नॉलॉजी, ब्यूटी, फॅशन या क्षेत्राशी काहीही संबंध नसताना त्यांनी या व्यवसायात उडी घेतली. परदेशात असताना त्यांना समजले होते, की ज्या प्रमाणात तिथे ब्यूटी या संकल्पनेला महत्त्व आहे, तेच महत्त्व आज ना उद्या आपल्या देशात येणार आहे आणि पुढे अक्षरशः फोफावत जाणार आहे. हीच संधी ओळखून त्यांनी योग्यवेळी या क्षेत्रात उडी मारली आणि त्यातून ‘नायका’ची निर्मिती झाली.

अक्षरशः दरवर्षी ८०-१०० टक्के दराने कंपनीचा व्यवसाय वाढत आहे. २०१२ मध्ये सुरु झालेल्या कंपनीच्या शेअरची फाल्गुनी यांच्या ५८ व्या वर्षी शेअर बाजारात नोंदणी झाली. हा त्यांचा एक अचंबित करणारा प्रवास आहे. ‘नायका’ हे नाव नायिका या संस्कृत शब्दावरून घेतले आहे. फाल्गुनी म्हणतात, की प्रत्येक स्त्री ही तिच्या जीवनाची नायिका असली पाहिजे. स्वतःला प्राधान्य देऊन तिने तिच्या जीवनाची आखणी केली पाहिजे.

‘सेकंड इनिंग’मध्ये यशस्वी

जेव्हा इतक्या कमी वेळात व्यक्ती यशस्वी होऊन दाखवते आणि ते देखील आयुष्याच्या ‘सेकंड इनिंग’मध्ये तेव्हा नक्कीच काही यशस्वितेचे मंत्र आपल्याला तिच्याकडून कळू शकतात. यासंदर्भात फाल्गुनी म्हणतात, की जर तुम्हाला उद्योजक बनायचे असेल, तर तुमचा प्रवास हा ‘रोलर कोस्टर राइड’चाच असतो. त्यामुळे नेहमीच यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने झाकाळून जाऊ नका. त्या सांगतात त्यानुसार, एखाद्या महिन्यात जर हाताखालचे लोक त्या महिन्याचे सेल्स टार्गेट पूर्ण झाले नाही, असे बारीक चेहरा करून सांगायला आले तर त्या विनोदाने म्हणतात, की तुझे टार्गेट काढायला काहीतरी चुकले असेल.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स. व्यवसाय वाढवायचा झाला तर व्यावसायिक मूल्यांशी कोठेही तडजोड करायची नाही. तसेच व्यवसाय करताना सर्व आर्थिक गणिते पक्की करून मगच पुढे पाऊल टाकायचे. आपल्या व्यवसायात खूप स्पर्धा आहे म्हणून वाट्टेल तशा सवलती देऊन ग्राहकाच्या माथी काहीही उत्पादने मारायची नाहीत, यासाठी त्या आग्रही आहेत.

ही सर्व पथ्ये पाळल्यामुळेच ‘नायका’ हा दहा वर्षांमध्ये एक ‘ब्रँड’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे आणि आता शेअर बाजारात नोंदणी झाल्यामुळे येथून पुढेही घोडदौड अशीच चालू राहील, अशी खात्री वाटते. उद्योजिका बनण्याची इच्छा असणाऱ्या सर्वच तरुण आणि ज्येष्ठ महिलांसाठी फाल्गुनी नायर या एक प्रेरणास्थान ठराव्यात.

(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

loading image
go to top