स्मार्ट माहिती : ‘आयपीओ’ला अर्ज कसा कराल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPO

स्मार्ट माहिती : ‘आयपीओ’ला अर्ज कसा कराल?

सध्या प्राथमिक शेअर बाजारात प्राथमिक समभागविक्रीच्या ऑफरचा म्हणजेच आयपीओं’चा पाऊस पडत आहे. दर आठवड्याला नवनवे ‘आयपीओ’ बाजारात येत आहेत. त्यामुळे बरेच नवे गुंतवणूकदार बाजाराकडे आकर्षित होत आहेत. बाजारामधील त्यांचा प्रवेश हा अशा ‘आयपीओं’ना अर्ज कसा करावा, कोठून करावा, या प्रश्नांनी सुरू होतो. त्यामुळे ‘आयपीओ’ला अर्ज करताना कोणत्या मुलभूत गोष्टींची गरज असते आणि कशाप्रकारे अर्ज करावा लागतो, ते आज आपण पाहूया.

ज्या व्यक्तीस प्राथमिक समभागविक्रीमध्ये सहभागी व्हायचे असेल, त्यांच्याकडे ‘पॅन’ असणे गरजेचे आहे. तसेच एक डी-मॅट खाते गरजेचे असते. ‘आयपीओ’साठी ब्रोकरकडे ट्रेडिंग खाते काढण्याची गरज नसते. परंतु, हल्ली बहुतेक ठिकाणी ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने खाते काढायचे झाले, तर डी-मॅट खाते व ट्रेडिंग खाते एकत्रच काढता येण्याची सोय असते. त्यामुळे असे एकत्र खाते काढणेच श्रेयस्कर. कारण त्यामुळे भविष्यात दुय्यम बाजारात (सेकंडरी मार्केट) देखील लगेच खरेदी-विक्री करता येणे सोपे होते.

आता ‘आयपीओ’ला अर्ज करायचा झाला, तर ऑनलाइन अथवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

ऑनलाइन अर्ज करण्याचे मार्ग पुढीलप्रमाणे आहेत-

1) ऑनलाइन ब्रोकर, उदा. एचडीएफसी सिक्युरिटीज, आयसीआयसीआय डायरेक्ट अथवा डिस्काउंट ब्रोकर जसे, झिरोधा, अपस्टॉक्स यांच्याकडून तुम्ही ‘आयपीओ’ चालू असताना पोर्टलवरून अर्ज करू शकता.

2) ज्या गुंतवणूकदारांकडे इंटरनेट बँकिंगची सुविधा आहे, ते बँकेच्या पोर्टलमधून इन्व्हेस्टमेंटस् या पर्यायामधून अर्ज करु शकतात.

ऑफलाइन अर्ज करण्याचे मार्ग पुढीलप्रमाणे आहेत-

1) काही ब्रोकर ऑफलाइन पद्धतीने काम करतात. म्हणजे साधारणपणे जे गुंतवणूकदार काही कारणाने कॉम्प्युटर हाताळत नाहीत किंवा ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करू शकत नाहीत, ते ऑफलाइन ब्रोकरना फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून शेअर खरेदी-विक्री करतात, त्यांना ‘आयपीओ’ला अर्ज करायचा असेल तर ब्रोकरला किती शेअरसाठी (लॉट) अर्ज करायचा आहे, ते सांगावे लागते. त्यानुसार ब्रोकर त्याच्या प्रणालीमध्ये माहिती भरतो, त्यानुसार किती पैसे भरायचे, याचा त्याला त्याच्या ‘युपीआय’वर मेसेज येतो, त्या ‘रिक्वेस्ट’ला मान्यता दिली, की अर्ज सादर होतो व ‘ॲस्बा’ (ASBA) पद्धतीने त्याचे पैसे त्याच्या बँक खात्यातून घेतले जातात.

2) जिथे ब्रोकरच्या माध्यमातून अर्ज भरायचा नसेल, तर जेव्हा ‘आयपीओ’ येतो, तेव्हा त्यांचे फॉर्म एनएसई/बीएसई यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असतात. त्यांची प्रत काढून फॉर्म भरून तो आपल्या बँकेत दिला, की अर्ज सादर होतो. फॉर्म भरताना तुमचा खाते क्रमांक अथवा युपीआय क्रमांक भरून बँकेत द्यावा लागतो. यामध्ये लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा, की आता चेकद्वारे ‘आयपीओ’ला अर्ज केला जात नाही, तर केवळ ASBA (APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT) नेच करावा लागतो. अर्ज करणाऱ्याने आवर्जून बघण्याची बाब म्हणजे तो ज्या बँकेतून ‘आयपीओ’ला अर्ज करणार आहे, त्यामध्ये ASBA ची सोय उपलब्ध आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घेणे.

वर उल्लेख केलेल्या कोणत्याही पद्धतीने अर्ज केल्यानंतर पुढे येणाऱ्या ‘आयपीओं’साठी हीच पद्धत वापरता येईल.

(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Web Title: Nanditi Vaidya Writes About How To Apply For Ipo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPONanditi Vaidya