Palm Oil : पामतेलावरील आयातकरवाढीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oil professionals Demand for increase in import duty on palm oil Piyush Goyal finance economy tax mumbai

Palm Oil : पामतेलावरील आयातकरवाढीची मागणी

मुंबई : कच्च्या आयात पामतेलाच्या तुलनेत तयार आयात पामतेलावरील आयात शुल्क कमी असल्याने तयार पामतेलाची आयात होत आहे. त्यामुळे कच्चे पामतेल शुद्धीकरण उद्योगाला मोठा फटका बसत असल्याने तयार पामतेलावरील आयातकर वाढवावा, अशी मागणी तेल व्यावसायिकांनी केली आहे. तेल उत्पादकांची संघटना सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे (एसईए) केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ही मागणी केली आहे.  सध्या या दोन प्रकारच्या पामतेलांच्या आयात करातील फरक फक्त साडेसात टक्के आहे. तो फरक १५ टक्क्यांवर न्यावा, त्यासाठी तयार पामतेलावरील आयात कर साडेबारा टक्क्यांवरून वीस टक्के करावा.

तरच मलेशिया व इंडोनेशियातून तयार पामतेलाऐवजी कच्चे पामतेल आयात केले जाईल व त्याचा फायदा लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या देशातील पामतेल शुद्धीकरण उद्योगाला होईल असे संघटनेचे म्हणणे आहे. कर कमी असल्याने यंदा पामतेलाची आयात १६८ टक्के वाढली आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया हे देश राष्ट्रहितासाठी कच्च्या पामतेलावर जास्त आणि तयार पामतेलावर कमी कर लावतात. त्यामुळे तेथील तेल उद्योगातून नागरिकांना रोजगारही मिळतो व महसूलही मिळतो. आपल्याकडे मात्र आयात वाढत आहे, ही बाब आत्मनिर्भर भारत तत्वाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आयात पाम तेलावरील कर वाढवावा, असे संघटनेने म्हटले आहे.