वाहन उद्योगावर घसरणीचे मळभ

ओंकार भिडे
Thursday, 12 September 2019

घसरणीची प्रमुख कारणे
शहरातून वाढत असणारी वाहनांची संख्या व ट्रॅफिक जॅम
सार्वजनिक वाहतुकीत होणारी सुधारणा
कॅब शेअरिंग सारखा नवा व उत्तम पर्याय 
कार विकत घेण्यापेक्षा भाड्याने वापरू अशी होत असणारी मानसिकता
कर्ज वाटप नियम आथिक कठोर होत असल्याने 
गाड्यांच्या किमतीत झालेली वाढ

ग्राहकांची बदलत असलेली मानसिकता, वाहनांच्या किमतीत झालेली वाढ, शहरातून होत असलेले ट्रॅफिक जाम, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, धोरणात्मक निर्णयांबाबत असणारा संभ्रम आदींमुळे ग्राहकांनी वाहन खरेदी पासून थोडे लांब राहणे पसंत केले आहे. त्यामुळेच वाहन विक्रीवर मागणी रोडावल्या चे संकट निर्माण झाले आहे. घरात कपात करूनही ते दूर होईल असे सध्या तरी वाटत नाही. वाहान उद्योग यात पुढील आव्हानांचा घेतलेला हा आढावा.

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती मंदावलेल्या वाहन विक्रीची. पण आर्थिक उदारीकरणापासून म्हणजेच 1991 नंतर देशाच्या वाहन उद्योगाने कंपन्यांना एखाद अपवाद वर्षे वगळता सातत्याने विक्री वाढीची व भरगोस नफा मिळवण्याची संधी मिळवून दिली आहे. महिन्याला काही शे गाड्या विकणाऱ्या कंपन्यांची आकडेवारी ही लाखात पोचली आहे. पण भारतीय बाजारपेठेत उशिरा दाखल झालेल्या कंपन्यांना व ज्यांची उत्पादने ग्राहकांना फारशी पसंत पडली नाहीत अशा कंपन्यांची मासिक विक्री ही काही हजारांत आहे. 

2008 मधील अमेरिकेतील लेहमन ब्रदर्सच्या दिवाळखोरीनंतर त्याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटले. भारतातही 2000 आठ मध्ये वाहन विक्रीवर परिणाम झाला होता. नंतर मात्र देशातील वाहन उद्योग 2018 च्या मध्यापर्यंत सलग सात-आठ वर्षे उत्तम उत्तम कामगिरी करणारा ठरला. त्यामुळेच चारचाकी वाहने बनवणाऱ्या कंपन्यांची संख्या सहा वरून दुहेरी आकडेवारीत पोचली. परकी कंपन्यांना भारतीय बाजारपेठ ही आश्वासकच वाटली आहे आणि यापुढेही वाटणार आहे. भारतामध्ये वाहन उद्योगाला केवढा मोठा वाव आहे, हे लक्षात घ्यायचे झाल्यास जगातील सर्वांत सशक्त असणाऱ्या अमेरिकेतील वाहन विक्रीच्या आकडेवारीशी तुलना केल्यावर नक्कीच आपल्याला हे कळेल. अमेरिकेत जून 2019 मध्ये 15,0 9,963 एवढ्या कार व लाईट ट्रकची विक्री झाली. भारतात याच काळात 2,96,503 तेवढ्यात कार व व्यावसायिक वाहनांची विक्री झाली. अमेरिकेतील आकडेवारीशी तुलना केल्यास भारतात सात पट विक्री वाढीस वाव आहे, हे लक्षात येईल. पण, यामध्येही अनेक मुद्दे लक्षात घ्यावे लागणार आहेत. सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरण, कॅब ऍग्रीगेटर्स कंपन्यांच्यामार्फत उपलब्ध होत असलेला नवा स्वयंरोजगार यांच्यामुळे वाहन विक्रीची भविष्यातील वाढ ही सातत्याने कायमच सकारात्मक राहील असे म्हणता येणार नाही. 

याचीच चाहूल जागतिक पातळीवर 2018 च्या पहिल्या सहामाहीत दिसली व त्याचे लोण भारतातही आले. पर्यावरणाचे बदलणारे निकष, सुरक्षा नियम व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानाच्या दिशेने होणारी वाटचाल तसेच, वाढत्या ट्रॅफिक जाममुळे शहरातून मंदावणारी मागणी व कॅबचा उपलब्ध झालेला पर्याय यांच्यामुळे ऑक्टोबर 2018 पासून सप्टेंबर 2019 पर्यंत वाहन विक्री मंदावलेली आहे. 

ग्राहकांची मानसिकता 
देशातील वाहन उद्योग एक नव्या वळणावर येऊन ठेवला आहे. गेल्या दोन दशकात देशातील ग्राहकांची मानसिकताही खूप मोठ्या प्रमाणात बदलली आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे व माहिती देवाण-घेवाण उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढल्याने हा बदल झाला आहे. आत्ताचा ग्राहक अधिक जागरूक व मी देत असलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला कोणते प्रॉडक्ट मला देईल याचा विचार करणार आहे. त्यामुळेच त्याची एखादी वस्तू घेण्याची पद्धत बदलली आहे. एकीकडे आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांना वाहन विक्री मंदावल्या चा फटका बसला असतानाच ह्युंदाई व एमजी हेक्टर या कंपन्यांना नवी मॉडेल्स योग्य किमतीला उपलब्ध केल्यामुळे ऑगस्ट 2019 मध्ये मागणीही आल्याचे उपलब्ध आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. म्हणजेच नवे मॉडेल आधुनिक फीचर व स्टाईल यांच्याबरोबर योग्य किमतीला उपलब्ध असल्यास बाजारपेठ नक्कीच मिळते, हे या दोन उदाहरणांवरून कळते. 

गेल्या दोन दशकात भारतात निर्माण झालेला
मध्यमवर्ग हा आपली इच्छा पूर्ण करण्याच्या मागे धावण्यास सुरुवात झाली. कर्ज सहज उपलब्ध होऊ लागल्यामुळे कर्जावर का होईना असेट नसणारी व निव्वळ लायबिलिटी असणारी वस्तू स्टेटस सिम्बॉल म्हणून खरेदी करण्याकडे मध्यमवर्ग आकृष्ट झाला.  त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात वाहन विक्री झाली आहे पण हीच वाहन विक्री आता या क्षेत्रासाठी अडचण ठरू लागली आहे. कारण रस्त्यावरील वाहनांची संख्या झपाट्याने वाढले आहे त्या तुलनेत रस्त्यांचा विकास झालेला नाही. त्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारत असल्याने लोक ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी तसेच, ते वाहन देखभालीवर होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी वाहने घेण्यापासून परावृत्त होऊ लागले आहेत. 

संभ्रमाचे वातावरण
पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल 2020 पासून BS6 हे पर्यावरणाचे नवे निकष लागू होणार आहेत. सध्या उपलब्ध असणारे BS4 चे मॉडेल विकत घेतल्यावर त्याचे काय होणार असा प्रश्न संभाव्य वाहन खरेदीदारांना आहे. त्यामुळे ते वाहन घेण्यापासून स्वतःला थांबवत आहेत. तसेच BS6 मुळे डिझेल वाहनांच्या किमती पुढील वर्षी वाढणार असल्याने कंपन्यांनी BS4 वाहनांची इन्व्हेंटरी कमी करण्यासाठी डिस्काउंट चा उतारा लावला आहे. पण, आगामी काळात आणखीन डिस्काउंट मिळेल, अशा अपेक्षेमुळे ग्राहकही चांगल्या ऑफरची वाट बघत आहेत. यामुळे सध्या उपलब्ध असणारा स्टॉक पडून असल्यामुळे मागणी पुरवठ्याचे प्रमाण जुळवण्यासाठी वाहन कंपन्यादेखील आपले उत्पादन काही दिवस टप्प्याटप्प्याने बंद ठेवत आहेत. केंद्र सरकार 2030 पासून देशातील वाहन उद्योग हा संपूर्णपणे इलेक्ट्रिक चा असेल यादृष्टीने नियोजन करत आहे. सध्या अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर काम करीत असून काही कंपन्यांनी 2020 पासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहन सादर करण्याचे नियोजन केले आहे. तसेच सरकारने ही इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर अनेक सवलती देऊ केल्या आहेत.  

यामुळेच आघाडीच्या कंपन्यांकडून कशाप्रकारची इलेक्ट्रिक वाहने बाजारपेठेत येतात,
 हे पाहून तपासूनच आपली पुढची गाडी वाहन घेण्याचा निर्णय बळावतो आहे. आपण आत्ता घेतलेल्या गाडीचे पुढे काय होणार याचा अंदाज सर्वसामान्य ग्राहकांना बांधता येणे कठीण आहे. 

निकष कडक 
कर्ज बुडीचे प्रमाण वाढत असल्याने बँका व बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी कर्ज देतानाचे निकष पहिल्यापेक्षा आणखी खडक केले आहेत. त्यामुळे कर्ज वाटपाचे प्रमाणही मंदावले आहे. आपल्याकडे लहानाचा इन्शुरन्स विशेषतः थर्ड पार्टी इन्शुरन्स करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे पहिल्या तीन वर्षाचा इन्शुरन्स वाहन खरेदी करतानाच उतरविणे बंधनकारक केले आहे. तसेच, पर्यावरण विषयक कराचा भार वाढल्यामुळे ग्राहकाकडील रोकड सुलभता कमी झाली आहे. त्यामुळे डाऊन पेमेंटसाठी पैसे कमी असणारा ग्राहक हा वाढीव बोजा सहन करण्याची ताकद नसल्याने वाहन खरेदीपासून फारकत घेत आहे. पर्यावरण व सुरक्षाविषयक मानके लागू झाल्याने कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे कंपन्यांनी त्यांच्या किमतीत पाच ते पंधरा टक्के वाढ केलेली आहे. या सर्वांमुळे ग्राहक वाहन खरेदीपासून दूर जात आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था मंदावली 
दुचाकींना ग्रामीण भागातून सर्वाधिक मागणी असते. पण दिलेल्या या दोन वर्षात भारताच्या सर्व भागात मानसून एकसारखा झालेला नाही. काही ठिकाणी ओला तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळ तर काही ठिकाणी अवकाळीने झोडपले आहे. याचा फटका शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीला बसला आहे. परिणामी ग्रामीण भागातून असणारी मागणी चांगलीच मंदावली आहे. दुचाकीच्या एकूण मागणीत चाळीस ते पन्नास टक्के वाटा हा ग्रामीण भावाचा आहे. 

32% 
ऑगस्ट 2019 मधील प्रवासी वाहन विक्रीतील घट 
22%
ऑगस्ट 2019 मधील दुचाकी विक्रीतील घट
24% 
ऑगस्ट 2019 मधील एकूण विक्रीतील घट
2% टक्के
ऑगस्ट 2019 मध्ये निर्यातीत झालेली वाढ 
.........
9,732,040 
ऑगस्ट 2019 मधील एकूण वाहन विक्री
11,570,401
ऑगस्ट 2018 मध्ये एकूण वाहन विक्री
15.89%
ऑगस्ट 2019 मध्ये एकूण विक्रीतील घटीचे प्रमाण
,...........
30,915,420
एप्रिल ते मार्च 2018-19 मधील देशातील एकूण वाहन विक्री
29,094,447
एप्रिल ते मार्च 2017-18 मधील देशातील एकूण वाहन विक्री 
6.26%
एप्रिल ते मार्च 2018 19 मध्ये विक्रीत झालेल्या वाढीचे प्रमाण

सर्व आकडेवारीचा स्रोत सियाम 

घसरणीची प्रमुख कारणे
शहरातून वाढत असणारी वाहनांची संख्या व ट्रॅफिक जॅम
सार्वजनिक वाहतुकीत होणारी सुधारणा
कॅब शेअरिंग सारखा नवा व उत्तम पर्याय 
कार विकत घेण्यापेक्षा भाड्याने वापरू अशी होत असणारी मानसिकता
कर्ज वाटप नियम आथिक कठोर होत असल्याने 
गाड्यांच्या किमतीत झालेली वाढ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omkar Bhide writes about recession in automoblie sector