"ओएनजीसी' करणार 83 हजार कोटींची मोठी गुंतवणूक

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

ओएनजीसीकडून 83 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा 

नवी दिल्ली:  तेल आणि वायू महामंडळाकडून (ओएनजीसी) 83 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शशी शंकर यांनी केली. गुरुवारी (ता.15) स्वतंत्र्यदिनानिमित्त कर्मचाऱ्यांना संबोधित करताना शंकर यांनी कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. 

"ओएनजीसी'कडून 25 विविध प्रकल्पांमध्ये 83 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनात वाढ होईल, असा विश्‍वास शंकर यांनी व्यक्त केला. यापैकी 15 प्रकल्प अंतिम टप्प्यात असून ज्यातून महामंडळाची तेल आणि वायू उत्पादन क्षमता वाढेल, असे त्यांनी सांगितले. 2018-19 या वर्षात महामंडळाने 24.23 दशलक्ष टन कच्च्या तेलाचे उत्पादन घेतले होते. त्याशिवाय 25.81 अब्ज क्‍युबिक मीटर नैसर्गिक वायूचे देशांतर्गत उत्पादन घेतले. त्याशिवाय 10.1 दशलक्ष टन तेल आणि 4.736 अब्ज क्‍युबिक मीटर गॅसचे परदेशातील तेलसाठ्यांमधून उत्पादन घेतले आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 1 लाख 9 हजार 655 कोटींचा विक्रमी महसूल मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ONGC investing Rs 83000 crore in 25 projects